शंभरापैकी शंभर मार्क

>> क्षितीज झारापकर

मराठी नाटय़वर्तुळात पूर्वी बालनाटय़ हा एक खूप महत्त्वाचा आणि रंजक भाग होता. त्याकाळी बालरंगभूमीचे काही आधारस्तंभ होते. यात सुधा करमरकर आणि रत्नाकर मतकरी ही नावं अग्रगण्य होती. आज मराठी भाषा लोप पावत चालली आहे. आपली संस्कृती ‘खतरे में है’ अशा आरोळ्या उठू लागल्या आहेत. गेल्या शतकातल्या सत्तरीच्या दशकापर्यंत मराठी माणसांची मुलं मराठी शाळांमध्येच शिकायची. घरातली आणि शाळेतली भाषा एक असल्याने शिक्षण चांगलं व्हायचं. जागतिक पातळीवरच्या इंग्रजी या चलनी भाषेचं महत्त्व मराठी माणसाने चटकन ओळखलं आणि मग घरातल्या बापाच्या डोक्याला त्रास नको म्हणून मुलांना कॉन्व्हेन्टमधल्या फादरच्या झग्यात (पदरात) टाकायला सुरुवात झाली. मराठी शाळेत दहावीला पुलंच्या अंतू बर्व्याचा धडा असे. आता कॉन्व्हेन्टमधे अर्नेस्ट हेमिंग्वे आणि वर्डस्वर्थ यांची ओळख होऊ लागली आणि मराठी साहित्याशी असलेली नाळ तुटू लागली. बालनाटय़ेही चेटकिणीच्या बाहेर पडली ती सरळ पोकेमॉन, डोरेमॉनच्या दिशेने गेली. आता जसे हरी तात्या, सखाराम गटणे आणि अंतू बर्वा मराठी मुलांना अनोळखी होते तसेच हे पोकेमॉन, डोरेमॉन मराठी पालकांना ओळखू येत नव्हते. मराठी पालकांचं आंग्लाळलेलं कौतुक हे सिंड्रेला आणि रॉबिनहुडपर्यंत सीमित होतं. शिवाय याच वेळेला इंटरनेटमुळे मुलांचं जग खूप विस्तृत झालं. त्यामुळे बालनाटय़ांची गर्दी कमी होऊ लागली. यावर काहीतरी तोडगा आवश्यक होता. इथे निर्माते विजू माने आणि अशोक नारकर यांनी गंधार, कोकण कला अकादमी आणि अमृता प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून दिग्दर्शक प्रा. मंदार टिल्लू यांच्यासोबत एक मास्टर स्ट्रोक मारला आहे.

पु. ल. देशपांडे हयात असतानाच मतकरींनी त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकाचं नाटय़रूपांतर केलं होतं. मंदार टिल्लू सरांनी रत्नाकर मतकरींचं हेच नाटक बालकलाकारांना घेऊन सध्या रंगभूमीवर आणलेलं आहे. पु. ल. देशपांडे आणि रत्नाकर मतकरींच्या संयुक्त पुण्याईच्या मदतीने नवीन मराठी पिढीला मराठी साहित्याची, नाटकाची आणि महाराष्ट्रीयन समाजजीवनाची तोंडओळख करून देण्याची ही कल्पनाच भन्नाट आहे. यामुळे मुलांना संपन्न साहित्य आणि संस्कार मिळतीलच, पण पु. लं.च्या नर्मविनोदी शैलीमुळे हा अनुभव गंमतशीर होतो आणि मराठीची गोडी वाढण्याची शक्यता खूप प्रबळ होते. त्यात ज्या साहित्यावर पालकांनी आजवर अतोनात प्रेम केलं तेच ओळखीचं आणि आवडणारं साहित्य आता मुलांपर्यंत पोहचवायला ते अधिक उत्सुक होऊन बालनाटय़ाची गर्दी वाढवतील यात शंका नाही.

कल्पना कितीही चांगली असली तरी कशी वठली आहे याला परफॉर्मन्स आर्टस्च्या जगात महत्त्व असतं. टिल्लूंपुढचे मोठे आव्हान लहान मुलांना या नाटकातल्या व्यक्तिरेखा समजावून देऊन त्यांच्याकडून समजूतदार अभिनय करून घेणं हे होते. प्रेक्षक म्हणून याची उत्सुकता मलाही होती. प्रयोगाचा अनुभव अत्यंत सुखद होता. सर्व कलाकार मुलांनी खूप समजून उमजून हे नाटक सादर केलंय. त्यांच्या एकंदरीत ऊर्जेमुळे नाटक पाहताना मज्जा येते. उदा. परोपकारी गंपूच्या प्रसंगात गंपूची आई झालेली चिमुकली श्रावणी जाधव हिने वय दाखवण्यासाठी जी मनापासून मान हलवलीये ती लाजवाब आहे. स्वरा जोशी हिने नाथा कामत प्रसंगात लडीवाळ श्यामा चित्रे निव्वळ मुद्राभिनयातून फारच उत्तम उभी केलीये. सिमरन वाव्हळ, संचिता ओडेकर, पूर्वा सावंत, अक्षत कांबळे, सोहम पारकर, आर्य पाटील, क्षितिज काळुंके आणि अद्वैत वाचकवडे या सर्वांनी आपापल्या भूमिका मनस्वीरीत्या वठवल्या आहेत. या सगळ्यांचा रंगमंचावरचा वावर इतका सहज आहे की, हल्लीच्या काही व्यावसायिक नटांनाही कॉम्प्लेक्स यावा. यातच दिग्दर्शक म्हणून प्रा. मंदार टिल्लूंचं यश आहे. इतक्या लहान मुलांना अशा स्वरूपाच्या आशयात कंट्रोल करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. या मुलांच्या सहयोगामुळे नाटकातल्या मुख्य व्यक्तिरेखा अधिक उठून दिसतात.

नाटकातील मुख्य व्यक्तिरेखांकडे वळण्याआधी एक गोष्ट सांगणे गरजेचे आहे. पु. ल. देशपांडे हे केवळ लेखक नव्हते. ते स्वतः एक उत्तम अभिनेते होते आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या लिखाणात ठाशीव असणाऱया व्यक्तिरेखा आपल्या अभिनययुक्त कथाकथनाच्या विशिष्ट शैलीतून अजरामर करून ठेवल्या आहेत. बरेच नट त्या सादर करताना त्यात स्वतःचं अभिनयकौशल्य दाखवण्याचा सोस धरतात आणि मग सादरीकरण फसतं. इथे मात्र सादर करणारे बालकलाकार व्यक्तिरेखेशी इतके प्रामाणिक राहतात की, पु.लं.ना अभिप्रेत असणाऱयाच व्यक्तिरेखा निर्भेळपणे आपल्यासमोर येतात. यश जोशी नारायणची आगतिकता आणि श्रेयस थोरात नामू परीटाचा रांगडेपणा छान सादर करतात. अथर्व बेडेकर स्टायलाईज्ड नाथा कामत आणि स्वानंद शेळके सखाराम गटणेचं अर्कचरित्र अगदी मनापासून करतात. सुमेध वाणीचा प्रेमळ हरी तात्या आणि कौस्तुभ पाटीलचा उत्तेजित परोपकारी गंपू मस्त जमलेत. वेदांत जकातदारचा बापू काणे आणि शौनक करंबेळकरचे चितळे मास्तर कमालीचे खरे वाटतात. अद्वैय टिल्लूचा बबडू रांगडा तर आहेच, पण भावूकही झालाय. भाऊची आई मीरा परांजपेने खूपच सुंदर साकारलीये. ‘व्यक्ती आणि वल्ली’तील सर्वात पॉप्युलर व्यक्तिरेखा अंतू बर्वा. इथे वेदांत आपटेने कहर केलाय. भाषेची पकड, विचारांची समज आणि अखंड शरीराचा मुद्राभिनय या सगळ्यांच्या बाबतीत वेदांतचा अंतू बर्वा फॅन्टॅस्टिक आहे. इथे भाऊंच्या भूमिकेत कैवल्य लाटकर विशेष लक्षात राहतो. कैवल्यचं डिक्शन आणि भाषेची समज हा त्याचा स्ट्राँग पॉईन्ट त्याने खूप परिणामकारकरीत्या वापरलाय.

मंदार टिल्लूंचा हा प्रयत्न तांत्रिक बाबींमधेही कुठेही कमी पडत नाही. खरं तर हा प्रयत्न करणाऱ्या सर्वांनाच पैकीच्या पैकी मार्क मिळतात. आता प्रेक्षकांनी अशा प्रामाणिक आणि चांगल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देऊन प्रयोगांना गर्दी करायला हवी.
दर्जा – तीन स्टार
नाटक – व्यक्ति आणि वल्ली
निर्मिती – कोकण कला अकादमी अमृता प्रॉडक्शन, गंधार
निर्माते – विजू माने, अशोक नारकर
सूत्रधार – प्रा. संतोष गावडे
लेखक – पु. ल. देशपांडे
नाटय़रुपांतर – रत्नाकर मतकरी
नेपथ्य – प्रसाद वालावलकर
प्रकाश योजना – शितल तळपदे
पार्श्वसंगीत – वैभव पटवर्धन
वेशभूषा – प्रकाश निमकर
दिग्दर्शन सहाय्य – राजू आठवले, प्रशांत विचारे
दिग्दर्शक – प्रा. मंदार टिल्लू
कलाकार – स्वरा जोशी, सिमरन वाव्हळ, संचिता ओडेकर, पूर्वा सावंत, यश जोशी, श्रेयस थोरात, अथर्व बेडेकर, स्वानंद शेळके, सुमेध वाणी, कौस्तुभपाटील, शौनक करंबेळकर, वेदान्त आपटे