राक्षस : हरवलेला अ‘सूर’

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

दोन परस्परभिन्न गोष्टी एकत्र येणं अशक्य नाही. उलट या विरोधाभासाच्या एकत्र येण्याने वेगळी रंगत देखील येऊ शकते. फक्त गरज असते ती या दोन वेगळ्या गोष्टींना जोडणाऱ्या सामाईक धाग्याची. हा चरचरीत वास्तववाद आणि कल्पनारम्यता अर्थात फँटॅसी या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत. त्यामुळे त्या एका धाग्यात बांधायच्या असतील तर त्यांना बांधणारा धागा तितकाच घट्ट हवा. तरच तो समन्वय चांगला जमून येतो. अन्यथा चुकीच्या समन्वयाची रुखरुख कायम सलत रहाते.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राक्षस’ या बहुचर्चित सिनेमाच्या बाबतीत असंच काहीसं झालंय. या सिनेमामध्ये प्रखर वास्तव आणि फँटॅसी या दोन्ही गोष्टी हातात हात धरून समोर येतात. खरं तर त्या एका साच्यात सहज समावू शकतात देखील. पण या दोघांना बांधणाऱया पटकथेचा धागा तितकासा घट्ट नसल्याने त्यांची बांधणी तितकीशी भावत नाही आणि विषय चांगला असूनही व तो दृश्य पातळीवर चांगल्या पद्धतीने मांडूनदेखील चुकल्या चुकल्यासारखं वाटत रहातं. या सिनेमाचं छायांकन अप्रतिम आहे. कलाकारांचा अभिनयदेखील खूप सहज आहे. तांत्रिकदृष्ट्या एखाद्या चांगल्या हिंदी सिनेमाच्या तोडीचा हा सिनेमा बनला आहे. पण सगळं असूनही बांधणी नीट न साधता आल्यामुळे सिनेमाची पकड सुटलीय असं दुर्दैवाने म्हणावं लागेल.

या सिनेमाचं नाव राक्षस आणि त्याची पोस्टर्स किंवा ट्रेलर यातनं दिसणारी दृश्यं पहाता काहीतरी अगम्य राक्षसी पहायला मिळतंय की काय अशी अपेक्षा निर्माण होणं साहजिक होतं. पण मुळात हा सिनेमा सद्यपरिस्थितीवर किंवा समाजातल्या काही घटनांवर आणि त्या गोष्टींचा मानवी आयुष्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांवर भाष्य करतो. सुधारणेच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांचा असूर मूळच्या रहिवाशांच्या जीवनाला उद्ध्वस्त करायला, त्यांच्या जमिनी हडपायला उभा टाकतो आणि त्या असूराविरोधातला लढा असा हा या सिनेमाचा गाभा आहे. त्यामुळे राक्षस हा तसं बघायला गेलं तर सूचक शब्द आहे. त्यातला वास्तवातला सूचक अर्थ शोधताना दिग्दर्शकाने त्याला अगम्य गूढतेची वीण दिलीय आणि त्यामुळे हा सिनेमा एका वेगळ्या पातळीवर जातो.

जंगलातल्या आदिवासींवर आणि तिथल्या रहाणीमानावर माहितीपट बनवणारा माहितीपटकार अविनाश त्याच्या कामासाठी जंगलात गेला असताना अचानक नाहीसा होतो. त्याला शोधण्यासाठी त्याची बायको आपल्या मुलीला घेऊन जंगलात यायचं धाडस करते. आधीही वडिलांसोबत या जंगलात आलेल्या त्या लहानग्या धाडसी मुलीला एका मोठय़ा झाडाच्या ढोलीत एक पुस्तक सापडलं असतं आणि त्यात एक राक्षसाची दंतकथा मांडली असते. त्या दंतकथेप्रमाणेच आपण आपल्या वडिलांना सोडवलं पाहिजे ही खूणगाठ ती मनाशी बांधते. जंगलात तिला एक म्हातारा माणूस भेटतो. तो तिला तीन कोडी सोडवायला सांगतो. कोडी सोडवल्यानंतर वडील भेटतील या विश्वासाने ती या साहसात उतरते आणि मग ती वडिलांपर्यंत पोचते का, या सगळ्यात नक्की काय दडलेलं असतं, ती कोडी कशा प्रकारे सुटतात याचं ऊहापोह म्हणजे हा सिनेमा.

खरं सांगायचं तर ज्या प्रकारे ट्रेलर दाखवण्यात आला होता तो पहाता या सिनेमात खूप काही गवसण्याची अपेक्षा वाढते. पण या सिनेमाची गुंता सोडवायची पद्धत किंवा त्याचा केलेला शेवट यांमध्ये जो भक्कमपणा अपेक्षित असतो तो कुठेच सापडत नाही. अगदी सिनेमा संपला तरी आणि मग पदरी थोडय़ाफार अपेक्षाभंगाची निराशा येते.

अभिनयाच्या पातळीवर मात्र सिनेमा अगदी खणखणीत आहे. सई ताम्हणकर या अभिनेत्रीला कुठच्याही साच्यात घातलं तरी ती चोखच काम करते याचं पुनर्प्रत्यंतर म्हणून राक्षस या सिनेमाकडे बघायला हवं. सहज, सुंदर आणि त्या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरून रेखलेली अदाकारी अप्र्रतिम. या सिनेमाची दुसरी प्रमुख अभिनेत्री म्हणजे ती छोटी मुलगी. लहान असली तरीही तिची भूमिका प्रधान आहे आणि एवढी मोठी जबाबदारी पेलण्याची समज तिने आपल्या सहज अभिनयातून दाखवली आहे. त्याचं कौतुक करावंच लागेल. बाकी उमेश जगताप, विजय मौर्य सारख्या कलावंतांचा सहज वावर परिचयाचा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी निभावलादेखील आहे. शरद केळकर या अभिनेत्याने ठीक काम केलंय. इतर कलाकारांपुढे तो किंचित कमी पडत असला तरी त्याचं हिंदीचं वलय त्याला या सिनेमात तारून नेतं. शिवाय त्याचा व्यवसाय आणि एकूण व्यक्तिरेखेला तो तसा चपखल बसलाय. एकूणच व्यक्तिरेखा आणि अभिनय या बाबतीत सिनेमाला मार्क द्यायला हवेत. तसंच छायांकन हादेखील या सिनेमाचा एक महत्त्वाचा भाग होता. कारण या सिनेमाच्या कथेनुसार जंगल ही देखील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होती आणि छायांकनातून ती नेटकेपणाने साकारली आहे. तांत्रिक बाबीतही हा सिनेमा सकस आहे. पण मुळात पटकथेतच ती ढिली पडल्याने या बाकीच्या सगळय़ा गोष्टी कितीही उत्तम साधल्या गेल्या असल्या तरी त्यातली खिळखिळी बाजू प्रकर्षाने समोर उभी ठाकते.

फँटॅसी आणि वास्तववाद या दोन्ही गोष्टी एका साच्यात बसवण्याच्या नादात कदाचित हे पारडं कमी जास्त झालं असावं आणि मग तो समतोल साधता न आल्याने उडालेला गोंधळ म्हणजे हा सिनेमा झाला आहे. कदाचित या दोन्ही गोष्टी एकत्र बांधणं कठीण होईल हे लक्षात घेऊन सिनेमा कोणत्या बाजूने झुकेल हे निश्चित केलं असतं तर सिनेमाला एक योग्य पकड आली असती. पण दुर्दैवाने ती पकड सुटली आहे. आणि विषय तो मांडण्याची गरज आणि इतर सर्व बाबींमध्ये चांगल्या असणाऱ्या या राक्षसाने चोखंदळ प्रेक्षकाची थोडी निराशाच केली आहे असं म्हणावं लागेल.

– दर्जा : अडीच स्टार
– चित्रपट : राक्षस
– निर्माता : नीलेश नवलखा, विवेक कजारिया
– दिग्दर्शन : ज्ञानेश्वर झोटिंग
– लेखन : ज्ञानेश्वर झोटिंग, तन्मयी देव
– छायांकन : मयूर हरदास
– संगीत : अँड्र्यू मॅके
– कलाकार : शरद केळकर, सई ताम्हणकर,विजय मौर्य, उमेश जगताप, ऋतुजा देशपांडे