अनोख्या नात्याची चविष्ट सफर – गुलाबजाम

154

>>रश्मी पाटकर, मुंबई

एका स्त्री आणि पुरुषातल्या निखळ मैत्रीच्या नात्यावर आजवर फार कमी चित्रपट आले आहेत. जे आलेत त्यातही प्रेमाचा भाग दाखवला गेला आहे. पण, फक्त प्रेमाव्यतिरिक्त एकाच समान धाग्यावर एक स्त्री आणि एक पुरुष यांची मैत्री दाखवण्याचं धाडस फार कमी दिग्दर्शकांनी दाखवलं आहे. अशाच एका अनोख्या नात्याची चविष्ट सफर घडवून आणणारा गुलाबजाम हा चित्रपट म्हणूनच वेगळा ठरतो.

दिग्दर्शक सचिन कुंडलकर हे दिग्दर्शक म्हणून जितके प्रसिद्ध आहेत तितकेच ते खवय्येही आहेत. त्यांच्या या खवय्येगिरीलाच त्यांनी कथेचा तडका देत एक नवी कोरी डिश प्रेक्षकांसाठी सादर केली आहे. त्याच डिशचं नाव आहे गुलाबजाम. ही कथा आहे आदित्य आणि राधाची. आदित्य हा एक मध्यमवर्गीय तरुण. वयाच्या २२व्या वर्षी लंडनला जाऊन, तिथे नोकरी करून घरी पैसे पाठवणारा. पण, लहानपणापासून मनाच्या एका कोपऱ्यात स्वयंपाकाची आवड जपणारा. तर, राधा ही टिपिकल पुणेरी वाटावी अशी तुसडी, स्वकेंद्रित स्त्री. स्वयंपाकाची आवड मनात जपून ठेवणाऱ्या आदित्यला लंडनमध्ये एकही चांगलं मराठंमोळ्या जेवणाचं हॉटेल नाही हे जाणवतं आणि त्याच्या मनात तिथे स्वतःचं हॉटेल थाटण्याची कल्पना डोकावते. त्यासाठी तो त्याच्या साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशीच लंडनला निघतो आणि परस्पर थेट पुणे गाठतो. तिथे पारंपरिक मराठी जेवण बनवायला शिकवणाऱ्या अनेकांकडे चौकशी केल्यानंतर त्याला राधाचा पत्ता गवसतो. तो तिच्याकडे स्वयंपाक शिकायला म्हणून विनंती करतो आणि इथूनच या अनोख्या नात्याला सुरुवात होते.

राधा त्याला आधी घरातून हाकलून लावते. तो पुन्हापुन्हा प्रयत्न करतो आणि तिचं शिष्यत्व पत्करतो. ती त्याची आवड पाहून त्याला शिकवायला सुरुवात करते. हळूहळू रोजच्या सहवासातून राधा आणि आदित्य यांच्या स्वभावाचे पैलू एकमेकांना कळत जातात. एकमेकांशी जुळवून घेतानाच्या या प्रवासात दोघांनाही एकमेकांचा भूतकाळ गवसतो. अनोळखी व्यक्ती ते दोन भिन्न स्वभावाचे जिवलग मित्र असा हा प्रवास एका वळणावर पूर्णत्वाला जातो. तो प्रवास कसा असतो आणि चित्रपटाचा शेवट नेमका काय होतो, ते मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

सचिन कुंडलकर यांचे चित्रपट हे सरधोपट मांडणीपेक्षा थोडे वेगळे असतात. त्याला गुलाबजाम हा चित्रपटही अपवाद नाही. एक प्रौढ स्त्री आणि एक तरुण मुलगा जेव्हा एका नात्यात येतात तेव्हा ते जगरहाटीप्रमाणे असावं अशी सामाजिक अपेक्षा असते. पण, या चित्रपटात असं कुठेही होत नाही. नेहमीच्या मांडणीसारखं यात प्रेमही नाही आणि भावा बहिणीचं घासून गुळगुळीत झालेलं नातंही नाही. फक्त दोन व्यक्तिमत्वं. एक स्त्री आणि एक पुरुष. एकमेकांच्या निकोप सहवासात बांधले गेलेले. शरीरभावनेची किनार असली तरी त्याला नाव देण्याचा किंवा नात्याला प्लॅटोनिक पातळीवर पूर्णत्व देण्याचा अट्टाहास त्यात नाही. त्यामुळे हा चित्रपट वेगळा ठरतो. त्याबद्दल दिग्दर्शकाचं अभिनंदन करायलाच हवं. चित्रपटात तीन कलाकार आहेत. आदित्य झालेल्या सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या भूमिकेला साजेसा अभिनय केलाय. विशेषतः त्याची स्वयंपाकाची आवड आणि रुढार्थाने बायकी गणल्या गेलेल्या या आवडीबद्दलची तळमळ त्याने सुंदररित्या दाखवली आहे. सोनाली कुलकर्णी ही किती कसदार अभिनेत्री आहे याचा प्रत्यय राधा पाहताना वारंवार येतो. राधाचा भूतकाळ, त्यामुळे झालेली तिची अवस्था, आदित्यची साथ मिळाल्यानंतर कोशातून बाहेर येतानाचा बदल हे सगळं काही तिने सहज दाखवलं आहे.

या चित्रपटातला तिसरा आणि खरंतर मुख्य कलाकार म्हणजे स्वयंपाक. राधा आदित्यला जेव्हा स्वयंपाक शिकवते तेव्हा अनेक मराठमोळ्या पदार्थांना ज्या प्रकारे पेश करण्यात आलं आहे ते निव्वळ लाजवाब. एक एक फ्रेम पाहून मन तृप्त होतं आणि जीभ चाळवते. विशेष म्हणजे, हे सगळे पदार्थ संपूर्ण शाकाहारी पदार्थ आहेत. ते पडद्यावर दाखवताना मिलिंद जोग यांच्या कॅमेऱ्याने कमाल केली आहे. त्यातून हे पदार्थ दाखवण्यासाठी करण्यात आलेली मेहनत जाणवते. या पाककृतींसाठी सायली राजाध्यक्ष आणि श्वेता बापट यांना यासाठी फुल मार्क्स द्यावे लागतात. एकूणच हा चित्रपट नेहमीसारखा मारधाड, गुलाबी, लव्हीडव्ही कॅटेगरीतला नाही आणि तरीही तो पाहावा असा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या