भारदस्त नाट्यानुभव

>> क्षितीज झारापकर

‘सोयरे सकळ’ भद्रकाली संस्थेचे अजून एक सकस नाटक. आशयघनता आणि अभिजातता ही मराठी रंगभूमीची ओळख या नाटकातही दिसून येते.

या वर्षीच्या सुरुवातीपासूनच मराठी नाटकाच्या निर्मिती मूल्यांमध्ये खूप बदल झालेला दिसतोय. नाटक हे प्रेक्षकांना थक्क करून अनुभूती देण्याचं माध्यम आहे हे नाटय़कर्मींना पुन्हा एकदा पटलेलं आहे असं चित्र समोर येत आहे. मराठी नाटक हे नेहमीच आशयघन असते. मराठी माणूस गोष्टीत रमतो. त्यामुळे मराठी नाटक कथाप्रधान आहे. नाटकाची गोष्ट जितकी जास्त भावणारी तितकं ते नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस अधिक उतरणारं असं आपल्या नाटय़सृष्टीचं समीकरण आहे. या वर्षी वर्णी लागलेल्या बहुतांश नाटकांची कथाबीजं ही रुचकर, मनोरंजक, नावीन्यपूर्ण आणि उत्कंठावर्धक आहेत. या उत्तम कथाबीजांना यथासांग फुलवून त्यांना योग्य कोंदणात बसवून प्रेक्षकांसमोर पेश करण्याकडे आता निर्मात्यांचा कल आहे. मराठी नाटक मॉडर्न करण्याचा प्रयत्न प्रत्येक निर्मितीत दिसू लागलाय. निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या काही कॉर्पोरेट संस्थांनी हा मार्ग दाखवला आणि आता पूर्वापार चालत आलेले निर्माते हे पुढे रेटत आहेत. मराठी नाटय़ निर्मितीतल्या जुन्या नाटक संस्थांपैकी आता कार्यरत असलेल्या ‘भद्रकाली’ या संस्थेने आता एक नवं कोरं करकरीत मराठी नाटक रंगभूमीवर आणलंय- ‘सोयरे सकळ’.

‘सोयरे सकळ’ हे एक विलक्षण नाटक आहे. यात एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीची – आजची – अमेरिका आहे आणि विसाव्या शतकाच्या मध्यावरचा हिंदुस्थानदेखील आहे. येथे परंपरेच्या कर्मठतेमुळे वैफल्यग्रस्त पिढी आहे. तिथेच घरातल्या देवघरातल्या देवांच्या टाकाचं माहात्म्य जाणून देऊळ उभारण्याचा भारदस्तपणा असणारी पिढीही आहे, पण याहीपेक्षा पुढे जाऊन या दोन पिढय़ांमधला दुवा शोधणारी एक तिसरी पिढीसुद्धा ‘सोयरे सकळ’मध्ये आहे. म्हणजे ‘सोयरे सकळ’ हे ‘मधुमती’, ‘कर्ज’ या हिंदी चित्रपटांसारखं किंवा ‘गोष्ट जन्मांतरीची’ या गाजलेल्या नाटकासारखं पुनर्जन्मावर बेतलेलं नाटक आहे का? तर अजिबात नाही. ‘सोयरे सकळ’ हे एक अत्यंत वास्तववादी नाटक आहे. पण ही तीन पिढय़ांची सातासमुद्रापलीकडे पोहोचणारी कहाणी लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि नटांनी कशी मांडली आहे हे अनुभवण्यात खरी गंमत आहे. ‘सोयरे सकळ’ आपल्याला पहिल्या प्रवेशापासून चकित करू लागतं. त्यातील पात्ररचना, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा या सगळ्या शाखा कमालीच्या चपळतेने आणि व्यावसायिकतेने साकारलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे नाटकांमध्ये सर्व बाजू इतक्या परफेक्ट साध्य होणं दुर्मिळ आहे. ‘सोयरे सकळ’ याबाबतीत खरोखर भारदस्त नाटक आहे. बऱयाचदा एका गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष देताना बाकीच्या बाजू या जशास तशा उभ्या राहतात. ‘सोयरे सकळ’मध्ये कुठेही बोट ठेवायला जागा नाही. नाटक सतत बेमालूमपणे वर्तमान आणि भूतकाळात शिरत राहतं आणि या सगळ्या शाखा अत्यंत कसोशीने ते साकारण्यात मदत करतात. ‘सोयरे सकळ’ हे एक असं नाटक आहे, ज्याच्या एका अंगाबद्दल आपण बोलूच शकत नाही. नाटक ही सांघिक क्रिया आहे हे ‘भद्रकाली’च्या या नाटय़ प्रयोगातून आपल्याला ठायी ठायी जाणवत राहतं.

‘सोयरे सकळ’चे लेखक डॉ. समीर कुलकर्णी हे एक सिद्धहस्त नाटककार आहेत. ‘आम्ही दोघं राजा राणी’, ‘तुझ्या माझ्यात’ आणि ‘काळा वजीर पांढरा राजा’ ही त्यांची या आधीची गाजलेली नाटके आहेत. ‘सोयरे सकळ’चं लेखन त्यांनी खूप सुंदर भाषेत केलेलं आहे. नाटक ऐकताना संवाद आपल्याला न जाणवता आवडतात तेव्हा नाटककार जिंकलेला असतो. हे आपल्याला ‘सोयरे सकळ’मध्ये आढळतं. आदित्य इंगळे याने ‘सोयरे सकळ’चं दिग्दर्शन केलंय. सतत काळ पुढेमागे सरकणाऱया कथानकाचं नाटय़ उभारताना एखाद्याची त्रेधा उडली असती. आदित्यने येथे हे सगळं अत्यंत लीलया सांभाळलेलं आहे. लेखन-दिग्दर्शनाचा कमालीचा उच्च दर्जा ‘सोयरे सकळ’ला एक विलक्षण उंची प्राप्त करुन देतो. या नाटकाचा प्रभाव पाडणारा एक प्रमुख घटक म्हणजे प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य. अमेरिकेतल्या राहत्या घरापासून ते महाराष्ट्रातल्या पारंपरिक वाडय़ापर्यंतची सगळी स्थळं मुळ्यांनी अफाट खरी वाटतील आणि तरीही हे नाटक सुरू आहे हे लक्षात राहील असं करून दाखवण्याची किमया केलेली आहे. अजित परब यांचं संगीत नाटकातले प्रसंग अधोरेखित करत आपल्यावर गारुड घालण्यात यशस्वी होतं.

कोणतंही नाटक प्रेक्षकांना पहिल्यांदा भेटतं ते कलाकारांच्या माध्यमातून. येथे ‘सोयरे सकळ’ खूपच परिणामकारक ठरतं. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे दांपत्य ‘सोयरे सकळ’ समर्थपणे पेलून धरतं. ऐश्वर्याने आत्याबाईंच्या वयस्क रूपात सुरुवातीला पहिल्याच प्रवेशात जो सूर लावलाय तो लाजवाब आहे. त्यामुळे नाटकाची पट्टीच सेट होते. अविनाशने बाप आणि मुलगा ही दोन्ही पात्रे सहजगत्या उभी केली आहेत. दोघांच्या भावनांचा कल्लोळ तो इतक्या शिताफीने साधून जातो की, प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायलाच हवेत. आशुतोष गोखले आपल्या वाटय़ाला आलेल्या मामा-भाच्याच्या दोन्ही भूमिका उत्तम साकारतो. स्वतः आदित्य इंगळे भाऊ म्हणून शोभतो आणि पोक्तपणे भूमिका साकारतो. अश्विनी कासार, अनुया वैद्य आणि सुनील तांबट ही सर्व मंडळी ‘सोयरे सकळ’मध्ये हिरीरीने काम करताना आढळतात. कसदार कलाकारांच्या संचामुळे नाटक अत्यंत ताजं वाटतं आणि घडणाऱया घटनाक्रमामुळे ते उत्तरोत्तर रंगत जातं. सगळ्या कलाकारांना दोन काळात उडय़ा मारत राहावं लागतं आणि त्यामुळे वेशभूषा, रंगभूषा आणि स्त्राr कलाकारांना केशभूषादेखील पटापट बदलावी लागते. हे सर्वांनी इतकं सहज जमवलंय की, प्रेक्षक अवाक होतो. हे साध्य करणाऱया गीता गोडबोलेंचं विशेष अभिनंदन.

‘सोयरे सकळ’ ही कविताजींनी प्रसाद कांबळींबरोबर ‘भद्रकाली’च्या बॅनरखाली एक सुंदर कलाकृती दिलेली आहे. अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या अध्यक्षाला शोभणारं नाटक म्हणून ‘सोयरे सकळ’ शंभर टक्के पात्र ठरतं.

नाटक – सोयरे सकळ
निर्मिती – भद्रकाली प्रॉडक्शन्स
सादरकर्ते – प्रसाद कांबळी
निर्माती – कविता मच्छिंद्र कांबळी
लेखक – डॉ. समीर कुलकर्णी
नेपथ्य, प्रकाशयोजना – प्रदिप मुळ्ये
संगीत – अजित परब
दिग्दर्शक – आदित्य इंगळे
कलाकार – ऐश्वर्या नारकर, अश्विनी कासार, अनुया टेंबे, सुनील तांबट, आशुतोष गोखले आणि अविनाश नारकर
दर्जा – साडे तीन स्टार