दृष्टिदात्यावरचा चरित्रपट

44

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

एखाद्याच्या आयुष्याचा अखंड पटच ज्वलंत असतो. त्याचं कर्तृत्व, त्यानं आयुष्यात केलेला संघर्ष हे सगळंच इतकं प्रेरणादायी असतं की, त्यावर सिनेमा बनवावा असा मोह कोणालाही होऊ शकतो आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातलं जाज्वल्य प्रेक्षकांनाही गुंतवून ठेवण्यास सक्षम असतं. ऐकताना अतिशय प्रभावी वाटणारं व्यक्तिमत्त्व जेव्हा लेखणीतनं उतरतं तेव्हा ते वाचताना त्यातले प्रसंग आपण कल्पनेने डोळ्यांसमोर उभे करतो. त्यामुळे त्यातही ती चित्तथरारकता अनुभवता येते. पण जेव्हा त्याचा सिनेमा होतो तेव्हा सिनेमाची मांडणी, त्यातला अभिनय, दिग्दर्शन या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. या सगळय़ामुळे मूळ कथेला किंवा व्यक्तिमत्त्वाच्या सादरीकरणाला बाधा येऊ शकते. पडद्यावर आपल्याला घडलेले प्रसंग पुन्हा उभे करून नाट्यमयरीत्या दाखवले जातात, पण ते दाखवत असताना त्यात कधी अतिरंजितपणा तर कधी दृष्यातला नेमकेपणा साधता न आल्याने त्या सिनेमाच्या गांभीर्याला बाधा येऊ शकते.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डॉक्टर तात्यासाहेब लहाने… अंगार… पॉवर इज विदिन’ या सिनेमाचं तसंच काहीसं झालंय. पद्मश्री तात्यासाहेब लहाने यांचं कर्तृत्व बऱ्याच जणांना परिचित आहे. डोळय़ांची विक्रमी ऑपेरशनं करण्यातनं त्यांच्या नावाची गिनीज बुकमध्ये असणारी नोंद किंवा गावापाड्यात जाऊन गोरगरीबांवर शस्त्र्ाक्रिया करायचं त्यांचं कार्य, आयुष्यात खाल्लेल्या खस्ता हे सगळं जणू एखाद्या चित्रपटासारखंच आहे. पण बोलाचालीतून त्यांचं आयुष्य चित्रपटासारखं आहे असं म्हणणं आणि प्रत्यक्षात ते पडद्यावर मांडणं यात फरक पडतो. मुळात दिग्दर्शकाने त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षाचे सगळे प्रसंग खूप मेहनतीने गोळा केले आहेत. त्यातल्या नाटय़मयता असणाऱ्या प्रसंगांना एकत्रही बऱ्यापैकी बांधलंय. पण हा सिनेमा तात्यासाहेबांच्या जन्मापासनं ते त्यांच्या पद्मश्रीपर्यंतच्या प्रवासापर्यंत सरळधोपट चालत राहतो आणि त्यामुळे म्हणावी तशी पकड बसत नाही. जेव्हा एखाद्याचं आत्मकथन सिनेमात मांडलं जातं तेव्हा काही प्रसंग घेऊन त्याभोवती सिनेमाचं नाट्य फिरलं तर सिनेमा म्हणून त्या कलाकृतीला एक वजन येतं. पण इथे खूपच सरळधोपट पद्धतीने मांडणी केली गेली आहे.

उदाहरणार्थ जेव्हा त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असं कळतं तेव्हा घरावर सुतकी कळा पसरते किंवा जेव्हा आई किडनी देऊ करते तेव्हा ती मुलाला बघायला धाव घेते हे सगळे प्रसंग रंजित केले गेले आहेत. त्यात खरेपणा असला तरी प्रत्यक्षात त्या प्रसंगाची जेवढी गहनता होती तेवढी पडद्यावर उतरलेली नाही. काही संवाद किंवा दृष्यांमधनं नर्मविनोद साकारला आहे. ते बघायला छान वाटतं. म्हणजे गंभीर प्रसंगातही किंचित हसू येतं.

अभिनयाच्या बाबतीत म्हणावं तर मकरंद अनासपुरेने त्याच्या नेहमीच्या शैलीत डॉक्टरांची भूमिका साकारली आहे. त्याच्या शैलीत तोच तोचपणा अटळ असला तरी या भूमिकेत मात्र तो चपखल बसलाय. सर्व सिनेमा डॉक्टरांच्याच आयुष्यावर बेतला असल्याने बाकीच्यांना तसा आवाका कमी आहे. डॉक्टर रागिणीची भूमिका साकारलेली निशिगंधा वाड मोजक्या प्रसंगांत ठाकठीक वावरली आहे, तर अलका कुबलने आईची भूमिकाही बरी निभावली आहे. पण इतर सर्व कलाकार हे पढवल्यासारखे वावरतात. त्यामुळे दृष्यांच्या गहनतेत बाधा येते.

अर्थात, हा सिनेमा पाहताना उभ्या केलेल्या प्रसंगातनं लहानेंच्या आयुष्यातला संघर्ष काय होता आणि किती कठीण आयुष्य त्यांनी पाहिलं हे सगळं आपल्या समेर उभं राहतं. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग जाणून घ्यायचे असतील तर हा सिनेमा नक्की पाहावा. सिनेमा म्हणून त्या प्रसंगांची गुंफण अधिक चांगली करता आली असती तर हा सिनेमा नक्कीच प्रभावी ठरला असता, पण त्याच्या मांडणीमुळे तो खूप पुस्तकी झालाय. एकूणच हा सिनेमा डॉक्टरांवरच्या आयुष्यावर, त्यांच्या कर्तृत्वावर एका ध्येयाने बनवला गेला आहे. त्यामुळे सिनेमा करमणुकीसाठी बघण्याऐवजी एवढं महान व्यक्तिमत्त्व असणाऱया व्यक्तीचा आयुष्यपट जाणून घ्यायचा असेल तर हा सिनेमा बघायला काहीच हरकत नाही.

दर्जा – अडीच स्टार
चित्रपट – डॉ. तात्यासाहेब लहाने… अंगार…. पॉवर इज विदिन
निर्माते/दिग्दर्शक – विराग मधुमालती वानखेडे
लेखक – विराग मधुमालती वानखेडे, जवाहर खंदारे
कॅमेरा – माधवराज दातार
संगीत – एक हिंदुस्थानी
कलाकार – अलका कुबल, डॉ.निशिगंधा वाड, मकरंद अनासपुरे, भारत गणेशपुरे, रमेश देव

आपली प्रतिक्रिया द्या