नवे प्रयोग, नवे कलाकार!

44

>>क्षितीज झारापकर, मुंबई

नाटय़ व्यवसायात डिसेंबरचा महिना हंगामी मानला जातो. या हंगामात साधारण दहा ते बारा नवीन नाटकं बाजारात येतात. हा हंगाम इतका महत्त्वाचा असण्याचं कारण रंगभूमीशी निगडित सर्व पुरस्कार सोहळे हे पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या दोन-तीन महिन्यांत होतात. त्यामुळे न चालणारी नाटकं फार काळ न चालवता शर्यतीत भाग घेऊ शकतात. परंतु यंदाच्या या हंगामात मात्र केवळ तीन-चार नवीन नाटकं येऊ घातलीयेत. डिसेंबर अर्धा संपला तरी ही नाटकं अजून आलेली नाहीत. प्रयोगाचा खर्च वाढल्याने आता या धंद्यात रिस्क फॅक्टर वाढलाय आणि त्यामुळे नाटय़निर्माते सावधगिरीची भूमिका घेताहेत असं चित्र दिसतंय. पण त्यामुळेच ज्याला ‘विंडो ऑफ अपोर्च्युनिटी’ म्हणतात तसा माहोल तयार झालाय. त्यात हा मौसम नाटय़स्पर्धांचा सुकाळ. अनेक जुनी जाणती मंडळं स्पर्धेसाठी दरवर्षी नाटकांचा घाट घालतात. आपल्या सध्या बऱ्याच अशा स्वरूपाच्या जाहिराती दिसू लागल्या आहेत. कमी खर्चाची नाटकं म्हणजे कमी दर्जाची नाटकं असं नाही.

व्यावसायिक मराठी रंगभूमीला आता निष्कारण देदीप्यमान होण्याची चटक लागलीये. टोलेजंग नेपथ्य, भारदार पोषाख आणि सेलिब्रिटी नट यांच्या दृष्टचक्रात व्यावसायिक रंगभूमी अडकलीये. पण मुळात नाटय़कला म्हणजे प्रेक्षकांना ‘सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफ’चा अनुभव देऊन आपण आखलेल्या रंगमंचावरचं जग पटवून देण्याची किमया आहे याचा विसर पडलेला दिसतो. मग एखाद्या नव्या दमाच्या होतकरू रंगकर्मीने हे लक्षात ठेवून आपला मर्म सादर केला तर तो कदाचित फ्रेश आणि आल्हाददायक ठरू शकेल. याच भावनेतून आज आपण अशाच दोन कलाकृतींचा मागोवा घेणार आहोत.

एसआरबी प्रॉडक्शन्स या संस्थेने ‘पुढे काय’ हे नाटक नुकतंच रंगभूमीवर आणलंय. ‘पुढे काय’ हा आजच्या पिढीसमोरचा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. १९९० साली हिंदुस्थानने आपली अर्थव्यवस्था खुली केली आणि हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचं चित्र पालटलं. सर्व्हिस सेक्टरने अभूतपूर्व जोर धरला आणि व्यवसायाची अनेक नवीन दालनं खुली झाली. पण हिंदुस्थानी प्रजेला हे आजही पुरतं समजलेलं नाही. पिढीजात विचारसरणीत आजची तरुण पिढी अडकलेली दिसते. या विषयावर काहीतरी बोलावं असं लेखक-दिग्दर्शक श्रीराम बागवे यांना वाटलं आणि त्यांनी ‘पुढे काय’ हे नाटक बेतलं. आता खरं तर हा विषय एखाद्या व्याख्यानाला साजेसा आहे.

बागवेंनी धूर्तपणे तो नाटकात पात्रांतर्फे मांडण्याचा लेखनातून चांगला प्रयत्न केलाय. चिन्मय राणे, अथर्व सक्रे आणि सूरज मोरे हे कलाकार मुंबईत एकाच एरियात राहणारे तरुण साकारतात. त्यांच्या पुढय़ात आजच्या जगाच्या शर्यतीत कसं जिंकायचं हा प्रश्न आहे. त्यांचा एक जरा प्रगल्भ मित्र त्यांना नेहमी सल्ला देत असतो. याही प्रश्नाचं उत्तर ते त्याच्याकडे शोधू पाहतात आणि तो त्यांना काय उपदेश करतो हा या नाटकाचा गाभा आहे. स्वतः लेखक दिग्दर्शक श्रीराम बागवे यांनी हा मित्र साकारलाय. सर्व कलाकार खूप सिन्सीयरली काम करतात. त्यामुळे नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. ‘पुढे काय’ हे नाटक काल्पनिक कथेचा आविष्कार नव्हे. हे एका सामाजिक विषयावर बेतलेलं नाटक आहे. असं नाटक करताना आपण मांडत असलेल्या विषयाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे. सादरीकरणात दिग्दर्शकीय कल्पकता अधिक गरजेची आहे. बाकी बाबतीत ‘पुढे काय’ योग्य आहे.

दुसरं नाटक आहे ते अर्चना थिएटर्स आणि सई थिएटर्स निर्मित ‘हवापालट’. रंगभूमीवरच्या एका अवलिया कलाकाराला, सतीश तारेला अभिवादन करून या नाटकाची सुरुवात होते. ‘हवापालट’ या नाटकाचं लेखन सतीश यांचं आहे. एका वय वाढलेल्या मुलीला एक ज्योतिषी लग्नाचा योग आहे असं सागतो. पण तेव्हाच तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या मरणाचंही भाकीत करतो. मग ती मुलगी आपल्या नवऱ्याच्या प्रकृतीविषयी कशी खूप काळजी करणारी होते आणि त्या दोघांचं पुढे काय होतं अशा सुरस कथेवरचं हे नाटक.

नाटकाची सुरुवात लोकनाटय़ आणि संगीत नाटक याच्या हायब्रिड बाजातून होते. म्हणजे नटी सूत्रधाराचा प्रवेश होतो आणि त्यात लोकनाटय़ातल्या सोंगाडय़ाच्या पंचला ढोलकीवाल्याची लाईव्ह थाप मिळते तशी थाप नाटकातल्या पंचेसना मिळते. पुढे नाटकाचं कथानक पकड घेतं आणि हा बाज बॅकग्राऊंडला जातो. सूत्रधार आणि लांडगे झालेले डॉ. श्रीनिवास नाईक विनोद निर्मिती आणि नाटकात एनर्जी भरण्याचा स्तुत्य प्रयत्न करतात. राहुल काळे आपली भूमिका चोख बजावतात. कोपरकर आणि शालिनी कोपरकर या भूमिकांमध्ये दिग्दर्शक संतोष भोसले आणि निर्मात्या कल्पना कदम उत्तम कामगिरी करतात. नटी आणि डॉक्टर सोनिया सोनार या पात्रांमध्ये रसिका भट नाटकाला फ्रेशनेस देऊन जाते. किरण कदम आणि रवी मोहिते नाटकाला लाईव्ह म्युझिकमुळे जिवंत ठेवतात. नाटकाच्या गतीचा विचार करता थोडी अधिक लय आणि गती चालेल. एकंदरीत ‘हवापालट’ हे एक लिखाणातूनच मनोरंजक नाटक आहे.

या दोन्ही नाटकांतील समानतेचा एक दुवा आहे. दोन्ही नाटकांत नेपथ्य, कॉस्च्युम किंवा लाईट आणि संगीताचा ऊहापोह नाही. नाटकाचा खर्च आवरता घ्यायला त्याचा उपयोग झालाय. मात्र दोन्ही नाटकांनी आपापले विषय नेटकेपणाने मांडले आहेत.

दर्जा : अडीच स्टार
नाटक : पुढे काय?
निर्मिती : एस.आर.बी. क्रिएशन्स
लेखक, दिग्दर्शक : श्रीराम बागवे
कलाकार : चिन्मय राणे, सुरज मोरे, अथर्व सक्रे, श्रीराम बागवे

दर्जा : अडीच स्टार
नाटक : हवापालट-एक झंझावाती वादळ
निर्मिती : अर्चना थिएटर्स, सई थिएटर्स
निर्माती : कल्पना कदम
लेखक : कल्पना सतीश
नेपथ्य : सचिन गोताड
संगीत : डॉ. किशोर खुशाले
दिग्दर्शक : संतोष भोसले
कलाकार : कल्पना कदम, राधिका भट, दीक्षा शिंदे, डॉ. श्रीनिवास नाईक, संतोष परब, राहुल काळे

आपली प्रतिक्रिया द्या