स्त्रीवादाचा टवटवीत अंदाज- ‘वीरे दी वेडिंग’

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

स्त्रीवादी सिनेमा म्हटलं की, त्यात काहीतरी गंभीर विषय आणि त्याभोवती गांभीर्याने फिरणारं कथानक समोर येतं. आजवर अनेक यशस्वी स्त्रीवादी सिनेमे बॉलीवूडमध्ये झाले आहेत आणि त्यातल्या स्त्रीने दिलेल्या नैतिक, शारीरिक किंवा मानसिक लढय़ाला आपण मनापासनं दादही दिली आहे. त्या गंभीर विषयाने आपल्याला विचारात पाडलं आणि आपल्यावर अनेकदा खोलवर परिणामही झाले आहेत. अर्थात ‘वीरे दि वेडिंग’ या सिनेमामध्ये यातलं काहीही नाही. तरीही हा वेगळय़ा पद्धतीने स्त्रीवादी सिनेमाच आहे आणि म्हणूनच त्याच्यात वेगळं उठून दिसायची क्षमता आहे.

ही कथा अगदी साधी म्हणजे शाळेपासून एकमेकांशी घट्ट असणाऱ्या चार सुखवस्तू मैत्रिणींची आहे. या सगळय़ा मैत्रिणी बिनधास्त असतात. त्यातल्या प्रत्येकाची स्वतःची अशी काही स्वप्नं असतात. सुखाच्या कल्पना असतात आणि स्वतःच्या अस्तित्वाविषयी त्यांच्याही मनात प्रश्न असतात. त्यांना चारचौघांसारखं आयुष्य हवं असतं आणि तरीही स्वतःचं अस्तित्व हवं असतं… आणि मग या सगळय़ांचा मेळ घालताना, आपली मैत्री जपताना त्या काय करतात याची धम्माल गोष्ट म्हणजे ‘वीरे दि वेडिंग’ हा सिनेमा.

दिल्लीत राहणाऱ्या चार मैत्रिणी शाळेनंतर दहा वर्षांनी चार दिशांना पांगल्या असल्या तरीही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्यांचं एकमेकांशी असणारं नातं अगदी घट्ट असतं. त्या एकमेकांना काहीही संबोधू शकतात आणि एकमेकांबद्दलची अगदी नाजूक गुपितंही त्यांना ठाऊक असतात. अर्थात काळाच्या ओघात प्रत्येकीचं आयुष्यं एक नवं वळण घेतं आणि मग त्या सगळय़ा पुन्हा एकदा दिल्लीमध्ये एकत्र भेटतात. त्यातल्या एका मैत्रिणीच्या लग्नाच्या निमित्ताने आणि हास्य विनोदाच्या आवेगात हळूहळू मनातले दडलेले नाजूक सल उलगडायला लागतात. प्रत्येकीच्या आयुष्यातली कुठची तरी छोटीशी खंत भळभळून बाहेर येते आणि त्यानंतर प्रत्येकीच्या मनावर जी नकळत चढलेली पुट असतात ती अगदी अलगद दूर होतात आणि मैत्रीचं निख्खळ अवकाश पुन्हा एकदा मोकळं होतं.

या गोष्टीची गंमत म्हणजे यात कुठचाही मोठा लक्षात येण्याजोगा संघर्ष नाही की लढा नाही. यात कुठचा अपमान, कुठचा बदला इत्यादी पैकी काहीच नाही तरीही यात प्रत्येक स्त्रीमनाला सुखावेल अशी क्रांती मात्र नक्कीच आहे. यात अगदी साध्या साध्या प्रसंगातून ती व्यक्त झाली आहे. आजच्या जगातल्या अनेक घरातल्या मुली, त्यांची मानसिकता, त्यांचे विचार, त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्या दृष्टीने आयुष्याकडनं असणारी अपेक्षा हे सगळंच अगदी नकळतपणे आणि विनोदाच्या मऊशार दुलईवरनं आपल्यासमोर आलं आहे. ते सगळं पडद्यावर घडत असतं तेव्हा त्या गोष्टी पटत जातात. म्हणजेच एका हलक्याफुलक्या सिनेमातनं आयुष्याबद्दलचा एक गंभीर दृष्टिकोन अगदी सहजपणे मांडायचं काम दिग्दर्शकाने या सिनेमातून केलंय.

सोनम कपूर, करिना कपूर, शिखा तल्सानिया आणि स्वरा भास्कर या चारही मुख्य अभिनेत्रींचं काम मस्तच झालंय आणि त्यांच्यातलं मैत्रीचं रसायनही अगदी उत्तम जमून आलंय. त्यामुळे जेव्हा कथा पुढे जाते तेव्हा त्यातले प्रसंग, त्यातले प्रौढ संवाद हे सगळं आपण प्रेक्षक म्हणून सहज स्वीकारू शकतो. अर्थात हा सिनेमा फिरतो विशिष्ट धनाढय़ वर्गातल्या कुटुंबांमध्ये. दिल्लीत लहानाच्या मोठय़ा झालेल्या आणि अत्यंत श्रीमंती असणाऱया घरातल्या मुलींचे आचार, विचार इत्यादी या सिनेमात पाहायला मिळतात. ते श्रीमंती वातावरण आणि त्यातले विचार, नातेसंबंध या गोष्टी भले सर्वसामान्य घरातल्या मुलींना किंवा विचारांना जोडणाऱ्या नसल्या तरीही त्यातल्या स्त्रीमनातल्या काही गोष्टींची नाळ मात्र प्रत्येकीशी जोडली जाते आणि हा सिनेमा अगदी सहज आवडून जातो. या सिनेमाची लांबी फारशी नसल्यामुळे त्याला आलेला खुशखुशीतपणा, अनेक मुलींच्या स्वप्नवत जगाचं चित्रण, खास दिल्लीची स्टाइल या सगळय़ामुळे सिनेमा अधिक रोचक होतो यात काहीच शंका नाही.

यातलं संगीत सुखद आहे. यातली नृत्यं किंवा व्यक्तिरेखा जरी मर्यादित विश्वातल्या असल्या तरीही खंबीरपणे उभ्या आहेत. या सिनेमाचे संवाद हे बरेचसे दुहेरी अर्थाचे आणि बरेचसे थेट (प्रौढ) देखील आहेत, पण ते इतके सहज आहेत आणि मुख्य म्हणजे स्त्रियांच्या तोंडी आहेत. त्यामुळे सुरुवातीला किंचित अवघड वाटत असलं तरी नंतर मात्र त्याची धम्माल यायला लागते. अश्लिल विनोद मोकळेपणाने मारणं ही काय फक्त पुरुष मक्तेदारी नाही आणि स्त्रियाही धीट विनोदी भूमिका तितक्याच सहज आणि खंबीरपणे निभावू शकतात हे या सिनेमातनं अगदी ठळकपणे जाणवतं. एकूणच ‘वीरे दि वेडिंग’ बघताना लग्नाची रंगतदार मजा आणि स्त्रीवादाचा एक नवा खास आविष्कार अनुभवण्यासाठी धम्माल ‘वीरे दि वेडिंग’ नक्कीच चांगला पर्याय आहे.