वैचारिक प्रयोग!

137

>> क्षितीज झारापकर

‘सोळा एके सोळा’ एका दिग्दर्शक आणि लेखकाची नवे नाटक सुरू करण्याची मनोरंजक चर्चा…

नाटक उभं करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते हा प्रश्न भरतमुनींपासून आजच्या सुजाण प्रेक्षकांपर्यंत सर्वांना कधी ना कधीतरी पडलेला आहे. त्यात मराठी माणसांना जरा जास्तच. कारण जगाच्या कोणत्याही कोपऱयात दोन मराठी माणसं एकत्र आली की प्रथम एक मराठी मंडळ स्थापन होतं आणि त्या मंडळातर्फे गणेशोत्सवात कोणतं नाटक सादर करायचं याची खलबतं सुरू होतात असं ऐकिवात आहे. नाटय़कलेवर इतकं निस्सीम आणि निर्व्याज प्रेम करणारी दुसरी जमात जगात शोधून सापडणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात नाटय़गृह एकवेळ नसतीलही पण नाटय़कर्मींची कमतरता महाराष्ट्रभूमीला कधीही पडणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीला जितकं महत्त्व मिळत नाही त्यापेक्षा जास्त महत्त्व अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीला मिळतं ते बहुदा याचमुळे. आणि मग एक नाटक कसं करायचं हा प्रश्न मराठी माणसाच्या संदर्भात पराकोटीचा गहन आणि जाज्वल्य ठरतो. अलीकडेच महाराष्ट्रच नाही तर अखंड ब्रह्मांडाला शहाणपण शिकवणाऱया पुण्यनगरीतल्या एका हुशार आणि विद्वान नाटककाराने या शंकेचं निरसन करायचं ठरवलं आणि या विषयावर एक नाटकच लिहिलं. ‘सोळा एके सोळा’ हे नाटक भूमिका थिएटर्स या संस्थेने सध्या व्यावसायिक रंगमंचावर आणलंय. हे नाटक पुण्यातील डॉ. विवेक बेळे या अत्यंत प्रगल्भ आणि प्रतिभावान लेखकाने लिहिलंय.

डॉ. बेळेंची नाटकं ही उत्तम वैचारिक बैठकीतून उतरलेली भन्नाट नाटकं आहेत. काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर अफाट गाजलेलं माकडाच्या हाती शॅम्पेन हे बेळेंचंच नाटक. मराठी समाजाचे आजचे प्रश्न बेळे फार मार्मिकपणे आपल्यासमोर मांडतात आणि हसताहसता आपण नकळत अंतर्मुख होऊन विचार करू लागतो, हे कसब भल्याभल्या नाटककारांना अवगत नाही. बेळे त्यांच्या प्रत्येक नाटकात हे करून दाखवतात. सध्या तुफान गर्दीत चालू असलेला ‘आपला मानूस’ हा चित्रपट बेळेंच्याच ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकावरून काढलेला आहे. त्यामुळे अशा एका संपन्न लेखकाने नाटक कसं करावं या विषयावर नाटक लिहिल्यावर उत्सुकता स्वाभविक आहे.

‘सोळा एके सोळा’ एका दिग्दर्शकापासून सुरू होतं. हा प्रस्थापित असलेला दिग्दर्शक एका नवोदित लेखिकेला भेटायला येतो आणि तिने लिहिलेलं नाटक कसं उभं करायचं यावर ते दोघे चर्चा करतात असा काहीसा घाट ‘सोळा एके सोळा’ नाटकाचा आहे. आता वास्तवात एखाद्या निर्मात्याकडे एखादा नवीन लेखक जातो तेव्हा निर्माता त्याला त्याच्या गोटातल्या दिग्दर्शकाशी बोलून नाटक बांधायला सांगतो. नाटक हा कन्स्ट्रक्शनसारखा धंदा झाल्याने आणि प्रामुख्याने तिथलाच पैसा या धंद्यात आल्याने हल्ली नाटकं बांधली जातात. ‘सोळा एके सोळा’मध्येही बेळेंनी हेच प्रयोजन साधलंय. आता दिग्दर्शक लेखिकेला तिच्या नाटकात बदल सुचवू लागतो. आर्किटेक्ट हल्ली ज्याप्रमाणे स्थापत्यशास्त्र्ााचा विचार करण्यापेक्षा वास्तुशास्त्र्ााचा अधिक विचार करतात त्याप्रमाणे हा दिग्दर्शक नाटय़मूल्यांपेक्षा प्रेक्षकांच्या दृष्टिकोनाचा विचार करुन हे बदल सुचवतो हे एक टेरिफिक क्लृप्ती वापरून बेळेंनी इथे मांडलंय. एका प्रथितयश दिग्दर्शकाच्या आणि एका नवीन लेखिकेच्या या संघर्षातून ‘सोळा एके सोळा’चा डोलारा हा खूपच मार्मिक आणि इंटरेस्टिंग पद्धतीने पुढे सरकू लागतो. यात मग आपल्याला तिने लिहिलेल्या नाटकातले प्रसंगही त्या पात्रांसकट दिसू लागतात आणि खेळ अधिकच बहरदार होऊ लागतो.

दिग्दर्शक म्हणून आनंद इंगळे आणि लेखिका म्हणून शर्वाणी पिल्लई या दोघांनी ‘सोळा एके सोळा’ खेळवत ठेवलंय. आनंदचा बनचुके अॅटीटय़ूड आणि शर्वाणीने आपले हात दगडाखाली आहेत हे जाणून सादर केलेल्या या दोन व्यक्तिरेखा कमालीच्या सहज वाटतात. मुळात दोघांनी अत्यंत समजुतदार अभिनय साकारलाय. ऑथर बॅक्ड असल्याने सुरुवातीपासून आनंदचा दिग्दर्शक वरचढ वाटू लागतो, पण नाटक पुढे जातं तसं शर्वाणी टेकओव्हर करते आणि लेखिका स्ट्राँग होत जाते. सुरुवातीला शर्वाणी आणि नंतर आनंद स्वतः वरचढ होण्याचा प्रयत्न करत नाहीत इथे ‘सोळा एके सोळा’ जिंकतं. विवेक गोरेचा नाटकातल्या नाटकातला बाप, अमृता देशपांडे त्याची मुलगी आणि निखिल दामले प्रियकर हे तिघे जवळजवळ अर्धे नाटक व्यवस्थित सांभाळतात. मुळात हे नाटकातलं नाटक आजच्या पिढीचं असल्याने ते इंटरेस्टिंग आहे. रेणुका बोधनकरची जे-१६ या सीटवरची स्त्र्ााr प्रेक्षक छान वठलीये. मुळात इतरांचे सीन सुरू असताना हे सगळे कलाकार स्टेजवरचं असल्याने रिऍक्ट होतात ते छान वाटतं. इथे सुबोध पंडेचं दिग्दर्शन दिसतं.

सुबोधनं ‘सोळा एके सोळा’ हे तसं थोडं कॉम्प्लिकेटेड नाटक अत्यंत सोपं करून उभं केलंय हे कौतुकास्पद आहे. बेळेंचं लिखाण हे असंच असतं, पण सुबोधने ग्राफिक्सचा चपखल वापर करून ते सामान्य प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलंय. संदेश बेंद्रेचं नेपथ्य हे नेहमीप्रमाणेच दिमाखदार आणि नाटकाला पूरक आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना उत्तम. संदेश सप्तीसकर पर्याप्त संगीत देतात. नाटकासाठी महत्त्वाचे असणारे सगळे घटक म्हणजे लेखिका, दिग्दर्शक, निर्माते, प्रेक्षक आणि नाटकातील पात्र हे सर्व यात आहेत. तरीही हे खूप मनोरंजक आणि हुशार नाटक आहे.

नाटक – सोळा एके सोळा
दर्जा – तीन स्टार
निर्मिती – भूमिका थिएटर्स निर्मित
निर्माते – श्रीकांत तटकरे
लेखक – विवेक बेळे
नेपथ्य – संदेश बेंद्रे
प्रकाश – शींतल तळपदे
संगीत – समीर सप्तीसकर
दिग्दर्शक – सुबोध पंडे
कलाकार -शर्वाणी पिलाई, रेणुका बोधनकर, अमृता देशमुख, विवेक गोरे, निखिल दामले, आनंद इंगळे

आपली प्रतिक्रिया द्या