प्रश्नांना भिडणारी कविता

191

>> डॉ. दुष्यंत कटारे

मराठी कवितेच्या प्रांगणात अलीकडचे ठळक नाव म्हणजे प्रा. संध्या रंगारी. त्यांचा ‘वाताहतीची कैफियत’ हा स्वरूप प्रकाशन, पुणे यांनी नुकताच काव्यसंग्रह प्रकाशित केला. जागतिकीकरणामुळे, सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे एकूण समकालीन समाजजीवन अस्वस्थ झाले आहे. संवेदनशून्य होत चाललेल्या समाजजीवनाचा आलेख या काव्यसंग्रहात कवयित्रीने विस्ताराने रेखाटला आहे. एकूण 19 कवितांमध्ये हा पट त्यांनी मांडला असला तरी प्रत्येक कविता लक्षवेधी असून काही दीर्घ कविता वैश्विकतेच्या अंगाने व्यक्त झाल्या आहेत. बाईपणापासून बळीराजाच्या आत्महत्येपर्यंत ही कविता समग्र समकालीन प्रश्नांना भिडते आहे.

त्या मराठवाडय़ातील आखाडा बाळापूर, ता. कळमनुरी येथील नारायण वाघमारे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 1994 ला ‘आघात’, 2003 ‘कवडसे’ आणि ‘संध्यारंग’ (2010) असे एकूण तीन, तर 2017, 5 सप्टेंबर रोजी ‘वाताहतीची कैफियत’ हा काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहे. ‘चांदणचुरा’ हा ललित लेखकसंग्रह मॅडमच्या नावावर आहे.

‘वाताहतीची कैफियत’ हा काव्यसंग्रह म्हणजे कवयित्री म्हणते त्याप्रमाणे ‘सामाजिक न्यायाचं महाकाव्य’च रचलं आहे. स्त्राrवादाचा एकूण वावर या कवितेमध्ये पसरला आहे. ‘थेरीगाथा’ हे स्त्रियांचे पहिले काव्य हे सांगताना बौद्धधम्माचा त्यांनी केलेला चिकित्सक अभ्यास आपल्यासमोर उभा राहतो. म्हणूनच त्यांच्या काव्यातून समग्र प्राणीसुखाचा विचार पुढे आला आहे. निब्बाणाविषयी येथे चर्चा आहे. हा विचार जात, धर्म, प्रांत, राज्य यापलीकडे जाऊन माणुसकीचा अंगीकार करतो. कवितेत आलेले समग्र प्रश्न विश्वातील जिथे जिथे मानवाची वाताहत आहे त्या सगळ्यांची ही कविता प्रतिनिधित्व करते.

‘मायची हाडं चुलीतच धुपवली’ ही बाईपणाची जाणीव जशी कवयित्रीला आहे तशी ‘स्वीकारला नाही बाबासाहेब कुणबटांनी’ ही संवेदनासुद्धा तिच्या काव्यात स्पष्ट दिसते आहे. मोडून न पडणारी बाई कवयित्रीला अभिप्रेत असावी, असे जरी असले तरी ‘निश्चय’ नावाच्या रचनेत-

‘कळलंय मला
लेक मोठी झाल्यावर
अपुराच पडतो पदर मायीचा’

ही भावनिक हाक ती येथे देते, पण शेवटी म्हणते, बाईच आहे मी ‘मोडेन हाडाने, पण मनाने नाही.’ तिला या व्यवस्थेशी दोन हात करून उद्याच्या दिवसासाठी सूर्यफुले तयार करावयाची आहेत. कवयित्रीने एकूण समाजजीवनाचा मांडलेला आलेख आपण पाहिला म्हणजे वाटते, ‘तिचा हा शब्दाविष्कार म्हणजे जखमा वाहती भळभळा’. बाबासाहेबांनंतर येथे विचारलढे पेटले नाहीत ही खंत तिला नेहमी सतावते आहे-

बाबासाहेब, तुम्ही केला सत्याग्रह
महाडसाठी
पाण्यासाठी पेटवलं होतं
डोळ्यातलं पाणी
मीही लढू बघतेय
अस्मितेची लढाई

बाबासाहेबांच्या हिंदू कोडबिलामुळे आम्ही आज उभ्या आहोत, याची कबुली येथे कवयित्रीने दिली आहे.

प्रा. संध्या रंगारी ग्रामीण जीवन जगणारी आणि भोगणारी मातीची कविता लिहिणारी कवयित्री आहे. तिला बळीराजाच्या वाताहतीची कैफियत वेशीवर आणावयाची आहे. ‘वैश्विक खेडय़ात माझं गाव’ नावाची कविता दीर्घ स्वरूपात आहे. ती आपला गाव या जागतिकीकरणात शोधते आहे. गावामध्ये नळ आला, त्याला पाणी नाही. शाळा आली, पोरं नाहीत. खांब आहेत, वीज नाही. दवाखाने आहेत, डॉक्टर नाहीत. दूध डेअरीत दूधभेसळ आहे. सेझ, एन.आर.आय., लवासा याचे सगळे हे परिणाम आहेत. ती लिहिते- ‘जमीन, शेत, नदी, पर्वत, डोंगर, दऱया, चिरे, कुरण आणि शेवटी मरणही येथे विकणे आहे. युरेका युरेका म्हणणारी कृषी विद्यापीठे शेतकरी मारण्याचं शास्त्र करताहेत का विकसित? सगळेच बासणात गुंडाळून ठेवण्याचे प्लॅन आता अयशस्वी झाले आहेत. आजची वस्तुस्थिती पाहिली, तर जागतिकीकरणाने लोककल्याण मागे पाडले आणि भांडवलदारांच्या कल्याणाला सुरुवात झाली आहे. कवयित्री म्हणते, त्यांचेच दुकान जोरात सुरू आहे.’

राजकारणावर भाष्य करणाऱया रचना पाहिल्या तर जनतेला लोककल्याणाची स्वप्ने दाखवायची, मार्केटिंग करायचे, सत्ता मिळवायची, हे येथे राजरोसपणे चालू आहे. तेव्हा जनतेने या मृगजळापासून दूर राहावे, हा सल्ला या कवितेतून मिळतो आहे.

आपली प्रतिक्रिया द्या