हिचकी : साचेबद्ध संघर्षाची`गोड गोड गोष्ट

75

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

अशक्य वाटणारं ध्येय. मग त्या ध्येयासाठी पुढे येणारा एक, ते पूर्ण करताना येणाऱया असंख्य अडचणी, अनेकदा सामोरं येणारं अपयश आणि शेवटी सगळय़ा गोष्टीला मिळणारी कलाटणी… ती देखील अशी की पहाताना डोळय़ात पाणीच यावं. अशा साच्यातले सिनेमे दर दहा सिनेमांमागे एक या हिशेबाने जन्म घेत असतात. कारण यात मसाला असतो, खिळवून ठेवणारा शेवट असतो, भावनांचा कल्लोळ असतो… बॉलीवूडच्या चाहत्यांना गुंतवून ठेवता येईल असा प्रचंड मसुदा यात ठासून भरला असतो आणि म्हणूनच या पॅटर्नचा वापर केला तर गल्लापेटीचा जुगार तसा फायदेशीर होऊ शकतो. म्हणूनच राणी मुखर्जीने आपल्या कमबॅकसाठी हा सिनेमा निवडला असावा. अपेक्षेप्रमाणे या सिनेमाच्या पॅकेजमध्ये ज्या गोष्टी असाव्या लागतात त्या सगळय़ा आहेत… राणी मुखर्जीची एकेकाळी असणारी स्टारव्हॅल्यूही बऱयापैकी जिवंत आहे हे देखील तिच्याकडे बघून कळतं. पण तरीही या गोड, गुळगुळीत, सरसपाट, संघर्षरहित सिनेमातून फारसं वेगळं काही हाती लागत नाही.

‘हिचकी’ ही गोष्ट आहे एका मुलीची. तिला टॉरेट सिंड्रोम म्हणजेच उचक्या लागण्याचा विकार असतो. अस्वस्थता वाढली किंवा अचानक विचारांचा वेग वाढला की तिला उचक्या यायला लागतात आणि त्यावर काहीही इलाजदेखील नसतो. उचकीच्या या विकारामुळे सुरुवातीला लोकांच्या टोमण्याचा आणि मस्करीचा विषय ठरलेल्या एका लहान मुलीला शाळेतल्या शिक्षकांच्या सहकार्यामुळे नवी उमेद येते आणि ती शिक्षिका व्हायचं ठरवते. शिक्षिका बनल्यावर तिच्या वाट्याला जो वर्ग येतो तो बकाल वस्तीत रहाणाऱ्या मुलांचा असतो. त्यांचं वागणं, त्यांचा एकूणच अवतार हे सगळं त्या शाळेतल्या इतर मुलांच्या जवळपासही नसतं आणि तो न्यूनगंड त्या मुलांना आणखीनच खाली खेचत असतो. अशातच त्यांच्यासाठी एक शिक्षिका येते आणि त्या मुलांना एक दिशा दाखवायचा प्रयत्न करते. त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत स्वत:ला सिद्ध करायची संधी देते. पण हे सगळं ती कशी करते, ती जे प्रयत्न करते ते यशस्वी होतात का, स्वतमध्ये व्यंग असताना दुर्लक्षित मुलांना त्यांच्यातलं दडलेलं कौशल्य शोधायला ती कशी मदत करते, काय अडचणी येतात वगैरे प्रश्नांची उत्तरं ‘हिचकी’ बघताना मिळतात.

हा सिनेमा एकीकडे बघायला तसा कंटाळवाणा नाही. पण दुसरीकडे विचार करता त्यात नावीन्य जराही नाही. यात काय होणार हे आधीच धडधडीतपणे कळतं आणि ते सगळं तसंच घडतं. संघर्षदेखील उत्कंठता वाढवेल असा नाहीच. आणि जो संघर्ष आहे तो इतक्या चकचकीत, गोडमिठ्ठ वेष्टनात आहे की आपण अस्सल बॉलीवूड कमी तिखट मसालापट बघतोय हे लगेच कळतं. थोडक्यात सांगायचं तर राणी मुखर्जी वगळता या सिनेमात लक्षात ठेवण्याजोगं फारसं काहीच नाही. राणी मुखर्जीने मात्र खरोखरच छान आणि सहज अभिनय केलाय. तिचा घोगरा आवाज आणि तिच्या उचक्या हे सगळं अगदी बरोबर वठवलंय. जेव्हा अस्वस्थ होते तेव्हा तिच्या उचक्यांचं वाढत जाणं, मुलांबरोबरचा सहज वावर हे सगळं अगदी सहज आहे. त्यात कुठेही खोटेपणा नाही. ती दिसलीयदेखील तिच्या व्यक्तिरेखेला साजेशी. तिच्या या वन मॅन शोचं खरंच कौतुक केलं पाहिजे. पण सिनेमा उभा ठाकायला एवढीच शिदोरी नाही ना पुरत. जी चौदा रत्नं म्हणजेच तिचे जे चौदा विद्यार्थी दाखवलेयत त्यांचा अभिनयदेखील बरा आहे. पण त्यांच्यात होणारे बदल किंवा त्यांना मिळणारं यश हे सगळं अचानक आणि स्क्रिप्टमध्ये नमूद केलंय म्हणून घडतंय की काय असं वाटायला लागतं. तसंच त्यांच्या व्यक्तिरेखा घडवताना विनाकारण चौकटीत अडकवल्या आहेत. म्हणजे एक मुलगी नेहमी भेंडी कापत असते. म्हणून दररोज तिला भेंडीच कापताना दाखवलंय किंवा एक मुलगा कानाला वॉकमन लावून बसतो. म्हणजे झोपताना उठताना नेहमीच त्याच्या कानाला वॉकमन. अशा चौकटींमुळे व्यक्तिरेखा म्हणाव्या तशा फुलत नाहीत. शिवाय विरोध करणाऱयांचा गळून पडणारा विरोध हे सगळं खूप वरवरचं वाटतं. प्रत्यक्षात विचार केला तर जे शिवधनुष्य दाखवलंय ते तितकं सहज उचलता येणं शक्य आहे का.. पण यात दिग्दर्शकाला जे वाटलं तसं घडलं असं काहीसं झालंय आणि म्हणूनच सिनेमा भिडत नाही.

या सिनेमाचं छायांकन तसं बरं आहे. छायांकनाला मर्यादित अवकाश आहे. पण त्यातल्या त्यात काही जागा छान काढल्यात. पण हा सिनेमा फक्त शाळा, वस्ती आणि इतर काही ठिकाणीच फिरतो त्यामुळे मर्यादा येतात. या सिनेमाचं पार्श्वसंगीत बरं असलं तरी गाणी मात्र लक्षात रहात नाहीत. किंवा शेवटाकडे मेहनत किंवा यश मिळवण्यासाठीचा खटाटोप ज्या पातळीवरचा दाखवायला हवा होता तो अजिबातच दिसत नाही.

मुळात या सिनेमाचा पॅटर्न जरी ठरलेला असला तरी या पॅटर्नमध्ये जर खूप घट्टपणा असला तर उत्तम सिनेमा बनू शकतो. पण नेमकं तिथेच घोडं अडतं. या सिनेमाची एकूणच मांडणी विस्कळीत झालीय. शेवटदेखील मॅच जिंकत आली असताना हातात शेवटचा झेलही अलगद दिल्यावर कसं वाटेल तसं काहीसा झालय. थोडक्यात सांगायचं, तर या खेळात जीत असली तरी मजा नाही.

दर्जा – अडीच स्टार
चित्रपट – हिचकी
कलाकार – राणी मुखर्जी, सुप्रिया पिळगावकर, सचिन पिळगावकर, हर्ष मयार.
निर्माता – आदित्य चोप्रा, मनीष शर्मा
दिग्दर्शक – सिद्धार्थ पी. मल्होत्रा
लेखक – सिद्धार्थ पी. मल्होत्रा, अंकूर चौधरी
पटकथा – अंबर हडप, गणेश पंडीत
संगीत – जसलीय रोयाल
छायांकन – अविनाश अरुण

आपली प्रतिक्रिया द्या