गोल्डन ग्लोब-२०१७ वलयांकित सोहळा

गणेश मतकरी

जागतिक चित्रपटसृष्टीत ऑस्कर पुरस्कारांबरोबरच चर्चा असते ती गोल्डन ग्लोब पुरस्कारांची. नुकताच पार पडलेल्या 74व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांची चर्चा नेहमीपेक्षा वेगळ्या कारणांनीही घडली. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यावर छाप पाडली ती `ला ला लँड’ आणि `मूनलाइट’ या कलाकृतींनी. जगभरातल्या चित्रपट रसिकांमध्ये चर्चिल्या जाणाऱया गोल्डन ग्लोब पुरस्काराचा वेध घेतला आहे प्रसिद्ध लेखक, समीक्षक व चित्रपट अभ्यासक गणेश मतकरी यांनी.

आपल्याकडे परदेशी चित्रपट पुरस्कार म्हटलं, की एकच नाव डोळ्यांसमोर येतं, ते म्हणजे ऍकॅडमी ऍवॉर्डर्स्, अर्थात ऑस्कर्स. अमेरिकन पारितोषिक समारंभ डोळ्यासमोर येतो यात काही आश्चर्य नाही, कारण आपल्या बहुतेक प्रेक्षकांच्या दृष्टीने परदेशी सिनेमा म्हणजे इंग्रजी, त्यात अमेरिकन, त्यातही हॉलीवूड. अमेरिकेतही इंडिपेन्डन्ट सिनेमा या नावाने आपल्या समांतर सिनेमाच्या जवळ जाणारा सिनेमा बनतो, पण तोही आपल्या चित्रपटगृहात दुर्मिळ असल्याने क्वचितच माहीत असतो. असो. मुद्दा हा, की अमेरिकन किंवा इंग्रजी भाषिक एकूण सिनेमातही काही हा एकच पुरस्कार सोहळा नसतो तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी यादरम्यान विविध पुरस्कार आणि त्यासंबंधातले कार्यक्रम तिथे सुरू असतात. ऑस्कर हा यातला जवळपास शेवटचा महत्त्वाचा सोहळा आणि ऑस्कर पुरस्कारांची हवा ज्या पुरस्कार सोहळ्यांपासून सुरू होते असं मानलं जातं, तो म्हणजे गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा, जो या रविवारीच लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. जानेवारीतला, म्हणजे नववर्षातला हा पहिला मोठा पुरस्कार.

आता हवा सुरू होते म्हणजे काय तर असा एक समज आहे की, गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेला चित्रपट, हा ऑस्कर मिळवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एकदा का हे पुरस्कार जाहीर झाले, की हौशी प्रेक्षक हे चित्रपट शोधून पाहण्याच्या मागे लागतात, लवकरच येणाऱया ऑस्कर्सची तयारी म्हणून. आता यात कितपत तथ्य आहे? तर आहे ही आणि नाही ही. टक्केवारी पाहिली तर गोल्डन ग्लोब विजेत्यांना पन्नासेक टक्के वेळा ऑस्कर मिळालं असेल हे खरंय, पण त्याबरोबर हेही खरं, की गोल्डन ग्लोब पुरस्कारांचं स्वरूप हेच ऑस्करपेक्षा खूप वेगळं आहे. आता वेगळं म्हणजे कसं तर सांगतो.

ऑस्कर पुरस्कार हे फक्त चित्रपटाचे असतात, तर गोल्डन ग्लोब पुरस्कार हे चित्रपट आणि टीव्ही या दोन्हीसाठी दिले जातात. म्हणजे समारंभाला येणाऱया पाहुण्यांची संख्या अधिक. आता संख्या अधिक होण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण असं की जिथे ऑस्कर पारितोषिक एकेका वर्गात एकेकालाच विजेता ठरवतं, तिथे गोल्डन ग्लोब अधिक विजेत्यांची शक्यता तयार करतं. ते कसं तर चित्रपटांना ड्रामा (गंभीर प्रकृतीचे नाटय़पूर्ण चित्रपट) आणि म्युझिकल ऑर कॉमेडी (हलकेफुलके चित्रपट) या वर्गात विभागून. सर्वोत्कृष्ट चित्रपटांबरोबरच, सर्वोत्कृष्ट अभिनेता / अभिनेत्री, या सर्वांनाच या दोन्ही वर्गांत पारितोषिकं दिली जातात. पारितोषिकं अधिक असल्याने अर्थातच त्यातलं कोणीतरी ऑस्करविजेतं ठरण्याची शक्यता वाढते आणि गोल्डन ग्लोब विजेत्यालाच ऑस्कर मिळतं, या समजुतीला खतपाणी मिळतं. चित्रपटाप्रमाणेच हे विभाजन टीव्ही मालिकांमधेही असतं, वर तिथे ड्रामा आणि म्युझिकल/कॉमेडीबरोबरच मिनीसीरिज, म्हणजे मर्यादित भागात घडणारी कथा सांगणाऱया मालिका, ही आणखी एक वर्गवारी असते, जी टीव्हीसाठीही पुरस्कारांची रेलचेल करते. साहजिकच या समारंभाला येणारे पाहुणेही चिकार असतात आणि ग्लॅमरसाठीही समारंभ गाजतो. या पुरस्कारांच्या तसंच सेलिब्रिटींच्या गर्दीने गोल्डन ग्लोबला काही जणं कलात्मक निकषांवर कमी लेखतात आणि ते अगदी चूकही म्हणता येणार नाही. तरी हीदेखील गोष्ट खरी, की अमेरिकन सिनेमा/ टिव्हीमध्ये खरोखरच दर्जा इतका वरचा आहे, की कोणतीच फुटकळ व्यक्ती वा कलाकृती अखेर पुरस्कार पटकावताना दिसत नाही.

golden-globe-2

यंदाचंच पाहिलं तर दोन चित्रपटांना सर्वाधिक पुरस्कार होते असं दिसलं, त्यातला पहिला होता ‘ला ला लॅन्ड’ हा आपल्याकडेही गाजून गेलेला ब्लॉकबस्टर, जो कॉमेडी ऑर म्युझिकल विभागात नामांकनात होता, तर दुसरा होता छोटय़ा बजेटचा समांतर वळणाचा चित्रपट ‘मूनलाईट’, जो ड्रामा विभागात होता. ला ला लॅन्ड ल्या चित्रपटाला, प्रमुख अभिनेता (रायन गॉसलिंग), अभिनेत्री (एमा स्टोन), दिग्दर्शक (डेमिअन चॅजेल), पटकथा (डेमिअन चॅजेल), संगीत (जस्टीन हरविट्झ) आणि गीत (सिटी ऑफ स्टार्स/जस्टीन हरविट्झ) अशा सात वर्गात नामांकनं होती, तर मूनलाईटला चित्रपट, दिग्दर्शक( बॅरी जेन्कीन्स ), पटकथा (बॅरी जेन्कीन्स), संगीत (निकोलस ब्रिटेल) आणि सहाय्यक अभिनेता (मेहरशाला अली) /अभिनेत्री (नेओमी हॅरीस)अशा सहा विभागांत. ला ला लॅन्ड ही म्हटली तर हलकीफुलकी प्रेमकथा, हॉलीवूडच्या पार्श्वभूमीवर असलेली आहे.

golden-globe

उलट मूनलाईट हा गरीब कृष्णवर्णीय मुलाच्या आयुष्यावरला अधिक अर्थगर्भ चित्रपट, पण ला ला लॅन्ड हा एकूण एक पुरस्कार मिळवून गोल्डन ग्लोबमधे आजवर सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा विक्रमी चित्रपट ठरला, तर मूनलाईटला केवळ उत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारावर समाधान मानावं लागलं. ला ला लॅन्डची पारितोषिकं पटतात कारण त्यांना म्युझिकल/ कॉमेडी विभागात फार स्पर्धा नव्हती. मूनलाईटवर मात्र थोडा अन्याय झाला, कारण मेहरशाला अलीचं सहायक भूमिकेतलं काम आणि बॅरी जेन्कीन्सची पटकथा, यांना पुरस्कार मिळायला हवा होता असं वाटतं. जर हे स्वतंत्र विभाग नसते तर मेल गिब्सनचा ‘हॅकसॉ रिज’ हा हत्यार न उचलता युद्धात उतरणाऱया सैनिकाबद्दलचा चरित्रपट किंवा अचानक पुतण्याचं पालकत्व अंगावर पडलेल्या काकाची कहाणी सांगणारा केनेथ लोनर्गनचा ‘मॅन्चेस्टर बाय द सी’ आणि मूनलाईट हे सारे एकाच विभागात उतरले असते आणि मग ला ला लॅन्डचं काय झालं असतं हे सांगता येणार नाही.

यंदा परभाषिक चित्रपटाचं पारितोषिक पटकवणाऱया एल या फ्रेंच चित्रपटातल्या भूमिकेसाठी एलिझाबेथ हुपर्ट या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. ती हे ऑस्करमधे जमवू शकते का हे पहायला हवं. तीच नाही तर हे सर्व विजेते जेव्हा आपले उपविभाग सोडून तिथे समोरासमोर येतील तेव्हा खरी चुरस पहायला मिळेल हे नक्कीच.

चित्रपटातल्या पुरस्कारांसाठी जसं गोल्डन ग्लोबहून ऑस्कर प्रमाण मानलं जातं, तसेच टीव्हीसाठी एमी ऍवॉर्डस् अधिक मानली जातात. तरीही जसा चित्रपटांबाबतचा ग्लोबचा निर्णय टाकाऊ नाही तसाच टीव्ही मालिकांबाबतचाही नाही. यावेळी पारितोषिक प्राप्त ठरलेल्या अटलान्टा (कॉमेडी/म्युझिकल), द क्राऊन (ड्रामा) आणि द पीपल वर्सस ओ जे सिम्प्सन (मिनीसिरीज) या मालिकांवरूनही हे लक्षात येईल आणि चांगली गोष्ट ही की, नामांकनांमधले बरेचसे चित्रपट आपल्याकडे प्रदर्शित होण्यासाठी आपल्याला जशी वाट पहावी लागते तशी या मालिकांसाठी लागणार नाही, कारण नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राईम व्हिडिओ अशा विविध वेब चॅनल्सवर यातल्या बहुतेक मालिका अधिकृतपणे उपलब्ध आहेत. असो.

या पुरस्कारांच्या निमित्ताने आणि आपल्याकडे ते दाखवले, पाहिले गेल्याने, त्यावर बोलणं झाल्याने गेल्या वर्षाचा लोकप्रिय व्यावसायिक सिनेमाच्या पलीकडला अंदाज आपल्या चित्रपटरसिकांना आलाच असेल. आता ऑस्कर पुरस्कारांची वाट आपण अधिक जागरूकपणे पहायला हरकत नाही.