बालसाहित्यात मौलिक योगदान

>> सुधीर सेवेकर

मराठी कुटुंबात जन्मूनही आजची शाळकरी वयातील पिढी, मराठी पुस्तकं वाचत नाहीत. मराठी साहित्य, नाटय़, काव्य वगैरेपासून ती फार दूर आहेत. त्यांची अवस्था ‘ना घरका ना घाटका’ अशी झालेली आहे, अशी खंत मराठी साहित्य वर्तुळात नेहमीच व्यक्त केली जाते. शालेय शिक्षण क्षेत्रातील तज्ञही हाच सूर आळवत असतात. कुटुंबातही पालकांना हाच अनुभव दरदिवशी येत असतो. मातृभाषेच्या प्रेमापासून, संस्कारापासून दूरदूर जाणाऱया उमलत्या पिढीविषयीची ही चिंता अत्यंत रास्त आहे. खरी आहे. मराठी भाषेचे प्रेम बालवयातच रुजले तरच ते कायम टिकेल, अन्यथा नावगाव, पार्श्वभूमी आणि कुटुंब मराठीपण मराठीचा गंधही नाही अशीच अवस्था महाराष्ट्रातील बहुसंख्य कुटुंबांची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी भाषेचे वाढते स्तोम, वाढती संख्या हीही त्याला कारणीभूत आहे.

मराठी भाषा, मराठी भाषेतील बालसाहित्य या संदर्भातील आजच्या या निराशजनक पार्श्वभूमीवर म्हणूनच संभाजीनरातील ध्येयवादी, सावरकरवादी युवक नाटय़ कलावंत पार्थ बावस्कर यांच्या ‘शब्दांमृत प्रकाशन’ या नव्यानेच सुरू झालेल्या पुस्तक प्रकाशन संस्थेने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या ‘आगळ्यावेगळ्या गोष्टी’ आणि ‘चिऊचं घर मोलाचं’ या दोन पुस्तकांची दखल घेणे, त्यांची गुणवैशिष्टय़े आणि महत्त्व विशद करणे महत्त्वाचे ठरणारे आहे.

प्रस्तुत दोन्ही पुस्तकांचे लेखक आहेत, गेली चाळीसहून अधिक वर्षे बालसाहित्य, बालनाटय़े यात सक्रिय असलेले, अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळविणारे लेखक, नाटय़प्रशिक्षक, बालमानसशास्त्राचे तज्ञ सूर्यकांत सराफ. ते वास्तव्यासाठी संभाजीनागरात असतात, परंतु त्यांची बालनाटय़े, बालकथाची पुस्तके संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. कारण स्वर्गीय राजाभाऊ मंगळवेढेकरांनंतर तितक्याच समर्थपणे बालकांना गोष्टीत, कवितेत, तालात गुंगवू शकण्याची क्षमता त्यांच्या लेखनात आहे. आजूबाजूला कोणी मोठी माणसे नसताना शाळकरी मुलामुलींचा संवाद, त्यांच्या खोडय़ा, त्यांच्या चर्चा ऐका म्हणजे तुम्हाला आजच्या शाळकरी पिढीचे मनोगत, त्यांचे स्वप्नविश्व, त्यांची मानसिकता कळेल. हे लक्षात घेऊनच प्रस्तुत दोन पुस्तके लेखक सूर्यकांत सराफ आणि प्रकाशक पार्थ बावस्कर यांनी बाजारात आणली आहेत.

पैकी ‘आगळ्यावेगळ्या गोष्टी’ या पुस्तकात एकूण तेरा कथा आहेत. त्यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांची रचना, भाषा, कल्पनाविश्व हे जरी पारंपरिक बालकथांसारखे असले, तरी मुळात या ‘परफॉरन्स स्टोरीज’ अर्थात अभिनित करण्याजोग्या, सादर करण्याजोग्या गोष्टी आहेत. मुलांना भाषा प्रिय होण्यासाठी त्यांची शब्दांशी क्रीडा व्हायला हवी आणि त्यांना खेळावे वाटेल अशा गोष्टी त्यांच्या हाती पडायला हव्यात ती गरज प्रस्तुत ‘आगळ्यावेगळ्या गोष्टी’ हे पुस्तक पूर्ण करते.

‘चिऊचं घर मोलाचं’ हे आगळ्यावेगळ्या आकाराचं, मांडणीचं पुस्तक म्हणजे तीन बालनाटय़ांचा संग्रह आहे. पहिलं नाटक चिऊचं घर मोलाचं हे ज्यांना नुकतंच वाचता येऊ लागलेलं आहे अशा शिशू गटासाठीच. छोटीछोटी वाक्य आणि आटोपशीर कालावधी हे त्याच ठळक वैशिष्टय़. मूल साधारण दहा वर्षांचे झाले की, त्याचे विचार, सभोवताली घडणाऱया गोष्टींचे त्याच्या दृष्टीने विश्लेषण इत्यादी सुरू होते. त्यांच्यासाठी दुसरे नाटक आहे ‘अरे बापरे साप!’ त्यातून निसर्गशिक्षण, सापांबद्दलच्या गैरसमजांचे निराकरण इत्यादी मोठय़ा रंजकपणे साध्य होते. तर तिसरे नाटक आहे किशोर वयातील म्हणजे साधारण तेरा-चौदा वर्षे वयोगटासाठीचे. या वयात ढोंगीपणा, अंधश्रद्धा याची चीड येऊ लागते. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य याची समज विकसित व्हायला लागते वगैरे. त्यांच्यासाठीचं हे नाटक आहे.

अनेक वर्षे बालनाटय़ शिबिरे, बाळमेळावे, बालसाहित्य संमेलनातून सहभाग, स्वतःचा अनुभव वगैरेमुळे लेखक सूर्यकांत सराफ यांना बालमानसशास्त्र पुरेपूर कळालेले आहे, हे दोन्ही पुस्तकांच्या आशयविषय, रचनामांडणी इत्यादीतून स्पष्ट जाणवते. आज मराठी नाटक-सिनेमा-टीव्ही मालिका इत्यादीतून झळकणारे, गाजणारे अनेक कलावंत हे सूर्यकांत सराफ यांच्या बालनाटय़ शिबिरे व कार्यशाळांतून तयार झालेले आहेत. परंतु हा माणूस मूलतः प्रसिद्धिपरान्मुख असल्याने कांहींसा उपेक्षित राहिला आहे.

पार्थ बावस्कर हे वयाने विशीतील असणारे युवाकलावंत हे त्यांच्याच मुशीत घडलेले आहेत. यूटय़ूब व अन्य माध्यमांतून ते झपाटय़ाने पुढे येत आहेत. त्यांनी त्यांच्या कांचन प्रकाशन आणि शब्दांमृत प्रकाशनांद्वारे प्रस्तुत पुस्तके बाजारात आणलेली आहेत.

बालसाहित्य, बालनाटय़े, बालमानसशास्त्र, मराठी भाषा आणि नवीन पिढी अशा अनेक संदर्भांत या दोन पुस्तकांचे मोल मोठे आहे. शालेय मुलामुलींशी संबंधित शिक्षक, पालक, बालमानसशास्त्रज्ञ आणि एकूणच मराठी माणूस या सर्वांसाठी ही पुस्तके मोलाची आहेत हे नक्की. पुंडलिक वझे यांच्या चित्रांनी पुस्तकांचे सौंदर्य वाढलेले आहे.