हाऊसफुल्ल – गनिमी काव्याचा थरार

2222
fatteshikast

>> वैष्णवी कानविंदे- पिंगे

शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, महाराजांनी स्वराज्यासाठी केलेलं जिवाचं रान, शत्रूचा गनिमी काव्याने केलेला पाडाव, मराठे मावळ्यांच्या अनेक शौर्यगाथा आणि त्यातून उभं राहिलेलं स्वराज्यशिवाजी महाराज आणि स्वराज्य लढय़ाच्या गाथा कितीदाही ऐकल्या तरी रोमांचकच वाटतात. त्या ऐकताना, पाहताना आपलं मन नव्याने भरून येतंनुकताच प्रदर्शित झालेला फत्तेशिकस्तहा सिनेमा पाहताना पुन्हा एकदा आपण शिवाजी महाराजांचा तो भारदस्त काळ नव्याने अनुभवतो.

स्वराज्यासाठी लढल्या गेलेल्या प्रत्येक लढाया इतिहासात कोरल्या गेल्या याचं कारण म्हणजे त्या मागे रचलेला गनिमी कावा. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे शाहिस्तेखानाची शिवाजी महाराजांनी बोटं कापून केलेली फजिती. ही कथा पुन्हा एकदा फत्तेशिकस्तसिनेमाच्या माध्यमातून समोर आली आहे. मुळात हा हल्ला कसा झाला, का झाला, नेमकं काय झालं आणि त्यात कोण कोण होते हे सगळं या सिनेमातून समोर येतं. माहिती असलेल्या गोष्टीमधले बारकावे, त्यातलं नाटय़ पहायचं असेल तर हा सिनेमा नक्की पहावा.

लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याचा फर्जंदनंतरचा हा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहे. फर्जंदची गोष्ट निदान फार माहीत नसल्याने त्यात नावीन्य होतं. पण शाहिस्तेखान शालेय पुस्तकांपासून आपल्याला ठाऊक असल्याने तरीही त्यातला थरार जपणं हे नक्कीच मोठे कसब होतं. पण दिग्दर्शकाने ही गोष्ट थरारकरीत्या मांडण्यात बऱ्यापैकी यश संपादन केलं आहे.

शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर चपखल बसला आहे. महाराजांचा रुबाब, एखाद्या मावळ्याच्या जाण्याने होणारं दुःख, स्वराज्याची कळकळ हे सगळं खूप उत्तम उभं केलं आहे. त्या सोबत तानाजी मालुसरे साकारणारा अजय पूरकर, बहिर्जी नाईक साकारणारा हरीश दुधाडे, येसाजी कंक साकारलेला अंकित मोहन, स्वतः जेधे साकारणारा दिग्पाल लांजेकर, आऊसाहेब मृणाल कुलकर्णी, केशर साकारणारी मृण्मयी देशपांडे हे सगळे या महाराजांच्या लवाजम्यामध्ये अगदी मस्त शोभून दिसतात.

सिनेमा रोचक आहे, थरारक आहे, पण लांबीला जरा जास्त मोठा झालाय. पहिल्या अर्ध्या भागात तो प्रमाणापेक्षा जास्त पसरट झालाय. सिनेमाची गाणी चांगली असली तरीही ती त्याच्या सतत असण्याने सिनेमाचा वेग मंदावतो. तसंच पहिल्या अर्ध्या भागात बराचसा वेळ हा पात्रांना समोर आणण्यात गेला आहे. एखादं दोन जणांना सरप्राईजचा वापर करून समोर सादर करणं चांगलं वाटतं, पण सगळेच कलाकार अशा तऱ्हेने यायला लागले की त्यात तोच तोचपणा जाणवू लागतो. या सिनेमात असं काहीसं झालं आहे. सिनेमाची खरी गोष्ट घडते दुसऱ्या भागात. त्यात मात्र अगदी पहिल्या दृश्यापासून थरार उत्तमरीत्या हाताळला आहे.

संवाददेखील चांगले आहेत. काही ठिकाणी पन्हाळ्याला सिंहगड संबोधलं गेल्याने इतिहास ठाऊक असणाऱ्या सगळ्यांना ते खटकू शकतं. अशा काही बारीक सारीक गोष्टी सोडल्या तर सिनेमा अनेक माहीत नसलेल्या गोष्टीदेखील छान उलगडतो. बहिर्जी नाईक यांच्या क्लृप्त्या किंवा काही गनिमी काव्यांचे बारकावे पाहायला मजा येते.

एकूणच शिवाजी महाराजांचा काळ आणि त्यातलं जाज्वल्य पुन्हा एकदा नव्याने अनुभवायचं असेल तर फत्तेशिकस्तनक्कीच पाहायला हवा.

  • सिनेमा फत्तेशिकस्त
  • दर्जा    ****
  • निर्माते अजयअनिरुद्ध आरेकर
  • लेखक   दिग्पाल लांजेकर
  • दिग्दर्शक, छायांकन      रेशमी सरकार
  • संगीत, पार्श्वसंगीत       देवदत्त मनीषा बाजी
  • कलाकार    मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, हरीश दुधाडे, अजय पूरकर, अंकित           मोहन, अक्षय वाघमारे,दिग्पाल लांजेकर, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, मृण्मयी देशपांडे, अनुप सोनी, समीर धर्माधिकारी, तृप्ती तोरडमल, आस्ताद काळे
आपली प्रतिक्रिया द्या