सरधोपट मांडणीचा तरीही रंजक ‘हॉस्टेल डेज’

27

>>रश्मी पाटकर, मुंबई

हॉस्टेल आणि तिथल्या आठवणी हा ते आयुष्य जगलेल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. आपलं कुटुंब, नातेवाईक, जवळचे मित्र यांपलिकडे पाहायला शिकवणारं हॉस्टेल अनेकांना अनेक गोष्टी देऊन जातं. त्यामुळे हॉस्टेल म्हटलं की मनाचा एक कोपरा हळवा होतोच. अशाच एका हॉस्टेलची गोष्ट घेऊन आलेला चित्रपट म्हणजे हॉस्टेल डेज.

चित्रपटाची कथा बेतलीये ती साताऱ्यातल्या कोपरगावमध्ये असलेल्या पसायदान हॉस्टेल आणि बुचकुळे महाविद्यालय या संस्थांवर. पूर्वीचं नॅशनल महाविद्यालय बुचकुळे नामक देणगीदारामुळे आता बुचकुळे महाविद्यालयाच्या नावाने ओळखलं जातंय. देणगीदार आल्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही कॉलेजला आणि पर्यायाने हॉस्टेलला होतात. ही कथा १९९४ साली घडताना दाखवण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट असलं काहीही त्यात आलेलं नाही. अशा पार्श्वभूमीवर कथा उलगडत जाते. हॉस्टेलचा जीएस शिवराज मोहिते उर्फ शिवा, त्याची मैत्रीण ईशानी, बुच्चन, अण्णा, शेक्सपिअर अशी सगळी शिवाची गँग. हे सगळे त्यांचं हॉस्टेलचं आयुष्य जगत असताना त्यांच्या आयुष्यात बुचकुळे काही नवीन शहरी मित्रमैत्रिणी घेऊन येतात. ही सगळी शहरी मंडळी श्रीमंत घरातली असल्यामुळे त्यांच्यामुळे हॉस्टेलचं वातावरण ढवळून निघतं. या टीमचा म्होरक्या जय धर्माधिकारी हा इशानीचा लहानपणीचा मित्र असतो. त्यामुळे या संघर्षाला आणखी वाव मिळतो. पण शिवा आणि जयमधलं भांडण एकदम पोकळ ठरावं असा एक आघात हॉस्टेलमधल्या तमाम मुलांवर होतो. तो काय असतो, त्याला ते सगळे मिळून कसे सामोरे जातात ते कळण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.

मुळात मराठी किंवा हिंदी चित्रपटांमधून हॉस्टेल आधीच दाखवलं गेल्यामुळे कथेतलं नाविन्य तिथेच संपल्यासारखं होतं. त्यामुळे हॉस्टेल डेजमध्ये नवीन काय पाहायला मिळणार याची उत्सुकता कमी होते. फक्त ज्यांनी नव्वदच्या दशकातलं हॉस्टेल जीवन पाहिलेलं नाही त्यांच्यासाठी हे मोबाईल-इंटरनेटशिवायचं आयुष्य बघायला मिळेल. या चित्रपटाची मांडणी पुष्कळच सरधोपट आहे. अनेक नवीन कलाकारांचा फौजफाटाच जमा केलेला असल्यामुळे पहिली काही मिनिटं ते समजून घेण्यात जातात. संवाद चांगले असले तरीही काही अपवाद वगळता ते पुस्तकी वाटतात. त्यामुळे चित्रपटाचा आत्माच हरवल्यासारखा वाटत राहतो. कथेत अनेकदा नको तेव्हा गाणी आल्यामुळे जे काम कथानक अधिक रंजकपणे करू शकत होतं तिथे गाण्यांनी प्रसंगाची मजा हरवून गेली आहे. यातील काही व्यक्तिरेखा खूप छान रंगवण्यात आल्या आहेत. तर काही व्यक्तिरेखांकडे दिग्दर्शक आणि लेखकाचं साफ दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे त्या व्यक्तिरेखा कलाकारांना उलगडता आलेल्या नाहीत.

अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवराज झालेल्या आरोह वेलणकरने चांगला अभिनय केला आहे. शारीरिक अभिनयावर भर दिल्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व चित्रपटात देखणं दिसलं आहे. विराजस कुलकर्णी याचं जय हे पात्र सारखं चाचपडल्यासारखं वाटतं. त्यामुळे त्याचा अभिनय चांगला असला तरी ती व्यक्तिरेखा गोंधळल्यासारखी वाटत राहते. इशानी झालेल्या प्रार्थनाने नेहमीप्रमाणेच चांगला अभिनय केला आहे. पण, विराजस आणि आरोहच्या तुलनेत काही प्रसंगांमध्ये ती थोराड वाटते. सगळ्यात धमाल केलीये ती बुच्चन झालेल्या अक्षय टांकसाळे याने. चित्रपटात सगळा फौजफाटा असला तरीही तो त्याने साकारलेल्या पात्रात भाव खाऊन जातो. विशेष म्हणजे यात निर्माता दिग्दर्शक संजय जाधव यांनी कुमार कुलकर्णी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. संजय यांना ही व्यक्तिरेखा देण्यामागचं काय कारण असावं, ते काही चित्रपट संपेपर्यंत कळत नाही. पण, जाधव यांच्या प्रयत्नांना दाद द्यायलाच हवी. अजय नाईक यांचं दिग्दर्शनही ठिकठाक.

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक दिग्गजांनी गायलेली गाणी. यातील काही गाणी श्रवणीय आहेत. पण, विशेष उल्लेख करावा लागेल शंकर महादेवन यांनी गायलेल्या मैत्री या गाण्याचा. मराठीत मैत्रीवर फार कमी गाणी बनली आहेत आणि त्यात या गाण्याचा समावेश होतो. थोडक्यात फ्रेश लूक असलेल्या या चित्रपटाची मांडणी खूप टिपिकल आहे तरीही हॉस्टेलची मजा अनुभवायला जाऊ शकता.

आपली प्रतिक्रिया द्या