हवाहवासा हळवा अनुभव

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात एक हळवा कोपरा असतो. आपण त्या गोष्टीचं कायम स्वप्न बघितलेलं असतं आणि दैव किंवा कर्म योगे ते स्वप्न जेव्हा पूर्ण होतं तेव्हा आस्मान ठेंगणं होतं. कालांतराने सहवास आणि त्याच्यावरच्या पेमाने त्या भौतिक वस्तूचं आणि आपलं रक्तापेक्षा जवळचं नातं तयार होतं… आणि ती गोष्ट नजरेपासनं दूर गेली किंवा आपल्यात दुरावा निर्माण होणार हे जाणवलं तरी आपलं अगदी जवळचं जिव्हाळय़ाचं माणूस आपल्यापासून दुरावतंय इतकं दुखं होतं. मग ती दुरावणारी ती वस्तू पुन्हा मिळवायला आपण जिवाचा आटापिटा करतो… मानवी मनाची ही गंमत आहे. सख्खं नातं कधी, कुठे, कोणाशी आणि किती घट्ट जुळेल सांगताच येत नाही. कास्ट अवे या सिनेमात जसं बेटावर एकटं राहाणाऱया त्या माणसाला बॉलची सोबत होते. त्या बॉलशी तो मित्र म्हणून संवाद साधत असतो. आपलं सगळं सांगत असतो आणि समुद्रात जेव्हा तो बॉल वाहून जातो तेव्हा जसा तो तुटून जातो तसंच काहीसं…

तर नुकताच प्रदर्शित झालेला ‘रेडू’ हा असाच नात्याची हळुवार गोष्ट उलगडणारा सिनेमा. कोकणातल्या एका खेडेगावात मजुरी करत कसंबसं पोट भरणाऱया एका माणसाला अचानक रेडियो भेट म्हणून मिळतो. त्या वस्तूबद्दल असणारं कमालीचं आकर्षण आणि अचानक ती वस्तू स्वतŠच्या मालकीचा झाल्यावर होणारा आनंद अवर्णनियं असतो. त्याच्या रेडियोची (रेडू)चर्चा गावभरात होते. कौतुक, असुया, राग, कुतूहल अशा संमिश्र भावना उमटतात. पण शेवटी त्याच्याकडे रेडियो असल्याने गरीब असूनही त्याचं स्थान कमालीचं उंचावतं. रेडियोला तो आणि त्याच्या घरचे जिवापलीकडे जपत असतात आणि अशातच तो रेडियो गायब होतो. मग सुरू होते शोधमोहीम. कुठे असतो तो रेडियो. तो मिळतो का आणि कसा मिळतो. त्यासाठी काय काय कसरती कराव्या लागतात. या सगळय़ाची गंमत जंमत म्हणजे ‘रेडू’ हा सिनेमा.

खरं म्हणजे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सायकल’ या मराठी सिनेमाचं या ‘रेडू’शी खूपच साधर्म्य आहे. पूर्वीचा काळ, कोकणातलं वातावरण, आपल्या वस्तूवरचं पेम, आणि हलक्या फुलक्या बाजाला असणारा तात्त्विकतेची झालर… म्हणजे बाह्यदर्शी हे साधर्म्य अगदी लक्षात येण्याजोगं असलं तरीही ‘रेडू’ या सिनेमाची बांधणी आणि एकूणच प्रवाहात फरक आहे. साध्या शब्दात सांगायचं झालं तर या सिनेमाचा प्रवाह जास्त सहज आहे. त्यामुळे तो पहाताना आपण त्यात नकळत समावून जातो.

सायकलमध्ये प्रत्येक फ्रेम देखणेपणाने चित्रित केली होती. इतकी की अगदी प्रत्येक दृश्यागणिक एक सुंदर निसर्गचित्र पहातोय असं भासत होतं. या सिनेमातलं छायाचित्रण तितकं काटेकोर नसलं तरी चांगलं आहे. पण या सिनेमात कोकणातला, कोकणातल्या माणसांचा आणि त्या काळाचा खराखुरा भाव अनुभवायला मिळतो आणि त्यामुळे रेडूशी आपण नकळत समरस होतो. या सिनेमाचं यश अनेक गोष्टीत आहे. या सिनेमाची कथा आणि त्या कथेत टिपलेले बारकावे. मानवी मनाचे किंवा व्यक्तिरेखांचे पैलू अगदी बारकाईने टिपले आहेत. तात्या असो, त्याची बायको असो, मुंबईचे पाहुणे असो, गावातली माणसं असो किंवा अजून छोटय़ातली छोटी व्यक्तिरेखा. प्रत्येक गोष्ट अगदी बारकावे लक्षात घेऊन टिपले आहेत आणि त्या व्यक्तेरखा अगदी नैसर्गिक वाटाव्या इतक्या सहज उभ्या राहिल्या आहेत. या इतक्या खऱया होण्यामागे त्या व्यक्तिरेखा लिहिण्याइतकंच त्यावर चढलेला अभिनयाचा साज हेदेखील कारण आहे हे निर्विवाद.

शशांक शेंडेंनी उभा केलेला तातू अप्रतिम. त्याचं आणि त्याच्या बायकोचं नातं. एखाद्या जिद्दीपायी काहीही करण्यासाठी तयार असणं. त्याच्या स्वभावाचे पैलू. परिस्थितीमुळे झालेली अवस्था आणि छोटय़ा छोटय़ा आनंदातून विझलेल्या डोळय़ात अचानक तेवणारी चमक हे सगळं इतकं झक्कास उभं केलंय की त्याला तोडच नाही. त्याला तितकीच साथ लाभलीय ती छाया कदम या अभिनेत्रीची. खरं तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘न्यूड’मध्ये तितकीच कमाल भूमिका उभी करूनही या नव्या नव्या भूमिकेतनं ती नव्याने मनामध्ये ठसते. उत्कृष्ट अभिनेत्री असण्याचं हे उत्तम उदाहरणच म्हणावं लागेल. बाकी सगळय़ा कलाकारांची साथही छान लाभलीय. अगदी वाटेत काही मिनिटं भेटणाऱया गावकऱयापासनं ते गावच्या श्रीrमंत पाटलापर्यंत छोटय़ा छोटय़ा भूमिका साकारणाऱया कलाकारांनीही यातल्या बारीकसारीक जागा चांगल्या भरल्या आहेत.

बारकाव्यांचा विचार करून केलेलं दिग्दर्शन, योग्य ठिकाणी चालवलेली संकलनाची कात्री, तो काळ, कोकण या सगळय़ाचा विचार करून लिहिले गेलेले संवाद, विहिरीचं खोदकाम किंवा बहिणीचं दुखं अशा अगदी छोटय़ा पण समांतर जाणाऱया गोष्टी. त्यायोगे वेगवेगळय़ा माणसांचे उलगडणारे स्वभाव आणि त्यातून आपोआपच होणारी वातावरण निर्मिती. बाहेर गावाहून येताना सोबत घेऊन आणलेला खाज्याचा खाऊ किंवा मुंबईच्या पाहुण्यासाठी केलेला मटणाचा रस्सा अशा सगळय़ा गोष्टी खूप खऱया आणि अस्सल उभ्या केल्या आहेत. एकूणच हा सिनेमा पहाताना आपण काही काळ त्या काळात जातो. त्या कोकणाशी अगदी खरी खरी ओळख होते आणि कुठच्यातरी भौतिक गोष्टीशी आपली असलेली नाळही आपल्याला अलगद आठवते… एका छान हव्याहव्याशा अनुभवासाठी ‘रेडू’चा खास अनुभव प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन घ्यायला हवा.

दर्जा – साडे तीन स्टार
सिनेमा – रेडू
निर्मिता – नवल फिल्म्स नवलकिशोर सारडा ब्लिंक मोशन पिक्चर्स प्रा. लि.
दिग्दर्शक/ संकलक सागर छाया वंजारी
कथा, पटकथा, संवाद – संजय नवगिरे
छायांकन – मंगेश गाडेकर
संगीत आणि पार्श्वसंगीत – विजय गवांडे
कलाकार – शशांक शेंडे, छाया कदम, गौरी कोंगे, विनम्र भाबल, मृण्मयी सुपल.