हाऊसफुल्ल : फक्त ऍक्शन बाकी शून्य

7816

>> वैष्णवी कानविंदे- पिंगे

टायगर श्रॉफ हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात ते फक्त डोले शोले… सॉल्लिड बॉडी आणि डोळ्याची पापणीदेखील हलवायची परवानगी न देणारी हाणामारी दृश्य.

आता बागी एक, नंतर दोन आणि आता तीन… जसं जसं हे सिनेमा सत्र पुढे जातंय तसं तसं ऍक्शन अधिकाधिक धारधार होत चाललं आहे. टायगर श्रॉफची स्टाइल आणि एकूणच सगळं एकदम चकाचक आणि नेत्रदीपक आहे खरं… पण एकीकडे सिनेमा तांत्रिकदृष्टय़ा चकचकीत होत असताना दुसरीकडे कथेच्या बाबतीत मात्र तो ढासळतो आहे हेदेखील तितकंच खरं .

डोळे झाकून, फार विचार न करता मारमारीच्या दृश्यांचा विचार करून त्यानुसार कथा गुंफलीय की काय असं वाटतं. शूर पोलीस वडील कामावर असताना मृत्यू पावतात. त्यांचा मोठा मुलगा रितेश देशमुख भित्र्या स्वभावाचा असतो आणि धाकटा टायगर श्रॉफ मात्र एकदम शूर असतो. तो लहान असला तरी मोठय़ा भावाच्या सुरक्षितता राखण्यासाठी तो काहीही करायला आणि कोणालाही मारू शकतो. अशातच भावाच्या एका गोष्टीमुळे त्याला सीरियातील दहशतवाद्याला सामोरं जावं लागतं आणि मग काय होतं? कशा तऱहेने तो या संकटाचा सामना करतो. नेमकं होतं तरी काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हा सिनेमा पाहताना मिळतात.

रितेश देशमुखचा अभिनय छान झालाय. नेहमीपेक्षा खूप वेगळी भूमिका साकारायची संधी त्याच्या वाटय़ाला आलीय आणि त्याच्या भित्रेपणाला लगेचच ऍक्शन दृश्यांची साथ छान वाटते. सोबत श्रद्धा कपूर आणि तिचा सिनेमागणिक वाढत जाणारा ग्लॅमरस लूक या सिनेमाला स्टायलिश करतो हे नक्कीच, पण या काही गोष्टी वगळता सिनेमा बाकी जराही पकड धरत नाही.

जितकी ढिसाळ गोष्ट तितकेच सपक संवाद. काही संवाद वगळता सिनेमा मनात ठसत नाही. संगीतदेखील यथातथाच… एकूणच फक्त ऍक्शन किती वेळ पाहायची आणि पाहायची असेल तर टायगरचा कोणताही सिनेमा पाहिला तरी ती वाटय़ाला येतेच की… मग उगाच वेळ का घालवा.

  • सिनेमा   बागी 3
  • दर्जा   **
  • निर्माता नाडियादवाला गॅण्डसन एंटरटेन्मेंट, फॉक्स स्टार स्टुडिओ
  • दिग्दर्शक    अहमद खान
  • लेखक  फाहाद सामजी, स्पर्श खेतपाल, ताशा भंबा, मधुर शर्मा
  • संगीत विशाल शेखर, बप्पी लहरी, तनिष बागची, साचेत परंपरा, रोचक कोहली
  • कलाकार    टायगर श्रॉफ, रितेश देशमुख, श्रद्धा कपूर, अंकिता लोखंडे, जयदीप अहेलवत
आपली प्रतिक्रिया द्या