हंपी डेस्टिनेशन सिनेमा

30

>>वैष्णवी कानविंदे-पिंगे

पौराणिक खुणा जपणारं, देशोविदेशीच्या पर्यटकांना भुरळ घालणारं हंपी शहर. तिथलं राहाणीमान, तिथलं वातावरण, तिथली संस्कृती, तिथला सूर्योदय, तिथला सूर्यास्त, तिथल्या सावल्यांचे खेळ, घुमणारा आवाज कॅमेऱ्याच्या माध्यमातनं अत्यंत देखणेपणाने टिपणारा हा ‘हंपी’ सिनेमा… तिथे प्रत्यक्ष जाण्याचा खर्च न करता जर या शहराच्या सौंदर्याचा पुरेपूर अनुभव घ्यायचा असेल तर हा सिनेमा अतिशय सुंदर अनुभव देईल. खरंच! पण शहर आणि त्यावरची कलाकृती असा जर स्पष्ट परीघ आखला असता तर हंपी हा सिनेमा नावाला सार्थ ठरला असता. पण झालंय असं की हंपीच्या देखण्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट घडते. पण ती प्रेमकथा त्या हंपीतच का घडते? सिनेमात अथपासून इतिपर्यंत हंपीचं दर्शन एवढंच नाही तर सिनेमाचं शीर्षकदेखील हंपी म्हटल्यावर हंपीशी त्या कथेचा काहीतरी धागा जुळलेला असला पाहिजे अशी मूलभूत अपेक्षा प्रेक्षकाला असणारच नाही का. पण सिनेमा संपला तरी हंपी आणि ती प्रेमकथा यांना जोडणारा दुवा सापडतच नाही. मिळतो तो तत्त्वज्ञानाचा ओव्हरडोस आणि सरतेशेवटी सिनेमा पहाताना उरतो तो फक्त कंटाळा.

प्रेमावर विश्वास नसणारी आजच्या पिढीची, मॉडर्न तरुणी ईशा हंपीमध्ये फिरायला येते. तिच्या आई बाबांचा अठ्ठावीस वर्षांच्या लग्नानंतर काडीमोड होणार असतो आणि त्यामुळे ती कमालीची अस्वस्थ असते. या सगळय़ातनं बाहेर पडता यावं म्हणून तिच्या दिल्लीच्या मैत्रिणीसोबत, गिरिजासोबत ती ही सहल ठरवते. पण दुर्दैवाने कामाच्या व्यापामुळे मैत्रिणीला येता येत नाही. तिथे पहिल्याच दिवशी तिला कबीर नावाचा एक मराठी तरुण भेटतो. तो देखील तिथे एकटाच फिरायला आलेला असतो. त्या दोघांची मैत्री होते… मग पुढे काय होतं ते सांगणारा हा सिनेमा.

या सिनेमाच्या अंगोपांगी देखणेपण आहे हे निर्विवाद. हंपी शहर, तिथली माणसं, तिथे राहाण्याचं ठिकाण, तिथली हॉटेलं, इतकंच काय तर ईशा, गिरिजा, कबीर यांची स्टाईल, त्यांचा कपडेपट सगळंच अगदी देखणं. रेखाटन करण्यात कुठचाही सुटा बंद नाही. त्यामुळे हा सिनेमा एखादय़ा चित्रासारखा वाटतो. नेमकं सांगायचं तर, काळाघोडा फेस्टिव्हलसारख्या ठिकाणी गेल्यावर कसं वाटतं तसंच काहीसं हा सिनेमा पहाताना वाटतं. यात दिग्दर्शकाने तरुण पिढीचे विचार हंपीच्या पुरातन पार्श्वभूमीवर कसे दिसतात हे दाखवायचा प्रयत्न केलाय. खरंतर या दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये बेमालूमपणे मिसळल्या असत्या तर मजा आली असती. पण दुर्दैवाने तसं होत नाही. या मुलांच्या स्टाईलला, त्यांच्या कपडय़ांना न शोभणारे संवाद सिनेमाला चौकटीतच बंदिस्त ठेवतात.

ईशा खूप दुःखी आहे. लोकांची तुटणारी नाती बघून तिला प्रेम नाहीच यावर विश्वास बसलाय. सोनाली कुलकर्णीने उभी केलेली ईशा या सिनेमाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. पण ती व्यक्तिरेखा पहाताना थोडा गोंधळ वाटतो. म्हणजे तिचा स्वभाव शांत, स्वत:च गुंतलेला, कोशात गुरफटलेला असा आहे. असं असताना तिची एका परक्या मुलासोबत होणारी मैत्री खटकते. म्हणजे अशा प्रकारे चटकन मैत्री होऊ शकते. पण या सिनेमामध्ये डिझायनर लूक जपण्याच्या नादात काही गोष्टी वरवरच्या झाल्या आहेत आणि त्यामुळेच या व्यक्तिरेखांमधली सहजता गायब झालीय. ईशाचं मध्येच नृत्यं करणं वगैरे गोष्टी त्या पार्श्वभूमीला देखणं करण्याच्या नादात उगाचच घडवून आणल्यासारख्या वाटतात.

ईशाच्या स्वभावापेक्षा खूप वेगळी गिरिजा सुरुवातीपासनंच आपल्याला नेमून दिलेल्या व्यक्तिरेखेत सहज मिसळायचा प्रयत्न करताना दिसते. पण तो सहज प्रयत्न ओढूनताणून केल्यासारखा वाटतो. ललित प्रभाकर मात्र छान वाटतो. त्याचा वावर, त्याची स्टाईल यात बरीच सहजता आहे. पण या तीन मुख्य कलाकारांपेक्षा प्रियदर्शन जाधवने उभा केलेला रिक्षावाला आर. रणजीत लाजवाब. त्याने इतकं सहज आणि मस्त काम केलंय की दाद द्यावी तितकी थोडीच. विजय निकमने उभा केलेला शंकरही झक्कास. या दोन तीन जणांमुळे सिनेमाच्या गच्च वाटणाऱया बांधणीत जरा मोकळेपणा आलाय.

बाकी सिनेमाची कथा फारशी भिडतच नाही. या सिनेमाची सगळय़ात मोठी दुबळी बाजू हे त्याचे संवाद आहेत. प्रत्येकाच्याच वाटय़ाला असणारे जड जड तत्त्वज्ञानाचे संवाद ऐकताना कंटाळा यायला लागतो. इतकं की, पुढचं दृष्यं आलं की नव्या तत्त्वज्ञानाच्या प्रहसनासाठी मनाची तयारी करावी लागते. आणखी एक दुबळा दुवा म्हणजे या सिनेमाचा जीव खूप छोटा आहे. पुढे काय घडणार किंवा दृष्यं कसं वळण घेणार याचा अंदाज कितीतरी आधी येतो आणि तसंच घडायला लागतं. त्यामुळे सिनेमातली गंमत निघून जाते. शिवाय सतत मोठेमोठे संवाद. कोण ना कोण सतत काहीतरी जड जड बोलायला लागलं की ते झेपत नाही.

आणखी एक, हंपीच्या ठिकाणी कोकण, हिमाचल किंवा कन्याकुमारी असतं तरी काही फरक पडला नसता. हंपीच का हा प्रश्न उरतोच. (कदाचित सिनेमांमध्ये आजवर न पाहिलेलं ठिकाण वाटय़ाला आलं असं म्हणूयात)

असो. बाकी या सिनेमाचं संगीत, पार्श्वसंगीत, प्रकाश योजना, कला दिग्दर्शन या सगळय़ा गोष्टी अप्रतिम आहेत. खरं सांगायचं तर, या सिनेमाची कथा, संवाद या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि हंपीच्या देखणेपणाला अधिक सुंदर करणाऱ्या कॅमेऱ्याची जादू, सोबत संगीताची जोड या गोष्टी मनमुराद अनुभवाव्यात. दर्दी मन नक्की सुखावून जाईल यात वादच नाही. पण सिनेमा पहायला जाणाऱ्या माणसाची अपेक्षा सगळय़ात आधी सिनेमाच्या कथेभोवती गुंतलेली असते त्यामुळे दृष्यानुभव विलक्षण असला तरीही अपेक्षांचं पारडं भरतच नाही. एकूणच काय, हा सिनेमा पहायचा असेल तर तो फक्त हंपी या स्थलदर्शनावर बनलाय आणि त्या शहराचं अगदी चोख टिपलेलं सौंदर्य बघायलाच थिएटरमध्ये जायचंय असं ठरवावं. बाकी फार अपेक्षा नकोत.

दर्जा : अडीच स्टार
सिनेमा : हंपी
निर्माता : योगेश भालेराव
दिग्दर्शक : प्रकाश कुंटे
लेखक : अदिती मोघे
छायांकन : अमलेंदु चौधरी
संगीत : नरेंद्र भिडे, आदित्य बेडेकर
कला : पूर्वा पंडित
कलाकार : सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर, प्रियदर्शन जाधव, विजय निकम.

आपली प्रतिक्रिया द्या