पराक्रमाची ऐतिहासिक गाथा- फर्जंद

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

शिवाजी महाराज म्हटलं की, प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात विशेष बळ येतं. शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी गाजवलेले पराक्रम आणि काबीज केलेल्या मोहिमा, गनिमी कावा, स्वराज्य हे सगळं ऐकतानाच एकदम भारी वाटतं. त्या शिवकालीन कथा कितीही ऐकल्या वाचल्या तरी प्रत्येक वेळी तितकाच रोमांच उठतो… हे सगळं पूर्वीच्या पुढीने अनुभवलं, आत्ताची पिढी अनुभवतेय आणि येणाऱया पिढीनेही अनुभवलं पाहिजे. शिवगाथा पिढ्यान्पिढ्या जिवंत राहिलीच पाहिजे आणि त्यासाठीच शिवराज्यातील संघर्षावर अधिकाधिक सिनेमे आलेच पाहिजे. म्हणूनच ‘फर्जंद’ या सिनेमाच्या प्रयत्नाबद्दलच कौतुक.

शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शूर मावळय़ांनी अनेक मोहिमा राबवल्या. कधी प्राणांची आहुती देत, कधी दुष्मनाला धारातीर्थी पाडत त्यांनी असंख्य गडकिल्ले काबीज केले. मृत्यूलाही न जुमानता असे अनेक मावळे, अनेक सरदार निधड्या छातीने लढत राहिले आणि त्यातूनच स्वराज्य उभं राहिलं. इतिहासात तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे अशा अनेक शूरवीर योद्ध्यांची नोंद तर आहेच, पण त्याशिवायही अनेक वीरांच्या एकत्र प्रयत्नातनं स्वराज्याची प्रत्येक वीट रचली गेली आहे. ‘फर्जंद’ हीदेखील एका वीरांच्या वीरतेची कथा आहे. जेव्हा राज्याभिषेक होणार होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या मनात एक खंत होती ती पन्हाळय़ाची. पन्हाळा काबीज केला नाही तर स्वराज्य पूर्ण होणार नाही. त्यामुळे कसंही करून तो मिळवायचाच ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आणि त्या मोहिमेचं सूत्र कोंडाजी फर्जंद या शूर योद्धय़ाला दिलं. पन्हाळय़ासारखा मजबूत गड, त्यावर असलेले अडीच हजारांवर तैनात मुघल सैन्य, त्यांचा म्होरक्या हा अत्यंत क्रूर मुघल सरदार. पण असं असतानाही केवळ साठ निवडक मावळय़ांचं सैन्य घेऊन तो पन्हाळय़ावर चालून गेला आणि पन्हाळा सर केला. इतिहासात नोंदवल्या गेलेल्या या पराक्रमाची आणि पराक्रमी वीरांची कथा म्हणजेच ‘फर्जंद’ हा सिनेमा.

हा सिनेमा बनवलाय छान. म्हणजे शिवाजी महाराज, त्यांचं सैन्य, त्यांचे विचार, त्यांच्या सगळ्याच मावळ्यांमध्ये असणारी विजिगिषु वृत्ती आणि मुख्य म्हणजे सगळ्या रयतेत असणारं स्वराज्याबद्दलचं प्रेम हे सगळंच खूप नेटकेपणाने उभं राहिलंय. गडावरचं वातावरण, जंगल, दऱ्याखोऱ्यातलं वातावरण हा सगळा शिवकाल बऱ्यापैकी उभा राहिला आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. उत्तम अभिनय, चांगलं दिग्दर्शन या सगळय़ाला तितकीच भक्कम साथ लाभलीय ती ‘व्हीएफएक्स’ तंत्रज्ञानाची. मोठय़ामोठय़ा लढाया उभ्या करताना किंवा किल्ला सर करायची मोहीम दाखवताना ‘व्हीएफएक्स’मुळे कमाल प्रभाव पडतो आणि भारावून जायला होतं. गाणी मोजकी आणि प्रसंगानुरूप असल्याने या सिनेमाला छान शोभूनही दिसतात.

या सिनेमात नावाजलेल्या कलाकारांची जंत्री पाहायला मिळते. शिवाजी महाराजांवरील या चित्रपटात वावरणारे हे सगळे कलाकार पाहून छान वाटतं. मुख्य म्हणजे यातल्या सगळय़ांचीच कामं चोख झाली आहेत. मग चिन्मय मांडलेकर यांनी साकारलेले शिवाजी महाराज असो, मृण्मयी देशपांडेनी साकारलेली तमासगीर असो, अंकित मोहनने उभा केलेला फर्जंद असो वा प्रसाद ओकने साकारलेला बहिर्जी नाईक. आस्ताद काळे, निखिल राऊत, गणेश यादव, समीर धर्माधिकारी अशी सगळय़ांचीच कामं छान जमून आली आहेत. त्यांचे संवाद, बोलायची ढब आणि एकूण वावर यामुळे ते वातावरण उभं राहायला हातभारच लागलाय.

पण असं जरी असलं आणि शिवाजी महाराजांच्या काळावरचा सिनेमा उभा करण्याबाबत कौतुक जरी असलं तरीही लांबी-रुंदीमध्ये हा सिनेमा कारण नसताना लांबलाय. दृश्यांच्या पेमात पडत संकलनाची कात्री न चालवल्यामुळे मध्यंतरानंतर जिथे सिनेमा रंगत जायला हवा होता तिथे थोडा कंटाळय़ाचा अनुभव येतो.

युद्धपटात अधेमधे असणारी विनोदी पाखरण चांगली वाटत असली तरीही त्या सगळय़ात खूपच वेळ काढला गेलाय. त्यामुळे होतं असं की मध्यंतर अर्ध उलटून गेलं तरीही सिनेमातलं अजून मुख्य युद्ध बाकी आहेच की याची जाणीव व्हायला होते आणि हा सिनेमा संपता संपेना अशी गत होते. मग मुख्य युद्ध सुरू होतं तेव्हा त्यातला संघर्षही अधिक खऱ्या पद्धतीने दाखवता आला असता असंही वाटत राहतं. म्हणजे तुंबळ युद्ध सुरू असताना फर्जंद हीरो असल्यामुळे तो एकटाच राक्षसी जल्लादांशी सामना करतो, हत्तीचं बळ असणाऱया मुघलाला चीत करतो आणि मुख्य क्रूर मुघलाशी लढाई करतो. इतिहासात जरी असलं तरी ते मांडताना मसालेदार करून मांडलं आहे असं खूप जाणवत राहतं. हा सिनेमा इतिहास सांगतो. त्यामुळे त्याला मसाल्यापेक्षा त्यातल्या खरेपणाची जोड दिली असती तर ती अधिक प्रभावी झाली असती इतकंच.

शिवाय आधीचा फाफटपसारा काही ठिकाणी पुनः पुन्हा झालाय. उदाहरणार्थ, मावळय़ांच्या दोन गटांतली जुगलबंदी किंवा तत्सम दृश्यांना थोडं काटता आलं असतं तर या सिनेमाचा खुसखुशीतपणा आणखी वाढला असता. बाकी इतिहास जिवंत होताना पडद्यावर पाहायला खूप मस्त वाटतं. असे सिनेमे आपल्या जाज्वल्य इतिहासाची पुन्हा एकदा जाणीव करून देतात. म्हणूनच थोडय़ा उणिवा असल्या तरीही त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष करून हा फर्जंदचा इतिहास थिएटरमध्ये जाऊन नक्की अनुभवावा.