सोशल (मीडिया) आणि सामाजिक प्रश्नांची थरारक उकल

29

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

इंटरनेटचं जाळं आणि त्याद्वारे होणारी फसवणूक… गुन्हेगारी जगतातील सध्याची ही सगळय़ात मोठी समस्या आहे. इंटरनेटशी आणि सोशल मीडियाशी आपल्या प्रत्येकाचं आयुष्य एवढं निगडीत झालं आहे की तिथे ठग असणं साहजिकच आहे. इंटरनेटच्या वापरात कच्च्या असणाऱयांना शोधून काढून त्यांना लुबाडायचं हे सध्या जगभरात खूप मोठय़ा प्रमाणात चालू आहे. यात एखाद्याची बदनामी करण्यापासून ब्लॅकमेलिंगपर्यंत आणि प्रेमात फसवून सेक्स रॅकेट चालवण्यापासून ते पैसे लुबाडण्यापर्यंत आणि एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत असंख्य गंभीर गुन्हे घडतात. याच सायबर क्राईमच्या एका सत्यघटनेवर आधारित टेक केअर गुड नाईट हा सिनेमा. नव्या युगाचा विषय, उत्तम कलाकारांचा सहज अभिनय, नव्या कलाकारांचा ताजेपणा या सगळय़ामुळे हा सिनेमा नक्कीच आकर्षित करतो. इंटरनेटवरची तांत्रिक भाषा, तांत्रिक प्रश्न जरी असले तरी सर्वसामान्यांना कळेल अशा सहज भाषेत हा सिनेमा मांडला आहे त्यामुळे जरी तांत्रिक बाबी असल्यातरीही प्रेक्षकाला गुंतवून ठेवायला सिनेमा नक्कीच यशस्वी ठरतो. पण त्याच वेळी काही गोष्टी प्रमाणापेक्षा सोप्या आणि घडवून आणल्यासारख्या उभ्या राहिल्या असल्यामुळे या गुन्हेगारीची उकल होताना सरळधोपटपणापेक्षा थोडी गुंतागुंत आणखी असती तर मजा आली असती असं मात्र नक्की वाटतं.

उच्च मध्यमवर्गीय कुंटुंब. मुलगा पुढचं शिकायला अमेरिकेत गेलाय. आई-वडिलांना दादाच जास्त आवडतो म्हणून मुलगी आपल्या कोशात गुरफटलीय. मुळात थोडंफार इंटरनेट वगैरे गरजेपुरतं येत असलं तरी नवं शिकायला वडिलांची ना आहे आणि त्यासाठी ते निवृत्ती स्वीकारतात. निवृत्तीनंतर बायकोसोबत युरोप ट्रीप करून येतात, पण परत आल्यावर मात्र अचानक त्यांना धक्कादायक संकटांना सामोरं जावं लागतं. स्वेच्छानिवृत्तीनंतर मिळालेले पन्नास लाख रुपये बँकेतनं अचानक गायब झालेले असतात. तो प्रश्न सोडवत असताना अचानक त्यांच्या मुलीचा व्हिडीओ इंटरनेटवर प्रसारित होतो…. मुलीला फसवून तिचा बनवलेला तो व्हिडीओ चार भागात प्रसारित होणार असून त्यात तिच्या आणि पर्यायाने कुटुंबाच्या इज्जतीची धिंड निघणार या विचाराने अख्खं कुटुंब ढवळून निघतं. मुळात पैसे कसे गेले, इंटरनेटवरनं पैसे कसे दुसरीकडे जातात याबाबत काडीइतकंही ज्ञान नसणाऱया त्यांना काय करायचं हेच कळत नाही. सायबर क्राईम शाखेतले पोलीस मदतीला उभे ठाकतात आणि त्यांच्यासोबत चोर पोलिसाचा हा अनोखा खेळ सुरू होतो. मग पुढे काय होतं… तो अज्ञात चोर पकडला जातो का? नक्की गुन्हेगारी घडते कशी… अशा अनेक प्रश्नांची उत्कंठावर्धक उकल करत हा सिनेमा आपल्या समोर उलगडत जातो.

अगदी उत्कृष्ट अभिनय ही या सिनेमाची सगळय़ात भक्कम बाजू. महेश मांजरेकर अगदी पहिल्या दृष्यापासनंच सिक्सर मारायला लागतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातली सहजता. पोलिसी खाक्या आणि तरीही तो पोलीस सिनेमातला न वाटावा याची घेतलेली खबरदारी. हे सगळं त्यांनी मस्त उभं केलंय. सचिन खेडेकर यांनी उभा केलेला हतबल नंतर खंबीर होणारा बाप तितकाच झक्कास. त्यांना इरावती हर्षेची साथही चांगली लाभली आहे. मुळात हे सगळे कलाकार इतके कसलेले आहेत की त्यांच्यामुळे सिनेमाचा सहज भाव नकळत जमून येतो आणि सिनेमा प्रेक्षकाला थेट भिडतो. पर्ण पेठे, आदिनाथ कोठारे, विद्याधर जोशी इत्यादी कलाकारांची कामंही नेटकी झाली आहेत.

गिरीश जोशींनी हा सिनेमा लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. मुळात सिनेमाचा विषय तांत्रिकतेकडे झुकू शकतो आणि अतितांत्रिक सिनेमांचे विषय कितीही उत्तम असले तरीही ते प्रेक्षकाला समजले नाहीत तर सिनेमा फसू शकतो याची जाणीव लेखक दिग्दर्शकाने ठेवली आहे हे विशेष. या सिनेमाची पटकथा जराही किष्ट नाही. संवाददेखील अगदी सहज आहेत. वेळोवेळी काढलेल्या फोटोंमधले डोळे तो माणूस कसा आणि कधी बदलत गेला ते सांगतात अशा प्रकारच्या संवादांमधला मथितार्थ पटत जातो. इतकंच नाही, तर या सिनेमाचा नायक जेव्हा इंटरनेटच्या जाळय़ात अडकायला नकार देतो, नवे बदल स्वीकारायला तयार होत नाही ते देखील पटत जातं. अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूलाच असल्याचं प्रकर्षाने जाणवतं.

इंटरनेटचा वापर आणि त्यातनं जन्म घेणाऱया समस्या हा विषय हाताळताना यात जनरेशन गॅप हे एक उपकथानकही आहे आणि ते देखील मूळ कथेइतकंच भक्कम आहे. आपल्या मुलांना जखडून ठेवल्यावर, त्यांच्यावर सतत बंधनं घातल्यावर मुलांची काय मानसिकता होऊ शकते आणि मोकळं सोडल्यावर त्यांची मानसिकता काय होऊ शकते. आजच्या मुलांना पालकांकडून नेमकं काय हवं असतं, समाजात वावरताना मुलांना संयम राखण्यासाठी पालकांनी काय करायला हवं याची प्रातिनिधिक उत्तरं शोधायचाही या सिनेमात प्रयत्न झालाय. त्यामुळे हा सिनेमा नुसता थरारपट न रहाता एक सामाजिक सिनेमाही होतो. ही नक्कीच कौतुकाची बाब असली तरीही यामुळे या सिनेमातल्या थ्रीलरचा प्रभाव थोडा कमी झाल्यासारखं शेवटाकडे वाटायला लागतं. म्हणजे, जरी सत्य घटना असली तरीही शेवटी जे नाटय़ आहे ते थोडं अधिक रंगवता आलं असतं तर सिनेमा आणखी बहरदार झाला असता. तिचं त्या अनोळखी मुलाशी पुन्हा चॅटिंग करणं, पोलिसांनी अपलोड केलेला तो व्हिडीओ पहाताना होणारी द्विधा, मुलांची घरातल्या आणि घराबाहेरच्या वर्तणुकीतली प्रातिनिधिक तफावत या गोष्टी चांगल्या दाखवल्या आहेत. पण ज्या पद्धतीने शोध प्रक्रिया सुरू होते ती सुरुवातीला गुंतागुंत वाटत असली तरी प्रेक्षकालाही नंतर सगळं अगदी सहज सुरू आहे असं वाटायला लागतं तिथे सिनेमाला थोडा अडसर येतो. असो. पण तरीही चटपटीतपणा, वेगळा विषय, नेमकी मांडणी यामुळे हा सिनेमा निराश नक्कीच करणार नाही.

दर्जा – तीन स्टार
सिनेमा – टेक केअर, गुड नाईट (टीसीजीएन)
निर्माता – हिमांशू केसरी पाटील आणि महेश वामन मांजरेकर
लेखक/दिग्दर्शक – गिरीश जयंत जोशी
कलाकार – सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती कर्वे, आदिनाथ कोठारे, पर्ण पेठे

आपली प्रतिक्रिया द्या