स्वागत दिवाळी अंकांचे

जत्रा

या अंकात मान्यवरांच्या कथा, हास्यचित्रांनी ‘जत्रा’ सजली आहे. अशोक मानकर, प्रवीन दवणे, मंगला गोडबोले, ज्युनियर ब्रह्मे मिलिंद शिंत्रे, नीला देवल, जनार्दन लिमये, दीपा मंडलिक, आनंद हरी, अभिजित पानसे, मधुकर फरांडे, डॉ. विनोद गोरवाडकर, प्रियदर्शिनी तगारे, पु. रा. रामदासी, श्रीनिवास शारंगपाणी, संजय साताळकर, नीता गोडबोले, डॉ. शिरीष भातलवंडे, विनय खंडागळे, रेखा शिधोरे, अविनाश चिकटे आदींच्या आरोग्यविषयक लेख, कथांनी हा अंक आरोग्यमय झाला आहे. राहुल अंभोरे यांची आकर्षक मुखपृष्ठ व खिडकी चित्रे मनमोहक आहेत.

 • संपादक : अभय कुलकर्णी
 • मूल्य : 200 रु., पृष्ठे : 238

माहेर

विविध क्षेत्रातील दिग्dगज, मान्यवर साहित्यिकांचे लेख हे बहुतांशी दिवाळी अंकामध्ये असतात.  मात्र, तरुणांना लिहिते करण्याचा प्रयत्न मेनका प्रकाशनच्या ‘माहेर’ या दिवाळी अंकात करण्यात आला आहे. दिवाळी अंकांच्या माध्यमातून अनेक तरुणलेख लिहिते होत आहेत. हा अंक मान्यवरांच्या लेख, कथांनी सजलेला आहे. कमलेश वालावलकर यांचा ‘महाभारतŠ एक विकारयात्रा आणि ‘पाणी ‘टाटां’च्या नव्हे, भीमेच्या हक्काचं’ हा सुकृत करंदीकर यांचा लेख हे या अंकाचे आहे. गोपाळ नांदुरकर यांचे आकर्षक मुखपृष्ठ आणि उत्कृष्ट छपाई असलेला हा अंक लक्ष वेधून घेतो.

 • संपादक : आनंद लक्ष्मण आगाशे
 • मूल्य : 200 रु., पृष्ठे : 244

दुर्गांच्या देशातून

 दुर्गप्रेमींना ‘दुर्गांच्या देशातून’ हा दिवाळी अंक आवडेल. दिनेश कोतकर यांनी कारगिलमधील   अवघड माऊंट कुनच्या मोहिमेचा वृत्तांत आपल्या ‘माऊंट कुन-रोमांचकारी समिट’ या लेखातून मांडला आहे. सायली गोडबोले-जोशी यांनी ‘दुर्ग दुर्गा जिजाऊ’ या लेखातून राजमाता जिजाऊंचे किल्ल्यांशी असलेले नाते स्पष्ट केले आहे. विशाल सावंत यांनी ‘फोटोग्राफरच्या नजरेतून’ त्याला किल्ला कसा दिसतो, हे लेखातून मांडले आहे. तसेच मेधा कानिटकर, घनश्याम ढाणे, प्रसाद खाडिलकर, डॉ. माधव पोतदार, अशोक पवार-पाटील, नितीन बाळपाटकी, डॉ. मंगेश कश्यप, महेश बुलाख, नामदेव धिंडले आणि प्रतीक पुरी आदींच्या लेखांमुळे इतिहासाची ओळख होते.

 • संपादक : संदीप तापकीर, योगेश काळजे
 • मूल्य : 200 रु., पृष्ठे : 120

स्वरप्रतिभा

हा ‘जन्मशताब्दी विशेषांक’ आहे. अंक संगीताला समर्पित करण्यात आला आहे. अंकात  दिग्ग्जांची दुर्मिळ छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. याबरोबरच साहित्य, अभिनय, समाजसेवा, विज्ञान, शिक्षण, अशा क्षेत्रातील नामवंत तसेच शताब्दी पूर्ण करणाऱ्या घटना आणि संस्थांचा वेध घेण्यात आला आहे. ‘सदाबहार गीत पारिजात’, एक जिप्सी’, ‘शोले’चे छायाचित्रकार’, सुर के बिना जीवन सूना’, ‘मराठी शारदेचा कंठमणी’ यांसह आदी लेखही वाचनीय आहेत.

 • संपादक : प्रवीण वाळिंबे
 • मूल्य : 250 रु., पृष्ठे : 180

आवाज

विनोदी अंकांच्या मांदियाळीत ‘आवाज’ दिवाळी अंकाचे स्थान नेहमीच अग्रेसर असते. मुखपृष्ठावर ‘आवाज’ला शोभेलशी खास खिडकी दरवर्षीप्रमाणे मस्त. या अंकात हास्यचित्रमालिका, कथाचित्रे, व्यंगचित्रे, हास्यचित्रे यांची रेलचेल असते. टिंगलगाणीतून खास टोले दिलेले आहेत. डॉ. यशवंत पाटील, संतोष पवार, मंगला गोडबोले, श्रीकांत बोजेवार, अवधूत परळकर, सुधीर सुखटणकर, नीलेश मालवणकर, दीपा मंडलिक आदींचे कथा, लेख अप्रतिम. व्यंगचित्रांच्या आतल्या खिडक्या नेहमीसारख्याच चटकदार आहेत.

 • संपादक : भारतभूषण पाटकर
 • मूल्य : 280 रु., पृष्ठे : 236

।। श्री स्वामिकृपा ।।

यंदाचा अंक स्वामिभक्तांकरिता ‘श्रीस्वामी समर्थ : चरित्र आणि चरित्रकार’ हा विषय घेऊन आला आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या सान्निध्यात राहिलेल्या काही भाग्यवंतांच्या हातून श्री स्वामींच्या चरित्रलेखनाचे कार्य घडले. त्यातील महत्त्वपूर्ण चरित्र आणि चरित्रकारांचा समग्र परिचय या विशेषांकातून करून दिला आहे. ‘श्रीपादभूषण’ या सर्वात पहिल्या चरित्राचा परिचय या अंकात करून दिला आहे. स्वामी समर्थांचे पहिले (आद्य) गद्य चरित्रकार नारायण हरी भागवत यांचा परिचय, श्रीस्वामी समर्थ बखर, श्री गुरुलीलामृत आदी लेख वाचनीय आहेत. श्री गुरुलीलामृत या ग्रंथाचा इतिहास व पूर्ववृत्त यांचा समावेश अंकात आहेत.

 • संपादक : विवेक दिगंबर वैद्य
 • मूल्य : 180 रु., पृष्ठे : 180

चौफेर साक्षीदार

कादंबरी, कथा, लेख, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, कविता असे विविधरंगी अंतरंग या अंकात मिसळून गेले आहेत. कुंडलिनी सिद्धयोगाचे महाज्ञान (वैशाली पटवर्धन), आनंदयात्री रवींद्रनाथ टागोर (संयोगिता पवार) हे वैचारिक लेख तसेच संत नामदेव (मधू भांडारकर), विठ्ठलाचा वारकरी (प्रभाकर झळके), ब्रॅण्डनेमचा भुलभुलैया (अरविंद जोगळेकर) हे लेख माहितीपूर्ण आहेत. तसेच रमणीय युरोप (प्रकाश लब्धे) हे प्रवासवर्णन मस्त आहे. अशोक सुतार यांनी चितारलेले मुखपृष्ठ राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे आहे.

 • संपादक : सत्यवान तेटांबे
 • मूल्य : 200 रु., पृष्ठे : 240

धर्मभास्कर

यावर्षीच्या अंकातील स्वामी विवेकानंदांचा भक्तियोग (गुरुदेव शंकर अभ्यंकर), जातीवाद : आज, काल, उद्या (दादूमिया), ज्ञानेश्वरी आणि गीतारहस्य (डॉ. मोहन बांडे), शिवाजी चरित्रास भावे स्मरावे! (दुर्गेश परूळकर), मोहीम सूर्यावरची (श्रीराम शिधये), राधा-कृष्ण (श्रीराम बढे) हे लेख विचारमंथन करतात. याखेरीज डॉ. बाळ फोंडके, मृणालिनी केळकर, डॉ. मल्हार कावळे, डॉ. विनोद गोरवाडकर, वृंदा दिवाण, शमा आचार्य, शुभदा साने, प्रियंवदा करंडे, भा. ल. महाबळ, डॉ. सुलभा पागे-केंकरे यांच्या कथा वाचकांना आनंद देणाऱ्या आहेत.

 • संपादक : ऋतावरी तुळापूरकर
 • मूल्य : 90 रु., पृष्ठे : 226
आपली प्रतिक्रिया द्या