फिरकी – कच्ची कणी

30

>>वैष्णवी कानविंदे-पिंगे

सिनेमा हा पतंगाच्या फिरकीसारखा असावा. विषयाला किती ढील द्यायचा, कसा नेटकेपणाने गुंडाळायचा हे सगळं फिरकीचंच तत्त्व. ते जर नीट जमलं तर सिनेमाच्या पतंगाला भरारी घेण्यासाठी आकाश थोडं होऊ शकतं, पण तसं नाही झालं तर मात्र कितीही रंगीत मांजा असला किंवा कितीही आकर्षक पतंगाचा कागद असला तरी तो काटला जाऊ शकतो. उत्तम सिनेमाचा हा फॉर्म्युला सिनेमा बनवणाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवा खरं तर… पण नेमकं तेच होत नाही. मग वरकरणी छान दिसणारा मांजा तरी गुळगुळीत निघतो नाहीतर ढीलच सुटत नाही आणि सिनेमा फसतो.

तर, ‘फिरकी’ असं नाव असणारा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. त्याचा विषय नक्कीच जरा वेगळा, अस्पर्शित आहे. पतंगाची स्पर्धा. खरं पाहता आपल्या अस्सल मातीतला हा विषय. त्यामुळे तो विषय घेऊन नेमक्या दिशेला फिरकी फिरवली असती तर सिनेमाने चांगली भरारी घेतली असती, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. विषय चांगला असला तरी त्याची बांधणी मात्र कच्ची राहिलीय आणि त्यामुळे सिनेमा वेगच घेत नाही.

ही एका मुलाची गोष्ट. एका छोट्या गावात आपल्या आईवडिलांसोबत राहणारा एकुलता एक मुलगा. गावात मस्तीखोर म्हणून प्र्रसिद्ध. त्याचे दोन घनिष्ठ मित्र. त्या तिघांना आणि गावातल्या बहुतेक सगळय़ाच मुलांना पतंग उडवायचा नाद. संक्रांतीला दरवर्षी गावात पतंग उडवायची स्पर्धा भरते. त्यात गावात दादा म्हणून प्रसिद्ध असणारा मुलगाच जिंकत आलाय. त्याच्याशी या मुलाचं वितुष्ट आलंय आणि आता येत्या संक्रांतीला पतंग स्पर्धेत या दोघांपैकी जो हरेल त्याने पतंगबाजी कायमची सोडायची असं ठरतं आणि मग स्पर्धेच्या तयारीला सुरुवात होते. मग या स्पर्धेत कोण कसं आणि का जिंकतं याची गोष्ट म्हणजे ‘फिरकी’ हा सिनेमा.

प्रमुख बालकलाकार पार्थ भालेराव किंवा त्याचा जिगरी दोस्त पुष्कर लोणारकर हे दोघंही मराठी सिनेमांमध्ये कायम वावरतात. त्यामुळे त्यांचे चेहरे मराठी सिनेमासाठी नवीन नाहीत. त्या दोघांनी आपापली कामं छान आणि सहज केलीयत. बाकीचे बालकलाकारही तितकेच सहज वावरलेयत. हा सिनेमा बहुतांश बालकलाकारांवरच बेतला असल्याने ती फळी चांगली जमून आलीय. हृषीकेश जोशीसारखे नाणावलेले कलाकारही या सिनेमात आहेत, पण क्रिप्टमध्ये त्यांच्या वाटय़ाला काहीच न आल्याने त्यांचं असणं जवळ जवळ फुकटच गेलंय.

या सिनेमाची पटकथा अत्यंत संथ आहे. म्हणजे पटकथेत दमदारपणा जराही नसल्याने सिनेमा सुरू झाल्यापासूनच कंटाळा यायला लागतो आणि त्यातल्या ढिलेपणामुळे सिनेमात नेमकं काय घडणार हे सिनेमाचं पहिलं पानही न उलटता समजून जातं. हीच सिनेमाची सगळय़ात डावी बाजू म्हणावी लागेल. शिवाय जवळ जवळ पाऊण सिनेमा होईपर्यंत मंद गतीने जाणारा सिनेमा शेवटच्या पंधरा मिनिटांत वेग घेतो. खरं म्हणजे स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने होणारी वाटचाल, प्रयत्न आणि स्पर्धेतली अटीतटीची चुरस यातच खरी मजा असते, पण नेमकं तेच कसंतरी गुंडाळून संपवून टाकलंय.

ज्या पतंग स्पर्धेभोवती हा सगळा सिनेमा आहे ती स्पर्धा तर आपल्याला पडद्यावर नीटशी दिसतही नाही आणि स्पर्धा पडद्यावर बघण्याचा आनंद जराही मिळत नाही. काही काही दृष्यं चांगली छायांकित केलीयत, पण मुख्य स्पर्धेच्या वेळी छायांकनाचं कसब महत्त्वाचं होतं. तिथेच नेमकं ते कमी पडलंय. शिवाय, त्या स्पर्धेसाठी तयारी करायचा जो प्रवाह दाखवलाय तोदेखील पुचाटच. एकूण सिनेमाला पकड अशी नाहीच. त्यामुळे सिनेमा सुरुवातीपासूनच कंटाळवाणा होतो आणि संपल्यावरही काही हाती लागत नाही.

एकूणच ‘फिरकी’ हा सिनेमा चटकन काटू शकणाऱ्या पतंगासारखाच झालाय. करण्यासारखं बरंच काही होतं. जर ते केलं असतं तर…वगैरे या जर-तरच्या गोष्टी नंतर बोलून काहीही साध्य होत नाही. एकूणच हा सिनेमा बघण्याने ना एका खेळाची फारशी ओळख होते, ना करमणूक होत ना आणखी काही. या सिनेमाची बांधलेली कणी तो बघितल्यावर तुटून पडते हेच खरं.

सिनेमा – फिरकी
निर्माता – मौलिक देसाई
दिग्दर्शक – सुनिकेत गांधी
लेखक – सुनिकेत गांधी, आदित्य अलंकार, विशाल काकडे
छायांकन – धवल गणबोटे
संगीत – भूषण चिटणीस, श्रीरंग धवळे, सुनीत जाधव
कलाकार – पार्थ भालेराव, पुष्कर लोणारकर, अथर्व उपासनी, अभिषेक भरते, अथर्व शालिग्राम, हृषीकेश जोशी, अश्विनी गिरी, ज्योती सुभाष.

आपली प्रतिक्रिया द्या