‘व्हॉट्सअॅप लग्न’ – गोड मिठ्ठाची रंगत पंगत

145

>>वैष्णवी कानविंदे-पिंगे

सिनेमा हा एखाद्या भोजनाच्या पंगतीसारखा असतो. पदार्थांचे रंग, त्यांची सजावट, नव्या-जुन्या पदार्थांची रेलचेल, आजूबाजूची सजावट आणि एकूणच वातावरण… हे सगळं जमून आलं तर ती फक्कड पंगत आठवणीत राहते. अशा पंगतीत चवीत उणंदुणं असू शकतं, पण दिखावा मात्र फक्कड असतो. पण अशी पंगत कधीतरी अनुभवायला छान वाटतं. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘व्हॉट्सअॅप लग्न’ हा सिनेमा असाच जमून आलेल्या आणि छान अनुभव देणाऱ्या पंगतीसारखाच आहे.

यात ताजेपण आहे, देखणा दृश्यानुभव आहे आणि नवा नसला तरी चांगल्या पद्धतीने सजवलेला एक विषयही आहे. अर्थात कारण नसताना खेचलेली लांबी जरी कंटाळवाणी असली, गोडधोडाची जरा जास्तच भरणा असली आणि मध्यंतरानंतर काय घडणार याचा अंदाज आधीच येत असला तरी हा सिनेमा करमणूक करतो हे मात्र नक्की.

‘व्हॉट्सअॅप लग्न’ या शीर्षकावरून कदाचित थोडं गोंधळायला होतं. म्हणजे सोशल मीडियावरचं प्रेम वगैरे असं काही आहे का, असं वाटायला लागतं. पण मध्यंतराआधी सिनेमा ज्या पद्धतीने उलगडतो त्या पद्धतीने व्हॉट्सअॅप लग्न या वाक्यातून काय अभिप्रेत आहे ते चटकन कळतं. ही गोष्ट आजच्या काळातल्या दोन भिन्न स्वभावाच्या तरुण मुलांची आहे. तो अतिशय नीटनेटका, वक्तशीर, गंभीर तर ती उत्साही, वेंधळी. तो संगणकात गुंतलेला हुशार इंजिनीयर तर ती मनमोकळी अभिनेत्री. या दोघांची योगायोगाने भेट होते. मग सुरुवातीला नुसती ओळख, मग मैत्री, मग ओढ, मग प्रेम आणि मग लग्न असा पल्ला कापत ते दोघे विवाहाच्या बंधनात अडकतात देखील.

अर्थात स्वतःच्या आवडी आणि करीयर जपण्याचं निश्चित करून, पण जसं ठरवलं तसंच सगळं होतं का, सोशल मीडिया आणि तत्सम ऑनलाइन गोष्टींमुळे माणसं एकमेकांच्या जवळ आली. पण जवळचं नातं जपताना हे सगळं तंत्र किती साथ देऊ शकेल, पहिल्या भेटीत असलेली लग्नाआधीचं प्रेम आणि नंतरचं… किंवा आजकाल तरुणांमध्ये नेमकं होतं काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायचे या सिनेमाने प्रयत्न केले आहे.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, हा विषय तसा अनेकदा हाताळला गेलाय, पण या सिनेमात तो ज्या स्टाईलने आणि टवटवीतपणे सादर केलाय त्यामुळे त्याचं वेगळेपण जाणवून येतं. याची पटकथा चांगली बांधली गेलीय. त्यामुळे दृश्य कंटाळवाणी होत नाहीत, पण एकूणच सिनेमाला संकलनाच्या कात्रीची गरज होती. मध्यंतराच्या आधीही काही वेळानंतर सिनेमा जरा आवरता घेतला असता तर एकूणच मांडलेल्या साजाला आणखी बहर आली असती.

तिच बात मध्यंतरानंतरची एकूणच सुरुवातीच्या चटपटीतपणाला दुसऱ्या भागात झणझणीत वळण लागतं खरं, पण शेवटाकडे हे सगळं आवरता आवरत नाही आणि मग सिनेमा संपतो की नाही असा विचार अस्वस्थ करायला लागतो. असो, पण संवाद चुरचुरीत आहेत. संवादातल्या चटपटीतपणामुळे सिनेमाला उठाव आलाय. दिग्दर्शनही बरं आहे. म्हणजे भांडणाची दृश्यं किंवा प्रेमाची दृश्यं चटपटीत कशी होतील, त्यातला हळूवारपणा किंवा रांगडेपणा सहज टिपलाय. सिनेमाला थोडं बोल्ड करायचाही बोल्ड प्रयत्न केलाय, पण काही ठिकाणी बोल्ड संवाद उच्चारताना किंवा दृश्यं साकारताना थोडं अवघडलेपण जाणवतं.

वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे ही जोडी अनेकदा पडद्यावर पाहिली आहे. एक तरुण जोडी म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेच आणि आजवरच्या सहज भावानेच ते या सिनेमात वावरलेयत. त्यांच्यातलं रसायन चांगलं जमलंय हे जाणवतं. मुळात वैभव तत्ववादीचं रांगडेपण भावून जातं हेच खरं. या दोघांचा कपडेपट, स्टाईलही छान. या सिनेमातल्या इतर कलाकारांच्या वाट्याला अगदीच थोडं किंबहुना नेमकं काम आहे. पण वाट्याला आलेली कामं विक्रम गोखले, वंदना गुप्ते, अश्विनी रायकर, इला भाटे या सगळय़ांनी नेहमीच्याच शैलीत चोख केलीयत.

या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्टाइल. म्हणजे मराठीतल्या बऱ्यापैकी सुखवस्तू घरात असतो तसंच वातावरण या सिनेमात उभं करायचा प्रयत्न केलाय आणि आजच्या भरपूर पगार असणाऱ्या मुलांची घरं, त्यांचं राहणीमान, त्यांच्या सवयी जराही हातचं न राखता चित्रित केल्यायत. त्यामुळे सिनेमाला एक खरेपणा आलाय. म्हणजे यातल्या नायक-नायिकेचं घर, नायकाचं पुण्याचं घर किंवा नायिकेचं नाशिकचं घर हे एखाद्या स्वप्नात शोभावं असं.

तसंच नाशिकची सफर, पावसाळी वातावरण, त्यात फुलणारं प्रेम, लग्नानंतर सजवलं गेलेलं घर आणि हनिमूनचं निसर्गरम्य दृश्यं हे सगळं फारच देखणं आणि स्वप्नवत. पण खरं सांगायचं तर अशा सिनेमांमध्ये हे सगळं शोभून दिसतं. स्वप्न आणि वास्तव याचा बऱ्यापैकी मेळ घातलाय. शिवाय दोघांचं करीयरही खूप मनापासनं चित्रित केलंय. उगाच दोघे कामाला जातात असं नाही. तिची सिरियल, तिथलं आयुष्य, त्याचं आयटीतलं काम हे सगळं बऱ्यापैकी उभं केलंय.

अर्थात या सिनेमात गांभीर्य असलं तरीही जागोजागी पेरलेला गोडगोडपणा मात्र जरा अतीच झालाय. पहिल्या अर्ध्या भागात प्रार्थना बेहरेच्या प्रत्येक एण्ट्रीसोबत तो जरा जास्तच जाणवतो. तिने साकारलेली बबली व्यक्तिरेखा पाहताना ती उगाच जरा जास्तच गोड गोड करतेय असं पावलापावलावर भासत राहतं. छायांकन मात्र छान आहे. छायांकन आणि कला दिग्दर्शनामुळे सिनेमा आकर्षक झालाय हे प्रथमदर्शनीच कोणीही सांगेल. एकूणच व्हॉट्सअॅप लग्न हा सिनेमा त्याच्या न संपणाऱ्या लांबीमुळे कंटाळवाणा होत असला तरी करमणूकप्रधान आहे. फारशी अपेक्षा न करता दोन-तीन तासांचा टाइमपास म्हणून या वाट्याला गेलात तर हा सिनेमा नक्कीच आवडून जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या