अमूल्य मोत्यांची ओंजळ

>> क्षितीज झारापकर

‘आम्ही आणि आमचे बाप’ आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे या दोन बापमाणसांच्या कलाकृतींची लोभसवाणी गुंफण.

काही नाटकं ही लेखकांच्या लिखाणावर गाजतात. काही दिग्दर्शकाच्या कौशल्यावर चालतात, तर काही नटनटय़ांच्या लोकप्रियतेवर अवलंबून असतात. पण एखादीच कलाकृती अशी असते जी केवळ मराठी भाषेवर आणि त्यातील बाप माणसांवर अवलंबून असते. ‘आम्ही आणि आमचे बाप’ ही अशी कलाकृती आहे. हे नाटक नसून ज्यांनी आपल्याला मराठी भाषेतून विलक्षण आनंद दिला त्या थोरामोठय़ांचा ऋणनिर्देश आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आणि पु. ल. देशपांडे ही दोन व्यक्तिमत्त्वे प्रत्येक मराठी मनात अशी काही रुजली आहेत, जणू घरातल्या देव्हाऱयातल्या मूर्ती. घराघरातल्या देव्हाऱयातले देव भिन्न असू शकतील, पण मराठी मनाच्या देवघरात या दोघांना पर्याय नाही.

मुळात आचार्य अत्रे आणि पु.ल. यांची तुलना शक्य नाही. इतरांशी तर नाहीच, पण एकमेकांशीही नाही. दोघांमधलं साम्य इतकंच की दोघं हरहुन्नरी अवलिये. पत्रकारिता, नाटय़लेखन, चित्रपट लेखन आणि दिग्दर्शन, संगीताशी सलगी. सामाजिक भान व कार्य आणि जबरदस्त विनोदबुद्धी हे सगळं या दोघांमध्ये समसमान. पण दोघांच्या वैचारिक बैठकीत खूप फरक होता. हा फरक उणे-अधिकचा नाही. पिढी-पिढीतला आहे. या संदर्भात पु.लं.नी एका ठिकाणी एक उल्लेख केलेला सापडतो. पु.लं. लहान होते तेव्हा जोगेश्वरीला त्यांच्या आजोबांच्या- ऋग्वेदींच्या घरी सुट्टीत जायचे. तिथे रात्रीची जेवणं आटोपली की देवळातली घंटा वाजायची. तिथे होणाऱया व्याख्यानाची ती नांदी असायची. एकदा पु.ल. व्याख्यानाला गेले असता दृश्य असं होतं की, एक राजबिंडा वक्ता सुटबूट घालून जमलेल्या लोकांसमोर एका अत्यंत गंभीर विषयावर बोलतोय आणि श्रोतागण मुरकुंडी वळेपर्यंत हसतोय. पु.लं. म्हणतात की, त्या दिवशी मला कळलं की आपण बोलत असताना समोरच्या लोकांवर आपला परिणाम कसा असायला हवा. ते वक्ते होते प्रल्हाद केशव अत्रे. त्यामुळे या दोघांच्यात किमान एका पिढीचा फरक होता.

आचार्य अत्र्यांचा काळ भाबडय़ा महाराष्ट्राचा काळ होता. शिक्षण तर दूर, साक्षरताही खूप नव्हती. पुरुषोत्तम देशपांडे पु.लं. झाले तेच मुळात महाराष्ट्र शिकून प्रगत होत होता तेव्हा. म्हणूनच दोघांच्या वैचारिक बैठकीत फरक आहे. आमच्या पिढीकरता अत्रे हे कठोर, पण दिलखुलास प्राचार्य आहेत तर पु. लं. हे आमच्याबरोबर कटिंग चहा घेणारे प्रोफेसर आहेत. पण मराठीबाबत आम्हाला जी आपुलकी आणि अभिमान आहे तो या दोघांमुळेच आहे हे निश्चित आणि म्हणूनच आमच्या पिढीतील लौकिकार्थाने त्यांच्या सर्वाधिक जवळ गेलेल्या काही अग्रगण्य रंगकर्मींनी त्यांना ऋणनिर्देश म्हणून ‘आम्ही आणि आमचे बाप’ हा कार्यक्रम सादर करावा हे रास्तच आहे. ‘आम्ही आणि आमचे बाप’च्या लिखाणाबाबत काहीही लिहिणं म्हणजे अत्र्यांच्या भाषेत या बाप लोकांच्या ताजमहालाला आपल्या विटा जोडण्यासारखं आहे. ‘आम्ही आणि आमचे बाप’चा सर्व कॉन्टेन्ट हा या दोघांच्या साहित्यातला आणि कलाविष्कारातला आहे. अतुल परचुरे, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री आणि अजित परब यांनी सादर केलेला हा कार्यक्रम आहे. पैकी अतुल परचुरे अणि आनंद इंगळे या दोघांनी खुद्द पु.लं. साकारलेत. पुष्करने नवीन संचातल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकातून नाथा कामत केलाय. अजित परब याने असंख्य गायनाच्या मैफलींमधून दोघांशी संबंधित गाण्यांचा अभ्यास केलेला आहे. चौघांनी मिळून एक छानशी मिसळ ‘आम्ही आणि आमचे बाप’च्या निमित्ताने आपल्यासमोर मांडलीये. यात कोटय़ा, संदर्भ, नाटय़प्रवेश, गाणी, गप्पा आणि मुख्य म्हणजे हल्ली लोप पावत चाललेला अभिवाचनाचा समावेश आहे. अतुल आणि आनंद आपल्या लख्ख वाणीने, पुष्कर आपल्या लवचीक अभिनयाने आणि अजित आपल्या मखमली आवाजाने ही मिसळ रुचकर करतात. त्यात अतुलने अत्रेंच्या ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकामधील प्रवेश करताना केलेला भन्नाट मुद्राभिनय म्हणजे पर्वणी आहे. खरं तर या प्रवेशात आनंद खूप बोलतो. पण त्यातही अतुलने जे काही केलंय ते कमाल आहे. आनंदने ‘वाऱयावरची वरात’मधील साक्ष मूर्तिमंत पु.लं.ची आठवण करून देणारी साकारलीये. अजित परब स्वल्पविरामासारखी एकाहून एक छान गीतं सादर करतो. पुष्करने ‘तो मी नव्हेच’मधला नापणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे अत्यंत प्रामाणिकपणे सादर केलाय.

राजन भिसे यांनी इतक्या विस्तीर्ण स्कोपच्या कार्यक्रमाला अत्यंत कल्पक नेपथ्य पुरवलंय. किंबहुना नेपथ्याने नाटकावर मात न करत त्याला पूरक कसं असावं हे भिसेंच्या कामातून इथे दिसतं. ही मोट बांधणारे आदित्य इंगळे यांनी प्रत्येक प्रस्थापित कलाकाराला योग्य न्याय मिळेल अशी बांधणी केलेली आहे. त्यात सादरीकरणाचा बाज कट्टय़ावरच्या गप्पांचा असल्याने एकमेकांना कोपरखळ्या, कानपिचक्या आणि चिमटेदेखील आहेत. सामान्य प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा विचार करता ते सगळं गरजेचंही आहे. आदित्यने ‘दोन दिग्गजांचं कार्य’ हा फोकस ठेवून खूप सुंदर गुंफण केलेली आहे. कुठेही फार वाहवत न जाता ‘आम्ही आणि आमचे बाप’ आचार्य अत्रे आणि पु.लं.ची महती आपल्याला दाखवून देण्यात नक्कीच यशस्वी होतं. आदित्यने केलेली साहित्याची व इतर गोष्टींची निवड ही त्याने केलेल्या विचाराशी मेळ खाणारी आहे. त्याबाबत पुन्हा काहीही बोलणे व्यर्थ ठरेल. इथे समुद्रातून एखादा एक ओंजळ पाणी उचलून आपल्याला दाखवतोय. दुसरा एखादा दुसरी ओंजळ उचलेल. त्यात वेगळं पाणी असेल. पण एकंदरीत ‘आम्ही आणि आमचे बाप’ची ही भरलेली ओंजळ लोभसवाणी आहे यात शंकाच नाही.

नाटक- आम्ही आणि आमचे बाप
दर्जा – अडीच स्टार
निर्मिती – आदि कल्चर टेनमेंट आणि अष्टविनायक निर्मित
निर्माते -मयूर रानडे, दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर
नेपथ्य, वेशभूषा- राजन भिसे
संकलन, दिग्दर्शन -आदित्य इंगळे
कलाकार- अजित परब, पुष्कर श्रोती, अतुल परचुरे, आनंद इंगळे