दखल – भक्तीमय रचना

>> वर्षा फडके

स्तोत्रसुमनांजली या पुस्तकाचा आठवा भाग नुकताच प्रकाशित झाला आहे. आतापर्यंत स्तोत्रसुमनांजलीचे 1 ते 7 भाग प्रकाशित झाले असून या सर्व पुस्तकांत वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे.

स्तोत्र या शब्दाचा अर्थ स्तुती करणे. स्तोत्र म्हणजे भक्ताने परमेश्वराचा क्षणाचाही विरह सहन न झाल्याने केलेला सहजोद्गार आहे. परमेश्वराकडे जाणाऱया मार्गाची ती सुरुवात आहे. म्हणूनच स्तोत्राद्वारे देवाला मनातून आळवणे महत्त्वाचे ठरते. थोडक्यात, ज्या काव्याद्वारे परमेश्वराचे स्तवन केले जाते तेच स्तोत्र.

आपल्या देवतेची उपासना आपण सुमधुर करून त्याची कृपादृष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतो. या पुस्तकात गणेश, सरस्वती, प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, राधा, जानकी, सुब्रह्यण्यम, शिवशंकर, श्रीहरी विष्णू, शीतलामाता, परशुराम इत्यादी देवतांची स्तोत्रे भावार्थासह देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्तोत्रपठण हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनला असून लौकिक आणि परमार्थिक सुखासाठी आणि आनंदासाठी त्या जगदीश्वर भगवंताची काव्यरूपात प्रार्थना आळवावी हेच प्रयोजन स्तोत्रपठणाचे आहे.

आपल्या सांस्कृतिक जीवनाचा एक मोठा भाग म्हणजे आपली दैवतं. दैवतांची स्तोत्रं, त्यांच्या आरत्या त्यामुळे आपल्या दैवतांची स्तुती गाताना, त्यांच्यावर रचना करताना, प्रतिभावंतांना कायम नवनवीन विस्फुरणं होत असतात. ही विस्फुरणं म्हणजे केवळ दैवतांची स्तुती नाही, तर ती एक प्रकारे हिंदुस्थानच्या सांस्कृतिक इतिहासाचे धागेदोरे आहेत. स्तोत्रपठण हा हिंदुस्थानींच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. पण काळाच्या ओघात स्तोत्रपठण करणाऱया नव्या पिढीची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

स्तोत्रसुमनांजली भाग-8 या साहित्यकृतीची रचना साधी आहे. स्तोत्र म्हणजेच काय, भक्ताच्या तोंडून उत्स्फूर्त व्यक्त झालेली भक्तीमय रचना म्हणजे स्तोत्र अशी पारंपरिक व्याख्या सांगून नंतर त्या स्तोत्रांच्या विविध वैशिष्टय़ांबद्दल सांगण्यात आले आहे. स्तोत्राची संस्कृतमधील व्याख्या समजावून देत दैनंदिन उपासनेत त्यांचे महत्त्व काय आहे हे समजावून सांगण्यात आले आहे. तसेच त्यानंतरच्या प्रकरणात वीस स्तोत्रांचा आणि क्षमाप्रार्थनेचा परामर्श सांगण्यात आला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून केवळ स्तोत्रांचे संकलन न ठरता एक प्रकारे नवहिंदुस्थानच्या नव्या पिढय़ांना संस्कारित करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकाद्वारे करण्यात आला आहे.

स्रोत सुमनांजली भाग-8
लेखिका – रंजना उन्हाळे
प्रकाशक – सृजनरंग प्रकाशन
मूल्य – रुपये 175/-

आपली प्रतिक्रिया द्या