महाभारतातील उपेक्षितांची गोष्ट – ‘घटोत्कच’

2928

>> क्षितीज झारापकर

हिडिंबा आणि घटोत्कच या पात्रांच्या आधारे महाभारत आजच्या काळाशी जोडण्याचा एक वेगळा प्रयत्न.

महाभारत हे एक सर्वसमावेशक महाकाव्य आहे. महाभारतात आपल्याला सगळंच आढळतं हे त्याच्या महानतेचं कारण आहे. व्यासांनी महाभारत रचताना किती व्यापक विचार केला असेल याची केवळ कल्पना केल्यावर दिपून जायला होतं. महाभारतातील प्रत्येक पात्र परिपूर्ण आहे, प्रत्येक घटना सूचक आहे आणि प्रत्येक विचार मानवतेला बरंच काही शिकवणारा आहे. महाभारताचा भाग असलेला भगवद्गीता हा भाग आपला धर्मग्रंथ आहे हे त्याचंच द्योतक आहे. म्हणूनच हजारो वर्षं उलटून गेल्यावरही महाभारत आपल्याला अजूनही भुरळ घालत आहे. या सगळ्याचा उल्लेख इथे का केला तर महाभारतातल्या पात्रं आणि घटनांवर बेतून हिंदुस्थानच्या कलाविश्वात आजवर असंख्य कलाविष्कार घडवले गेले आहेत. भीष्म, विदुर, कुंती, गांधारी, अर्जुन, दुर्योधन, कर्ण आणि अर्थात श्रीकृष्ण ही त्यातली ठळक पात्रं. प्रत्येक रचनाकाराने त्याच्या परिपेक्षातून या पात्रांना, त्यांच्या भोवतीच्या घटनांना मांडलं. सर्व शक्य मनुष्यस्वभावविशेष आणि मानवसंबंधी घटनांचा परिपोष म्हणजे महाभारत. असं असूनही हे महाकाव्य त्यातील कोणत्याच पात्रांचं उदात्तीकरण करत नाही किंवा दोष लपवत नाही. म्हणूनच महाभारत महान आहे. आज प्रायोगिक रंगभूमीवर एका तरुण रंगकर्मीने महाभारतातील भीमपुत्रावरच एक नाटक मांडलं आहे. हे नाटक आहे ‘घटोत्कच’.

घटोत्कच हे आशुतोष दिवाण लिखित नाटक आहे. पांडवपुत्र भीम आणि अरण्यकन्या हिडिंबा यांचा राक्षसपुत्र म्हणजे घटोत्कच. आशुतोष दिवाण यांनी घटोत्कच लिहिताना स्वतःचा असा एक खूप वेगळा दृष्टिकोन ठरवलेला आहे. दिवाण यांनी घटोत्कच अरण्यातल्या आदिवासी जमातींचा प्रतिनिधी म्हणून उभा केला आहे. त्याची आई राक्षससम्राज्ञी हिडिंबा ही भीमाने उपेक्षित केल्याने क्षोभित आहे. मुळात दिवाण यांच्या घटोत्कचमधलं प्रत्येक पात्र रागावलेलं आहे. महाभारतातील हिडिंबा हे स्त्रीसामर्थ्याचं एक विलक्षण प्रतीक आहे. चेतन दातार यांनी आधी माता हिडिंबा या पात्रावर बेतलेले प्रायोगिक नाटक प्रभावीपणे सादर केलंय. ‘घटोत्कच’ हे नाटक हिडिंबेच्या मुलाचं घटोत्कचाचं आहे आणि त्यात माता फक्त पहिल्या प्रवेशाच्या सुरुवातीला येते. पण मातेचा पवित्रा क्षोभात्मक घडवल्याने मग पुढे संपूर्ण नाटकाचा भाव क्षोभात्मक झालाय. लेखकाला तसं कदाचित अभिप्रेत नसेलही पण दिग्दर्शक अभिजित झुंझारराव याने तो तसा मांडलाय असं म्हणावं लागेल. घटोत्कच नाटकातलं प्रत्येक पात्र जबरदस्त संताप बाळगून ओरडून व्यक्त होतं. म्हणून नाटक खूप आक्रस्ताळीपणाचं वाटतं. याला ओव्हर द टॉप शैली असंही म्हणतात, पण त्या शैलीत ओव्हर द टॉप अंडरप्लेही संभवतो हे नाटकात कुठेच दिसत नाही. नाटक कुरुक्षेत्रावरच्या पांडवांच्या निर्णायक युद्धाच्या समयीचं आहे. कदाचित म्हणून सगळ्याच पात्रांची अशी संतापलेली मनःस्थिती दाखवण्याचं योजलं असेल.

अभिजित झुंझारराव यांनी या संघनाटय़ाला एक विलक्षण सुंदर दृष्यात्मकता प्रदान केली आहे. अभिजितने नाटक फॉर्मेशन अणि कोरियोग्राफीच्या खूप मस्त कॉम्बिनेशनमध्ये उभारलंय. त्यामुळे ते बघायला नेत्रदीपक अणि भव्य वाटतं. ही भव्यता झुंझारराव यांनी प्रायोगिक नाटकांच्या छोटय़ा रंगमंचावरही साधली आहे हे विशेष आणि कौतुकास्पद आहे. घटोत्कच हे नाटक आपल्याला पटेल न पटेल हा भाग वेगळा. हे नाटक आपल्याला एक विलक्षण नाटय़ानुभव देतं हे निश्चित. कॉम्पोझिशनमध्ये नाटक साकारणं कठीण काम आहे. एकदा का तुम्ही हा फॉर्म ठरवलात की नाटकातलं प्रत्येक दृष्य तुम्हाला कम्पोझ करावंच लागतं. अभिजितने हे उत्तम साध्य केलेलं आहे. त्याला यात मोलाची साथ मिळते ती ‘घटोत्कच’चा तरुण संगीत दिग्दर्शक आशुतोष वाघमारे याची. लाईव्ह संगीत ही घटोत्कचची सर्वात जमेची बाजू आहे. नाटक संपल्यावरही खूप वेळ नाटकाचं संगीत आपल्या डोक्यात रेंगाळतं हे आशुतोष वाघमारे याचं यश आहे. घटोत्कच नाटकाचा प्रत्येक क्षण त्याने भन्नाट पार्श्वसंगीताने अधोरेखित करून अत्यंत परिणामकारक केलाय. अलीकडच्या काळात प्रायोगिक आणि व्यावसयिक रंगभूमीवर इतकं प्रभावी संगीत दिग्दर्शनाचं इतर उदाहरण माझ्या माहितीत नाही. घटोत्कचच्या दृष्यात्मकतेत भर घालतात त्या आणखीन दोन तांत्रिक गोष्टी. तृप्ती झुंझारराव यांची कल्पक वेशभूषा अणि श्याम चव्हाण यांची नेमकी आणि प्रभावी प्रकाशयोजना. दोन्ही गोष्टी नाटकाचा नाटय़ानुभव अधिक प्रभावी करतात. तृप्तीने फक्त अरण्यवासीयांसाठी वापरलेले रंगीत अणि इतर पात्रांना दिलेले एका रंगाचे पोशाख लक्षात राहतात. श्याम चव्हाण यांनी सादरीकरणातला क्षोभ लक्षात घेता वापरलेला लाल प्रकाश परिणामकारक आहे.

‘घटोत्कच’ हे समूहनाटय़ असल्याने सगळ्या कलाकारांचा इथे उल्लेख शक्य नाही. संपूर्ण समूहाने दिग्दर्शकाला हवं असलेलं साध्य केलं तरच अशा प्रकारचं नाटक प्रभावी होऊ शकतं. तसं ‘घटोत्कच’ पूर्णपणे प्रभावी आहे. राजस पंधे, ऋचिका खैरनार, सरिता साने, हरीष भिसे, राहुल शिरसाट, श्रेयसी वैद्य, सायली शिंदे, ही मुख्य भूमिका बजावणारी सर्व मंडळी कमालीच्या ऊर्जेने सामोरी येतात अणि त्यांच्या कामगिरीला सुंदर केंदणात ठेवून बाकीची मंडळी आपल्या समोर मांडतात असा एक छान अनुभव म्हणजे ‘घटोत्कच’!

मात्र या सगळ्याला वर्तमानाशी जोडण्याचा लेखक आणि दिग्दर्शकाचा प्रयत्न मात्र बालिश वाटतो. ते नसतं तरी फार काही अडलं नसतं कारण घटोत्कचची गोष्ट त्या आधीच संपलेली असते. कर्ण अणि अभिमन्यू या पात्रांचा परिप्रेक्षही संभ्रम निर्माण करणारा जाणवतो आणि या सगळ्यातूच मग नाटकाच्या दृष्टिकोनाचा प्रश्न निर्माण होतो. तरीही ‘घटोत्कच’ हा एक विलक्षण नेत्रसुखद अनुभव आहे हे निश्चित.
नाटक घटोत्कच
निर्मिती अभिनय, कल्याण
लेखक आशुतोष दिवाण
संगीत आशुतोष वाघमारे
गीत प्रभाकर मठपती
प्रकाश योजना श्याम चव्हाण
नेपथ्य प्रदीप पाटील
वेशभूषा तृप्ती झुंझारराव
नृत्य सोनाली मगर, प्राची राठोड
दिग्दर्शक अभिजित झुंझारराव
कलाकार ऋचिका खैरनार, सरिता माने,
श्रेयसी वैद्य, सायली शिंदे, निखिल खाडे, राहुल शिरसाट,
संकेत जाधव, अभिनय पालखेडकर, राजस पंधे
दर्जा

आपली प्रतिक्रिया द्या