हाऊसफुल्ल – मनोरंजनाचा धमाल मामला

1931

>> वैष्णवी कानविंदे- पिंगे

विनोद कसा असावा, तर तो पाहताना फक्त अगदी मनापासून हसता आलं पाहिजे. ना कसला तर्क आणि ना कसली भ्रांत. फक्त वेळ इतका छान आणि सहज गेला पाहिजे की, सिनेमा संपल्यावर मस्त हलकं फुलकं वाटावं. अगदी सिनेमा संपला आणि त्यातलं काही फारसं लक्षात नसलं तरी छान आनंदी वाटावं…आणि ज्या करमणुकीची कल्पना करून आपण सिनेमा पाहायला आलो असतो तो आनंद वसूल व्हावा. बऱ्याच विनोदी सिनेमाच्या बाबतीत हीच फसगत होते, पण नुकताच प्रदर्शित झालेला ‘चोरीचा मामला’ हा सिनेमा आपल्याला हवाहवासा आनंद देण्यात यथासांग यशस्वी ठरतो.

मुळात गोष्ट जितकी साधी असेल तितका चांगला विनोद खुलतो हे गणित जेव्हा लेखक आणि दिग्दर्शकाला समजतं तेव्हा सिनेमा अगदी सहज वाटायला लागतो आणि नेमकं हेच ‘चोरीचा मामला’ या सिनेमात पाहायला मिळतं. एक चौकोनी कुटुंब, त्यातला सरळ नवरा अचानक एका कात्रीत अडकतो आणि तिथून सुरू होते गोंधळाची मालिका. एकात एक अशा गोष्टी घडत जातात आणि या सगळ्यातून अगदी सहज उडणारी गम्मत अर्थात ‘चोरीचा मामला’ आपल्याला मनापासून हसवून जातो.

या सिनेमात जितेंद्र जोशी हा हुकमाचा एक्का आहे. त्याने आपल्या चेहऱ्यावरच्या हावभावातून अगदी सहज अभिनय केलाय. त्याच्या एकूणच अविर्भावातून निर्माण होणारे विनोद हसे वसूल करतात. अमृता खानविलकरदेखील फर्मास, हेमंत ढोमे हा जितका उत्तम विनोदी सिनेमा दिग्दर्शित करतो तेवढंच उत्तम विनोदाचा बाज तो अभिनयातून उमटवू शकतो हे ‘चोरीचा मामला’ पाहताना पुन्हा एकदा पटतं. अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग यांनीदेखील मजा आणली आहे. एकूणच कलाकारांची फळी अगदी नेमकेपणाने निवडली आहे आणि ते सगळे एकमेकांमध्ये अगदी उत्तमरीत्या सामावले आहेत. त्यामुळे सिनेमा कुठेही घसरत नाही, कुठेही विनोद सापक होत नाही किंवा असह्यदेखील होत नाही.

या सगळ्या सिनेमामागे लेखक, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव याची विनोदाची उत्तम जाण मात्र पुन्हा एकदा अधोरेखित होते. प्रियदर्शनमुळे सिनेमाला उत्तम विनोदी सिनेमा लाभणार आहे हे पुन्हा एकदा ठळकपणे सिद्ध होतं. निख्खळ आणि सहज विनोदाचा समतोल त्याने खरंच मस्त साधला आहे.

सिनेमाचं संगीत, गीताचे शब्द सगळंच छान धमाल. त्याशिवाय चटपटीत संवाद, घट्ट आणि नेमकेपणाने लिहिलेली पटकथा आणि चपलख बसलेली दृश्य रचना आणि त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहणारी उत्कंठा या सगळ्यात सातत्याने उमटणारी हास्याची लाट… उत्तम विनोदी सिनेमाला अजून काय हवं असतं. थिएटमध्ये जा, हा सिनेमा मनसोक्त एन्जॉय करा. सगळी मरगळ निघून जाईल हे नक्की.

  • सिनेमा      चोरीचा मामला
  • दर्जा   ****
  • निर्माते      सुधाकर ओमळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमळे
  • कथा /दिग्दर्शन   प्रियदर्शन जाधव
  • पटकथा/संवाद     प्रियदर्शन जाधव आणि हरीश कस्पटे
  • गीते    जितेंद्र जोशी, मंगेश कांगणे, जय अत्रे
  • संगीत  चिनार महेश, प्रफुल्ल स्वप्नील
  • कलाकार    अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी,हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग, कीर्ती पेंढारकर
आपली प्रतिक्रिया द्या