रसिकहो : मुरलेल्या लग्नाचा ग्लॅमरस सोहळा

2398

>> क्षितीज झारापकर

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’. मुरलेल्या, अनुभवी कलाकारांनी रंगवलेले खुमासदार नाटक. आपल्या नाटय़सृष्टीतील सर्व नाटय़गृहांचे ‘आजचा खेळ हाऊसफुल्ल’ हे बोर्ड अडगळीच्या खोलीत कोळीष्टकांच्या सान्निध्यात धूळ खात पडले आहेत. ही रड गेली काही दशकं सुरू आहे. क्वचित एखादं नाटक येतं आणि पहिल्या काही प्रयोगांसाठी हा बोर्ड दिमाखात बाहेर काढला जातो. पुसून चमकवून कौतुकाने टांगला जातो, पण अल्पावधीत तो पुन्हा त्याच अडगळीच्या खोलीतल्या कोपऱयात सरकवला जातो. तरीही आपल्या नाटय़सृष्टीत एक नाव मात्र असं आहे की, जे सातत्याने या हाऊसफुलच्या बोर्डाला ताजी हवा खायला बाहेर काढतं. या नटाचं प्रत्येक नाटक हा बोर्ड लावूनच जन्माला येतं आणि त्या नाटकाचा बोर्ड उतरेपर्यंत हा नट नवं बोर्ड लागणारं नाटक घेऊन सज्ज असतो. हा नट म्हणजे रसिकांचा लाडका नाटकस्टार प्रशांत दामले. मराठी चित्रपट, मालिका किंवा नाटय़सृष्टीत दुसरा कोणीही कलाकार नाही ज्याच्या नव्या प्रोजेक्टची प्रेक्षक प्रशांत दामलेंच्या नव्या नाटकाइतक्या आतुरतेने वाट पाहातात. प्रशांतने गेली पस्तीस वर्ष सातत्याने सकस आणि मनोरंजनात्मक नाटकं देऊन रसिकांचा प्रचंड विश्वास मिळवलेला आहे. आज आपण एका नाटकाचं समीक्षण त्या नाटकाचे तब्बल दोनशे प्रयोग झाल्यानंतर करणार आहोत. आजवर कधीही हे असं घडलेलं नाही. प्रश्न येतो की आता का? दोनशे प्रयोगांनंतर समीक्षण कशासाठी? याचं स्पष्टीकरण खरं तर देण्याची गरज नाही, पण एखादं नाटक सर्वच्या सर्व दोनशे प्रयोग हाऊसफुल्ल होतं, ते का? हे दोनशे प्रयोग झाल्यावरच समजू शकतं हे मुख्य कारण आणि या दोनशे प्रयोगांपैकी बरेच प्रयोग हे जगभर झालेले आहेत आणि तिथेही सर्व प्रयोग हाऊसफुल झाले आहेत. नाटक सुरू झालं 2018च्या ऑक्टोबर महिन्यात म्हणजे अजून वर्षही झालेलं नाही. केवळ साडे नऊ – दहा महिन्यांत प्रशांत दामले यांच्या या नव्या नाटकाने हे सगळं घडवलेलं आहे. हे नाटक आहे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’.

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे सिक्वेल नाटक आहे, कारण नाटकाची मुख्य पात्रं मन्या आणि मनी हे श्रीरंग गोडबोले यांनी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकातून रसिकांच्या मनात उतरवलेली आहेत. नाटकातली गाणी अशोक पत्कींनीच स्वरबद्ध केलेली आहेत. साधारणपणे लग्नाला सतरा-अठरा वर्ष झालेल्या जोडप्याच्या आयुष्यात येणाऱया मिडलाइफ क्रायसिसवर बेतलेलं नाटक आहे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’. अद्वैत दादरकरने हे नाटक परफेक्टली कमर्शियल बाजात क्राफ्ट करून लिहिलेलं आहे. नाटक लिहिताना लेखकाला त्यात कोण कलाकार काम करतील हे माहीत असेल तर नाटक लिखाणातून किती नेमकं तरू शकतं याचं सुंदर उदाहरण म्हणजे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’. अद्वैतने दिग्दर्शनातही नाटक अत्यंत हलतं फिरतं ठेवलेलं आहे. नाटकात मन्याच्या प्रमुख भूमिकेत प्रशांत दामले आहेत. पण ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हा एकखांबी तंबू नाही हे विशेष आहे. नॉर्मली सुपरस्टारच्या बरोबरची पात्रं हे बुजगावणी स्वरूपाची असतात, पण इथे मात्र तसं अजिबात नाही. इथे प्रशांत दामले हे हिंदुस्थानी क्रिकेट संघातल्या महेंद्रसिंग धोनीसारखे एका ऍन्करच्या भूमिकेत आहेत. नाटक ते कंट्रोल करतात, पण इतर पात्रांवर हावी होत नाहीत. हे खूप छान आहे. अतुल तोडणकर या कलाकाराचं विशेष कौतुक. त्याचं पात्र हे हीरोची साईडकिक म्हणून येतं, पण अतुल तोडणकर त्याच्या वर उठून आपलं पुरूचं पात्र लाक्षणीय करतो. मृणाल चेंबूरकरदेखील हेच साध्य करते. त्यामुळे नाटक अत्यंत रंजनीय होतं. नवीन अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर ही विशेष लक्षात राहते. प्रतीक्षा या नाटकात सेकंड हीरॉईन आहे. तिने हे पात्र खूप प्रामणिकपणे साकारलेलं आहे. राजसिंह देशमुख आणि पराग डांगे हे देखील आपापल्या छोटेखानी पात्रांतून खेळ रंगवण्यात कसूर करत नाहीत. नाटकातलं मनीचं पात्र खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या नाटकातली मनी, कविता लाड इथेही मनी साकारते आहे. चंद्रलेखेच्या ‘घरोघरी’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर जवळजवळ पंचवीस वर्षांपूर्वी आलेली कविता ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’मध्ये मात्र तिने तिचं प्राइमटाइम गाठल्यासारखं दिसतं. एकतर इथे मनी सूत्रधार आहे आणि कविता खरोखर या नाटकाची सूत्रं हाती घट्ट धरून उभी राहते.

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ म्हणजे एक सोहळा आहे. एका लग्नाची गोष्ट या लोकप्रिय नाटकाचा प्रेक्षकांचा नॉस्टॅल्जिया आणि त्यांना त्यांच्या निस्सीम प्रेमाची परतफेड करण्याचा एका सुपरस्टार आणि त्याच्या सहकाऱयांचा प्रामाणिक प्रयत्न याचा सोहळा. हा सोहळा आतोनात रंगतो आणि सगळ्यांना मनसोक्त आनंद देऊन जातो. दहा महिन्यांमध्ये दोनशे प्रयोग, अख्खं जग पादाक्रांत करणे आणि सर्वच्या सर्व प्रयोग हाउसफुल होणे हे फक्त कडक शिस्तिमुळेच शक्य होते. या करता प्रशांत दामले फॅन फांऊडेशन, गौरी थिएटर्स आणि झी मराठीचे आभार.

नाटक- एका लग्नाची पुढची गोष्ट
निर्मिती- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन, गौरी थिएटर्स, सरगम प्रकाशित.
प्रस्तुती- झी मराठी
लेखक-दिग्दर्शक – अद्वैत दादरकर
सूत्रधार- अजय कासुर्डे
संगीत- अशोक पत्की
कलाकार- कविता मेढेकर, मृणाल चेंबुरकर, प्रतीक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे, अतुल तोडणकर, प्रशांत दामले.
दर्जा – तीन स्टार

आपली प्रतिक्रिया द्या