या नाटकाला रंगमंचाची अट नाही!

248

>>क्षितिज झारापकर
[email protected]

‘माझी बायको लय भारी’ या नाटकाचे वेगळेपण बऱ्याच गोष्टींनी अधोरेखित होते. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नाटय़संचाला नाटक सादर करण्यासाठी रंगमंच हवाच असे काही नाही.

मी लहान असताना एक सिनेमा आला होता ‘आनंद’. त्यात एक खूप फर्मास डायलॉग होता. ‘ये दुनिया एक रंगमंच है… हम सब इस रंगमंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर उपरवाले के हाथ में बंधी हुई हैं’. या वाक्यामुळे एक प्रश्न पडला ज्याचं उत्तर खऱ्या अर्थाने आजवर मिळालेलं नाही. ‘रंगमंच’ म्हणजे नेमकं काय? स्टेजक्राफ्ट ज्याला म्हटलं जातं त्यातल्या स्टेजची नक्की व्याख्या काय? ३० फूट बाय ४० फूट ही हल्लीच्या थियेटरची मापं ग्राह्य धरायची म्हटली तर पथनाटय़ हा प्रकार कोणत्याही रस्त्याच्या कडेला किंवा चक्क रस्त्यावरही साकारला जाऊ शकतो.

शिवशाही आणि पेशवाईच्या काळात आपापली लोककलेची पथकं घेऊन शाहीर मंडळी एखाद्या गावात दाखल होत. मग गावाच्या चावडीवर ढोलकीची थाप पडायची व खेळ सुरू व्हायचा असे उल्लेख सापडतात. आज जिथे शिवाजी मंदिर आणि बालगंधर्वसारख्या नाटय़गृहांमध्ये प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेपासून दहा, पंधरा फूट दूर पाच-पाच फूट उंचीवर सुसज्ज चौथरे नाटक सादर करण्यासाठी उपलब्ध आहेत, तिथेच एनसीपीएसारख्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या वास्तूत जेमतेम फूटभर उंच आणि प्रेक्षकांच्या जवळजवळ मांडीवरच नाटक सादर होतं. म्हणूनच हा प्रश्न की, ‘रंगमंच’ म्हणजे नेमकं काय? आणि या कन्फ्युझनमध्ये अधिक भर पडली ती एका नाटकाच्या जाहिरातीने. ठळक अक्षरात लिहिलं होतं ‘रंगमंचाची अट नाही’. हे नाटक होतं जिव्हाळा या संस्थेतर्फे निर्मित आणि आनंद म्हसवेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘माझी बायको लय भारी’.

मनुष्य स्वभावाच्या विविध छटांचे बारकावे अत्यंत जिव्हाळय़ाने टिपून आपल्या लेखनातून मांडणारे आनंद म्हसवेकर यांनी ‘माझी बायको लय भारी’ या त्यांच्या नवीन नाटकात संसारातील एका मर्मावर भाष्य केलेलं आहे. माणसाच्या मनात जसा शिवाजी नेहमी शेजारच्या घरात जन्माला यावा ही इच्छा असते, तशीच शेजारच्या घरातली बायको किंवा नवरा आपला असता तर? हा विचारही असतोच असतो. या गोष्टीचा अचूक उपयोग आनंद म्हसवेकर ‘माझी बायको लय भारी’मध्ये करतात. त्यात ते नाटकात येणाऱ्या पात्रांना वेगवेगळय़ा स्वभावात रंगवतात आणि गंमत करतात. असा आशय प्रेक्षकांना लगेचच आपलासा वाटतो. याचं कारण म्हणजे यात येणारी पात्रं ही आपल्या भोवताली फिरणारी असतात. त्यांच्या बद्दल लगेचच आत्मियता वाटू लागते आणि उत्सुकता वाढते.

आपल्या नवऱ्याच्या रक्तदाबाची किंवा मधुमेहाची (त्याला दोन्ही विकार नसतानाही) खूप काळजी करणारी आणि त्या काळजीपोटी डब्यात कार्ल्याची भाजी देणारी अतिदक्ष आणि प्रेमळ बायको आणि आपापले डबे एक्सचेंज करून आपापल्या बायकांना खूश ठेवून स्वतःला आवडेल तेच खाणारे नवरे ही पात्र लव्हेबल आणि अत्यंत ओळखीची आहेत यात शंकाच नाही. पण ‘माझी बायको लय भारी’ इथेच थांबत नाही. पुढे नाटकात कलाकेंद्रात संगीतबारीत रंगणारा नवरा, त्याची सहिष्णू बायको, नाचणारी नायकीण आणि तिची करुण कहाणी या नागर प्रेक्षकांना तशा अनोळखी गोष्टीही म्हसवेकर गुंफतात. यामुळेच हे नाटक फक्त प्रेक्षकांना आवडणाऱया आणि ओळखीच्या गोष्टी सांगण्याची युक्ती न राहता विषयाला धरून काहीतरी भाष्य करणारं मराठी नाटक बनतं. इथे आनंद म्हसवेकर जिंकतात.
पण मग याला ‘रंगमंचाची अट नाही’ हे काय आहे. त्याकडे वळण्याआधी आपण ‘माझी बायको लय भारी’ हे नाटक नक्की बेतलेलं कसं आहे हे बघूयात. दिग्दर्शक आनंद म्हसवेकरांनी नाटक हे लिखाण आणि अभिनय यांना प्राधान्य देत घडवलंय. सूचक नेपथ्याच्या सोयिस्कर भिंती सरकत येतात आणि हवा तो माहोल तयार करतात. पुढे काम कलाकार आणि त्यांचं अभिनयसामर्थ्य यांचं आहे. इथे बाजी मारून जाते ती नीता दोंदे ही हरहुन्नरी अभिनेत्री. ‘माझी बायको लय भारी’मध्ये नीता कमालीची विविधता दाखवून जाते. कजाग बायकोपासून ते तमाशाबारीतील नर्तिका आणि विवाहेच्छुक म्हातारीसुद्धा ती फन्टास्टिक सादर करते. नीता या नाटकात लक्षात राहते हे विशेष आहे. कारण तिच्यासमोर उभा आहे मराठी रसिकांचा लाडका संतोष पवार.

संतोषने ‘माझी बायको लय भारी’मध्ये सर्वात जास्त बहार आणलीये ती कलाकेंद्रात आपल्या नवऱ्याला शोधत आलेल्या घरंदाज बायकोच्या भूमिकेत. मुळात या नाटकात संतोष फक्त एक कलाकार म्हणून आहे. हे मात्र त्याने अत्यंत प्रामाणिकपणे पाळलेलं जाणवतं. त्याच्यातला लेखक किंवा दिग्दर्शक यामध्ये अजिबात डोकावत नाही हे खूप चांगलं आहे. या नाटकाचा आधारस्तंभ आहे नंदू गाडगीळ. नंदू हा खूप चांगला अभिनेता आहे. त्याच्या वाटय़ाला नीता आणि संतोष इतकीच पात्र या नाटकात आहेत आणि नंदूने प्रत्येक पात्राचं सोनं केलेलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून मराठी नाटय़सृष्टीत नाटय़गृहांची मागणी आणि नाटय़कृतींची संख्या यात तफावत येत आहे. परिणामी सगळय़ा नाटकांना धंदा होण्याजोग्या तारखांना नाटय़गृह मिळणं कठीण होत चाललंय. त्यात हल्ली आपल्या समाजात सगळंच घरपोच मिळण्याची प्रथा जोर धरू लागलीये.

आनंद म्हसवेकर या निर्मात्याने हे सगळं हेरून गेली कित्येक वर्षे एक नवा डाव मांडण्याचा पायंडा घातलाय. ‘रंगमंचाची अट नाही’ या घाटणीचं सादरीकरण करून त्यांनी मराठी नाटक मराठी प्रेक्षकांच्या अगदी अंगणात नसलं तरी सोसायटीच्या गच्चीवर किंवा मंडळाच्या सभागृहांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलंय. शेवटी नाटक म्हणजे तरी काय? जमलेल्या प्रेक्षकांसमोर अभिनयाच्या माध्यमातून मांडलेला विचार किंवा कथा. मग ज्या ठिकाणी सादर होणारा अभिनय प्रेक्षकांना नेमकेपणाने पाहता येऊन त्याचं आकलन करणं शक्य असेल असं कोणतंही ठिकाण म्हणजे रंगमंचच नाही का?

दर्जा : अडीच स्टार
नाटक : बायको माझी लय भारी
निर्मिती : जिल्हाळा
नेपथ्य : कृपेश राऊत
प्रकाश योजना : विनय म्हसवेकर
पार्श्वसंगीत : विद्याधर परसनाईक
लेखक, दिग्दर्शक : आनंद म्हसवेकर
कलाकार : नीता दोंदे, नंदू गाडगीळ, संतोष पवार

आपली प्रतिक्रिया द्या