बालरंगभूमी – मस्ती की पाठशाला!

4189

>> क्षितिज झारापकर 

आम्ही शाळेत असताना बालमोहन विद्यामंदिरच्या शिक्षिका विद्याताई पटवर्धन यांनी ‘बजरबट्टू’ हे बालनाट्य सादर केलं आणि मराठी रंगभूमीला एक असामान्य प्रतिभेचा कलाकार लाभला. खरंतर बाल रंगभूमी ही नाट्यक्षेत्राकरिता एक विलक्षण कुरण आहे. इथून नाट्य व्यवसायाला लागणारे निपूण रंगकर्मी ही तयार होतात आणि नाट्यसृष्टीला तारणारे प्रेक्षकही. नाट्यकलेची ओढ बालवयात निर्माण झाली की, कुवतीप्रमाणे रंगकर्मी तयार होतात आणि नाट्यस्वादाची आवड निर्माण झाली की रंगभूमीचा मायबाप समजला जाणारा प्रेक्षक जन्माला येतो. खरंतर नवीन प्रेक्षक तयार करण्याची बालनाट्यांची कुवत ही मराठी रंगभूमीची सर्वात जमेची बाजू होती. आज मराठी प्रेक्षकांवर गारुड घालणार्‍या सर्व दूरचित्रवाणी वाहिन्या चालवणारे संचालक हे याचं कुरणातून जन्मलेले आहेत. याला  अपवाद नाही. पण मध्यंतरीच्या काळात नवीन प्रेक्षक बनवण्याचं हे गणित मराठी नाट्य व्यावसायिक विसरले होते. बालनाट्यांच्या नावाखाली संपूर्णतः अनइन्ट्रेरेस्टिंग सादरीकरणं होऊ लागली. परिणामस्वरूप मराठी नाटकांचा प्रेक्षक टक्का घसरू लागला. थिएटरच्या बुकिंग विन्डोवर बुकिंग पडू लागली. मराठी नाट्यक्षेत्रात ग्लॅमर नाटकातून येत असे. आजही काही अंशी हे सत्यच आहे. मराठी नाटकांची परिस्थिती ढासळू लागली तसे प्रेक्षक आणि गुणी रंगकर्मी कमी होऊ लागले. हे लगेच लक्षात आलं ते दूरचित्रवाहिन्यांच्या कारण त्यांना लागणारे दोन्ही घटक मिळणं कठीण होऊ लागलं. वाहिन्या लगेच सावध झाल्या. त्यांनी स्वतः नाट्यक्षेत्रात उतरायचं ठरवलं आणि हे करताना जे मराठी नाट्यसृष्टीचं सर्वात ताकदीचं स्थान होतं त्याला पुनरुज्जीवित करायचं ठरवलं. गेल्या दोन-तीन वर्षांत बालनाट्य पुन्हा जोमाने सुरू झाली. यात सर्वात पुढे होती झी वाहिनी.

अष्टविनायक या या नाट्यसंस्थेसोबत झी वाहिनीने या नव्या उपक्रमातलं पहिलं मराठी नाटक योजलं होतं–हॅम्लेट. आता अष्टविनायक सोबतचं झी वाहिनी घेऊन आलं आहे एक नवं कोरं बालनाट्य ‘कापूस कोंड्याची गोष्ट’.  ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ हे चिन्मय मांडलेकर लिखित आणि दिग्दर्शित कोरं करकरीत नाटक आहे. झी आणि चिन्मय मांडलेकर या दोघांसाठी बालनाट्य काही नवीन नाही. मांडलेकरांनी गेल्या दोन वर्षांत ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या दोन बालनाट्यांचे बादशहा रत्नाकर मतकरी लिखित दोन बालनाट्य रंगभूमीवर यशस्वीपणे आणली आहेत. त्यामुळे आता त्यांनीच लिहिलेलं ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ हे झी ला स्वीकारणं अगदीच सोपं होतं. त्यात या नाटकात सेलिब्रिटी कलाकार म्हणून सध्या झी वर गाजत असलेला   ‘प्यारे मोहन’ आणि मूळ बजरबट्टू अतुल परचुरे आहे. अष्टविनायक, चिन्मय मांडलेकर आणि अतुल परचुरे अशी ओळखीची मंडळी असताना झीने ‘कापूस कोंड्याची गोष्ट’  स्वीकारणं स्वाभाविक आहे.

चिन्मय मांडलेकर यांनी बाळगोपाळांना फोकसमध्ये ठेवून ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ लिहिलीय. यात राजकन्या, राजा, प्रधान आणि राजवाडा आहे. सर्कस, रिंगमास्टर, उंच बुटकी माणसं आणि विदुषक आहेत. जंगल, गुंफा, जादू, जादूगार आणि संभाषणातून चेटकीणसुद्धा आहे. थोडक्यात ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ मध्ये बालनाटय़ाला लागणारे सगळे इन्ग्रेडियन्टस् दोन तासांच्या नाटकात ठासून भरलेले आहेत. नाटकात गाणी आहेत, नाच आहे आणि उड्या आहेत. राजकन्येच्या कधीही न संपणार्‍या गोष्टींचा हट्ट पुरवण्यासाठी राजा दवंडी फिरवतो आणि एका सर्कशीचा गोष्टीवेल्हाळ विदुषक एका षड्यंत्राचा भाग म्हणून येतो आणि काय घडते ही ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या नाटकाची कहाणी आहे. दिग्दर्शनात मांडलेकरांनी गोष्ट पुढे सरकवण्याकडे अधिक भर दिलाय. पहिला राजमहालातला प्रवेश संपल्यावर एक प्रदीर्घ ब्लॅकआऊट होतो आणि एक अत्यंत सुरेख सर्कशीचा तंबू आपल्या समोर येतो. त्या सर्कस तंबूचं डिटेलिंग पाहून प्रेक्षक म्हणून आपल्या मनात असंख्य शक्यता उभ्या राहतात. या तंबूच्या इंपॅक्टमधून बाहेर पडायच्या आत प्रेक्षकांतून विदुषकाच्या भूमिकेत अतुल परचुरे प्रवेश करतात. परचुरे नाटकाचा ताबा घेतात. प्रेक्षकातील बाल रसिकांना नाटकात खेचणं हे ते इतक्या सहजपणे साध्य करतात की बालगोपाळ मंडळी त्यांना जॉईन करण्यात मशगुल होतात आणि तंबू विसरतात. बहुदा मांडलेकरांनी हे हेरलंय आणि त्या तंबूचा तसा उपयोग टाळलाय. परचुरे येतात आणि आपल्या नाच गाण्यात आणि गोष्टी सांगण्याच्या कसबात प्रेक्षकांना जखडून टाकतात. पहिल्या अंकात जिथे नेपथ्यकार संदेश बेंद्रे सर्कशीचा तंबू आणि एक सजीव हत्ती स्टेजवर आणून कमाल करतात, दुसर्‍या अंकात अमोघ वाघ यांची प्रकाश योजना नीयॉन पेन्टच्या जंगलात समोर येते. राजकन्येला जेरबंद करणारी लाईट वापरून तयार केलेली  कैद असो किंवा जंगलातल्या गुहेच्या आतली प्रकाश योजना असो. अमोघ वाघ इथे सरस ठरतात.  गीता गोडबोले यांची वेशभूषा आणि उलेश खंदारे यांची रंगभूषा ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ची परिणामकारकता निश्चित वाढवते.

मैथिली पटवर्धन ही चिमुरडी रंगकर्मी आपल्या दोन आवेशात विषेश लक्षात राहण्याजोगी कामगिरी करते. अतुल परचुरेंसोबत तिचं टय़ुनिंग झीच्या मालिकांपासूनच आहे हे जाणवतं आणि या टय़ुनिंगचा मैथिली अचूक वापर करते. अष्टविनायकचे दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांना थक्क करणारी कलाकृती निर्मित करण्याचा दांडगा अनुभव आहे. ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ याला अपवाद नाही. हे नाटक म्हणजे बालनाटय़ाची सर्कस आहे.

नाटक        कापूस कोंड्याची गोष्ट

निर्मिती     अष्टविनायक

प्रस्तुती       झी मराठी

निर्माते       दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर

नेपथ्य        संदेश बेंद्रे

प्रकाश        अमोघ फडके

संगीत        मयुरेश माडगांवकर

वेशभूषा      गीता गोडबोले

रंगभूषा      उलेश खंदारे

नृत्य          सोनिया परचुरे

सूत्रधार      प्रणित बोडके

लेखक, गीतकार, दिग्दर्शक          चिन्मय मांडलेकर

कलाकार     प्रथमेश जाधव, अमित चव्हाण,  तुषार खेडेकर, संकेत मडवी, प्रजोत शिंदे, सुनील शिंदे, प्रवीण गायकवाड, मैथिली पटवर्धन, अतुल परचुरे

दर्जा          ** 1/2

आपली प्रतिक्रिया द्या