सप्तसुरांचे नाटक ‘सागर सात सुरांचा’

2502

क्षितिज झारापकर, [email protected]

नवे संगीत नाटक. संगीत नाटकांनी मराठी रंगभूमीची शान वाढवली आहे. या सांगीतिक मेजवानीने नाटय़रसिक तृप्त होणार आहेत.

दिडशे वर्षांपेक्षाही जास्त वय असलेल्या अपल्या मराठी रंगभूमीचा जो देदीप्यमान सुर्वणकाळ मानला जातो तो म्हणजे संगीत नाटकांचा काळ. हा काळ खरोखर मंतरलेला काळ होता असं म्हटलं जातं. 1843 साली विष्णूदास भावे यांनी सीता स्वयंवर सादर केलं आणि या पर्वाला सुरुवात झाली आणि 1880 साली अण्णासाहेब किर्लोस्करांनी शाकुंतल सादर केलं आणि ही उज्ज्वल परंपरा सुरू झाली. दीनानाथ मंगेशकर, पं. जितेंद्र अभिषेकी, रामदास कामत आणि पं. वसंतराव देशपांडे सारखी मातब्बर मंडळी ही धूरा सांभाळत होती आणि ह्यातील मेरुमणी होते बालगंधर्व. हल्लीच्या काळात अवघा रंग एकची झाला आणि शंकरासारखी नवीन संगीत नाटकंदेखील सादर केली गेली. पण गायनी कलेवर मुख्यतः बेतलं जाणारं संगीत नाटक गेल्या शतकातील उत्तरार्धात लोप पावत गेलं. पुण्या-मुंबईच्या काही निवडक संस्था ही परंपरा जपत राहिल्या आणि म्हणून आजही मराठी संगीत नाटक जिवंत आहे असं आपण म्हणू शकतो. अशीच एक संस्था गेली तीस वर्षे प्रत्येक वर्षी सातत्याने संगीत नाटक महोत्सव भरवते. या महोत्सवात संस्था दरवर्षी एक नवीन संगीत नाटक सादर करते. ही संस्था आहे नेहरु सेंटर. या वर्षी या महोत्सवात नेहरु सेंटरने ‘सागर सात सुरांचा’ हे नवीन संगीत नाटक मुंबई मराठी साहित्य संघाच्या सहयोगाने सादर केलं.

कलेकरता जगणं की जगण्यासाठी कला ह्या वैश्विक सत्यावर ‘सागर सात सुरांचा’ हे नाटक आहे. तत्त्व जपत एखादा कलेसाठी आयुष्य वेचायचं की तडजोड स्वीकारून कलेच्या प्रसारातून सुखवस्तु जीवन साधायचं हा कलावंतांच्या पाचवीला पुजलेला संघर्ष ‘सागर सात सुरांचा’मध्ये लेखक प्रदीप ओक यांनी मांडला आहे. हे दोन दृष्टीकोन बाळगणारे दोन मित्र ओकांनी नाटकात उभे केले आहेत. लिखाणात ‘सागर सात सुरांचा’ हे सर्व बाबतीत पूरं उतरतं. विचारधारांमधला संघर्ष प्रदीप ओकांनी व्यवस्थित उभा केलाय. संवादातून प्रदीप ओक निश्चित परिणाम योग्यपणे साधतात. हंशांच्या ठिकाणी हंशा, टाळय़ांच्या ठिकाणी टाळ्या आणि विशेष म्हणजे योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात मेलोड्रामा वापरून प्रदीप ओक ‘सागर सात सुरांचा’ रंजक आणि मुद्देसुद करतात. मुळात या नाटकात गद्य आणि पद्य भाग समसमान वापरून हे नाटक आजच्या प्रेक्षकांना रुचेल याची खबरदारी राखली गेली आहे. सदानंद डबीर यांनी नाटकाला परिणामकारक आणि पूरक गीतं लिहिली आहेत. ज्यामुळे बंदीशी आहेत त्या जशाच्यातशा वापरून डबीरांची गीतं वेगळी वाटवीत याची काळजी संगीत दिग्दर्शक ज्ञानेश पेंढारकर यांनी घेतली आहे. बंदीशींबरोबरच गजल आणि सुगमसंगीताचा सुरेख वापर केला गेलाय. ज्ञानेशच्या चाली रेखीव आहेत.

‘सागर सात सुरांचा’ या संगीत नाटकाचं खरं श्रेय दिग्दर्शक प्रमोद पवार यांचं आहे. साहित्य संघाशी बरीच वर्ष जोडलेल्या प्रमोद पवारांचा संगीत नाटकांचा गाढा आभ्यास आणि जाण इथे दिसून येते. प्रमोद पवार हे नाटकात मुरलेले रंगकर्मी आहेत यात शंकाचं नाही. पण इथे दिग्दर्शक म्हणून ते खुपच प्रभावी ठरतात. त्यांनी गायक नटांकडून ‘सागर सात सुरांचा’मध्ये जो अभिनय करून घेतलाय त्यामुळे हे नाटक पदं सुरू झाल्यावर थांबल्यागत भासत नाही. नाटकातली पदं सुरू असताना रंगमंच स्तब्ध होण्याची मेख इथे कधीच दिसत नाही हे प्रमोद पवारांचं यश आहे. रंगमंच हलता ठेवल्याने शास्त्रीय संगीतातल्या बंदीशी सुरू असताना त्या न कळणाऱया माझ्यासारख्या औरंगझेब प्रेक्षकांनाही नाटकातून सुटता येणार नाही याची खबरदारी घेतल्याबद्दल प्रमोद पवारांचं कौतुक केलंच पाहीजे.

आणखीन एका बाबतीत प्रमोद पवारांना दाद द्यायला हवी. ‘सागर सात सुरांचा’ नाटकाचं कास्टिंग खूपच छान जमलंय. साधारणतः संगीत नाटक गायकीप्रधान असल्याने त्यात काम करणारे कलाकार काही अपवाद वगळता अभिनयात तसुभर कमी असतात. इथे मात्र हे अजिबातच जाणवत नाही. ‘सागर सात सुरांचा’मध्ये सगळे कलाकार आपापली पात्र चोख वठवतात त्यामुळे नाटय़ कायम राहतं. संजीव मेहेंदळे हे पुण्याचे गायक नट आपली शास्त्र्ााrय गायकाची ताठर भूमिका अत्यंत परिणामकारक करतात. त्यांच्या गायकीचं तर कौतुक आहेच पण त्यांनी साकारलेलं पात्र अत्यंत खरं वाटतं. तेवढय़ाच तोडीचा पण तडजोड स्वीकारलेला मित्र माधव भागवत पूर्ण आब राखून सादर करतात. धवल भागवत हा नवोदित कलाकारही गाणं आणि अभिनय हे दुहेरी आव्हान समर्थपणे पेलतो. अपर्णा अपरचित या तर आता बराच काळ आपल्याला या दुहेरीत परीचित आहेत. चिन्मय पाटसकर, श्रीकर कुलकर्णी, रसिका वाखारकर, भरत चव्हाण, शिवाजी रेडेकर, सचिन नवरे ही सगळी मंडळी यथार्थ काम करत ‘सागर सात सुरांचा’ आपल्यापर्यंत पोहोचवतात.

नेहरु सेंटरच्या या महोत्सवात चार संगीत नाटकं सादर झाली. नेहरु सेंटरचे संचालक लताफत काझी हे सुरुवातीला म्हणाले की नव्या तरुण प्रेक्षकांनी संगीत नाटकाकडे वळावं. सादर झालेल्या सर्व संगीत नाटकातून असं चित्र उभं राहतं की शास्त्र्ााrय संगीताच्या बैठकीवर बेतलेलं नाटक म्हणजे संगीत नाटक. खरंतर सत्तरीच्या दशकातचं पं. जितेंद्र अभिषेकींनी हा समज मोडून काढला. आजच्या पिढीला मराठी संगीत नाटकाकडे आकर्षित करायचं असेल तर त्यांचं संगीत नाटकातुन दिसायला हवं. ‘सागर सात सुरांचा’च्या कथानकात तसा प्रयत्न निश्चित आहे. नेहरु सेंटर दरवर्षी एक नवं संगीत नाटक करतं. पुढच्या वेळी या गोष्टीकडे जरा अधिक लक्ष काझी साहेब देतील ही इच्छा.

नाटक – संगीत सागर सात सुरांचा
निर्मिती – नेहरू सेंटर, मुंबई मराठी साहित्य संघ
निर्माते-संकल्पना – लताफत काझी
लेखक – प्रदीप ओक
संगीत – ज्ञानेश पेंढारकर
गीत – सदानंद डबीर
दिग्दर्शक – प्रमोद पवार
कलाकार – अपर्णा अपराजित, रसिका वाखारकर, सचिन नेवरे, शिवाजी रेडकर, भरत चव्हाण, श्रीकर कुलकर्णी, धवल भागवत, चिन्मय पाटसकर, माधव भागवत, संजीव मेहेंदळे
दर्जा – अडीच स्टार

आपली प्रतिक्रिया द्या