Movie Review : आठवणींचा गंध जपणारी हवीहवीशी सफर

2309

>> वैष्णवी कानविंदे- पिंगे

मैत्री आणि बॉलीवूडचं समीकरण प्रेक्षकांना नवीन नाही. किंबहुना, बऱ्याचशा सिनेमांचा पायाच तो असतो. अगदी ‘शोले’ पासून (शोलेच्या कितीतरी आधीपासून, पण तरी शोलेने इतिहास रचला म्हणून त्याचं नाव.) ते अगदी काल परवाच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर-2’ या सिनेमापर्यंत मैत्री बॉलीवूडने मनापासून निभावली आहे. आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘छिछोरे’ हा सिनेमा पुढे नेतो. एवढंच नाही तर हा सिनेमा आपल्या आयुष्यातल्या जुन्या दिवसांची कुठची ना कुठची तरी आठवण आपल्याला देतो आणि म्हणूनच नितेश तिवारीचा हा सिनेमा खास ठरतो.

खरं तर हा सिनेमा तसा इतर चार सिनेमांसारखाच आहे. ‘थ्री इडियट’ किंवा ‘जो जिता वोही सिकंदर’सारख्या सिनेमांमध्ये आपण अनेक वेळा जे अनुभवलं तेच थोडय़ाबहुत फरकाने या सिनेमात पाहायला मिळतं. पण तरीही अशी मैत्री, असे मित्र पडद्यावर पाहताना नेहमीच छान वाटतं आणि अगदी तसंच छान फिलिंग हा सिनेमा पाहताना वाट्याला येतं.

ही कथा खरं तर खूप पुढून सुरू होते आणि मागे जात भूतकाळ हळुवार हाताने उलगडत त्यासोबत आपल्यालादेखील कधी त्या स्वप्नमय दुनियेत घेऊन जाते हे कळतच नाही. आताचा काळ आणि नव्वदीचा भूतकाळ अशा दोन टप्प्यांमध्ये हा सिनेमा प्रवास करतो. त्याच्या सोबत आपल्यालाही घेऊन जातो. सुशांत सिंग आणि त्याची बायको श्रद्धा कपूर यांचा मुलगा हुशार असतो, पण परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यामुळे तो स्वतःला लूजर समजत आपलं आयुष्य संपवायला पाहतो. त्याला नवी उमेद मिळावी म्हणून सुशांत सिंग त्याला आपल्या भूतकाळाविषयी, आपल्या प्रेमाविषयी आणि आपल्या लूजर गँगविषयी सांगायला लागतो. त्यातून आपल्या मुलाची जगायची उमेद पुन्हा जिवंत व्हावी हा प्रयत्न असतो. मग काय होतं? मुलगा वाचतो का? त्याच्या कॉलेज दिवसांची अशी काय खास गोष्ट असते, या सगळ्याचा सुरेख प्रवास म्हणजे हा सिनेमा.

या सिनेमात सुशांत, श्रद्धा आणि इतर सगळे उतारवयात समोर येत असले तरीही त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांमधले किस्से आणि करामती यामुळे चित्रपटाला खरी रंगत येते. मित्रांच्या मैत्रीत असणारी भाषा आणि त्यातून जन्माला येणारी नाती पाहताना आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या त्या जागा आठवल्याशिवाय राहत नाहीत.

चित्रपटातील हलकेफुलके संवाद, प्रासंगिक विनोद हे सगळं इतकं सहज झालंय की, ते पाहताना कुठेही ओढून ताणून केलेले प्रयास दिसत नाहीत. तसंच दिग्दर्शकाने हा हलका फुलका बाज जपताना त्यातून नकळत संदेश द्यायचा प्रयत्न केलाय आणि सिनेमाच्या रंगात रंगत असताना आपल्याला नकळत तो संदेशदेखील भावून जातो. या सिनेमाचा खरा हीरो नितेश तिवारीच आहे. त्याने सिनेमाचा बाज इतका लीलया उचलला आहे की, आपण त्या ओघात कधी गुंततो हे कळतच नाही. या सिनेमाचं संगीतही सुखावणारं आहे आणि काळामधलं अंतर दाखवणारं छायांकनदेखील खास जमून आलेलं आहे.

सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर, ताहिर राज भसीन, वरुण शर्मा, तुषार पांडे, वरुण पॉलिशेट्टी ही सगळी पात्रं आपल्या अवतीभोवती कधी तरी होती असं वाटल्यावाचून राहवत नाही. श्रद्धा कपूरचं काम छान झालंय. ती दिसते देखील छान. तिच्या एकूण अदाकारीला अधिक खुलवता आलं असतं तर बहार आली असती. यात व्यक्तिरेखा खूप आहेत, पण प्रत्येकाचं खास वैशिष्टय़ मात्र जपलं आहे.

एकूणच हा सिनेमा म्हणजे आठवणींचा हवाहवासा प्रवास आहे. अशा सिनेमांमध्ये इतर अनेक सिनेमांचे तुकडे जरूर असतात. पण तरीही असे तुकडे जपणारे सिनेमे अधून मधून यायला हवेत. ठेवणीतल्या पोतडीमधल्या आठवणींसारखे ते नक्कीच सुखावणारे असतात.

  • सिनेमा ‘छिछोरे’
  • दर्जा    ****
  • निर्मिती साजिद नाडियादवाला
  • दिग्दर्शक नितेश तिवारी
  • लेखक   नितेश तिवारी, पियूष गुप्ता, निखिल मल्होत्रा
  • संगीत   प्रीतम
  • छायांकन अमालेंदू चौधरी
  • कलाकार सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, तुषार पांडे, नवीन पॉलिशेट्टी, ताहिर भसीन, प्रतीक बब्बर
आपली प्रतिक्रिया द्या