वास्तववादाचा घाट

75

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

कुठच्याही सार्वजनिक ठिकाणी गेलं की तिथे पर्यटकांच्या सोबत दिसतात ते रस्त्याच्या कडेला किंवा जिथे जागा मिळेल तिथे पथारी पसरून बसलेले भिकारी. मग त्यातले काही जण काही चुकार उद्योग करतात. लहान मुलं तर समजायला लागल्यापासूनं बऱ्या कपडय़ांतल्या माणसांसमोर हात पसरून मागायला शिकतात… बघणारा ‘भिकारी जमात’ म्हणून त्यांच्याकडे नाक मुरडतो. पण त्यांच्याही आयुष्याला पदर असतात. त्यांची दुःखं, त्यांच्या सुखाचा शोध या सगळय़ाची काही ना काही परिमाणं असतात. अचानक मिळणारं खाणं किंवा कधीतरी मिळणारी दहाची नोट अशा छोटय़ा गोष्टींचं महत्त्व त्यांनाच ठाऊक. त्यांच्यातली नाती आणि ती जपण्याचं किंवा तोडण्याचं तंत्र असं अख्खं आयुष्यच तिथे उभं असतं… त्याच आयुष्यातल्या प्रातिनिधिक कुटुंबाची कथा म्हणजे ‘घाट…’

ही कथा आळंदीच्या घाटावर घडते. घाट म्हणजे धार्मिक विधींचं हक्काचं ठिकाण. त्यात आपल्या लाडक्या गेलेल्या माणसाचे विधी करण्यास आलेली मंडळी मानसिकरीत्या हळवी झालेली असतात. त्यामुळे त्यांच्या जीवावर पोटाची खळगी भरण्यासाठी मोठीचं संधी असते. भावनेच्या भरात लोकांकडून पैसे, धान्य किंवा तत्सम गोष्टी मिळू शकण्याची शक्यता. दानधर्माचा होत असलेला फायदा, नदीच्या पात्रात सापडणारे सुटे पैसे किंवा काहीही करून हातपाय मारण्याची असलेली तयारी हे सगळं या सिनेमात बारकाव्यानिशी चित्रित केलंय. या सिनेमाचा विषय तसा चांगला आहे, पण नुकत्याच प्रदर्शित होऊन गेलेल्या ‘दशक्रिया’ या सिनेमातून नुकतंच हे सगळं दाखवलं गेलं. दशक्रिया पाहिलेल्यांसाठी ते मनात ताजं असताना पुन्हा घाटमधून वेगळय़ा गोष्टीच्या माध्यमातून तेच सगळं पुन्हा आणि इतक्या लगेच अनुभवणं हे मात्र थोडं जड जातं.

तिथल्या माणसांची दुःखं, प्रत्येक सुट्टा पैसा कमावण्यासाठी खर्ची पडणारं बालपण इत्यादी गोष्टी ‘दशक्रिया’प्रमाणे पुन्हा एकदा पडद्यावर दिसतात. त्यामुळे या सिनेमाचं नावीन्यं तितकंसं उरत नाही. या सिनेमाची कथा घाटाच्या कडेला राहणाऱ्या आणि अक्षरश: ओढाताण करत आयुष्य जगणाऱ्या एका प्रातिनिधिक मुलाच्या आयुष्यावर आहे. आजारी आई, लहान बहीण, दारूडा जुगारी बाप आणि याच्या जीवावर सुरू असणारा त्यांच्या कुटुंबाचा व्याप अशी ही कथा. आपलं कुटुंब रेटताना त्या मुलाचं बालपण कधीच सरलेलं असतं. नदीच्या पात्रात सापडणाऱ्या दोनपाच रुपयांपासून ते भाविकांना गंध लावण्यापर्यंत आणि मधल्या वेळात आपल्या अंगातल्या फाटक्या टीशर्टने प्रवाशांच्या गाडय़ा पुसण्यापासून ते पिंडाला कावळा शिवण्यासाठी कावळय़ाला पिंडापर्यंत आणायचं कसब कमवून त्याद्वारे पैसे मिळवायचं तंत्र त्यानं अवगत केले असतं. थोडक्यात कमवण्यासाठी सरळमार्गे जे शक्य होईल ते सगळं करायची त्याची तयारी असते. त्यात त्याची जात, त्याची शिक्षणाची ओढ अशा गोष्टीही असतात आणि त्यांना ओलांडून दिवसाची हातमिळवणी करावी लागत असते. मग या मुलाची छोटी छोटी स्वप्नं पूर्ण होतील का… त्याचं आयुष्यं त्याला कुठे नेईल या सगळय़ाची उत्तरं हा सिनेमा पाहताना मिळतात.

ही कथा उभी चांगली केलीय. पण होतं असं की, वास्तवाचं विदारक चित्र आणि आयुष्यातल्या दुःखाचा परमोच्च बिंदू दाखवताना बऱयाच ठिकाणी ती अतिनाटय़मय होते. एकमेकांशी पात्रं बोलतात किंवा जी दृष्यं घडतात त्यात दिग्दर्शकाने इतकी जास्त नाटय़मयता घातली आहे की, त्यामुळे कंटाळा यायला लागतो. शिवाय पैसे गोळा करणं, गंध लावत फिरणं, कावळय़ाला बोलवणं ही दृष्यं एकदोनदा प्रभावी वाटतात, पण पुनः पुन्हा तीच दृष्यं दिसायला लागल्यावर खूपच तोचतोचपणा जाणवायला लागतो. अभिनयाच्या बाबतीत सांगायचे तर कामं खूप चांगली झाली आहेत. प्रमुख भूमिकेतला यश कुलकर्णी, उमेश जगताप, मिताली जगताप आदी कलाकारांमध्ये चांगली अभिनय क्षमता आहे हे सहज लक्षात येतं. पण दृष्यांमधल्या अतिनाटय़मयतेची छाप त्यांच्या अभिनयावरही पडली आहे आणि त्यामुळे पात्रांमधली सहजता थोडी कमी होते.

छायांकन मात्र छान झालंय. गर्दीच्या ठिकाणी घाटांवरचं छायांकन, सूर्योदय, सूर्यास्त, देखणेपण आणि विदारकता याचं मिश्रण कॅमेऱयातनं छान टिपलं गेलंय. सिनेमाची लांबी कमी आहे हे एकाअर्थी चांगलंच आहे. पण त्यातही दृष्यांमध्ये आणखी वेगळेपण असतं तर सिनेमा रंगतदार झाला असता. पण त्याच त्याचपणामुळे सिनेमा रटाळपणाकडे झुकायला लागतो. तसंच संकलन करतानाही थोडा संयुक्तिक विचार हवा होता. सिनेमाच्या दृष्यांमध्ये सलगता नसल्याने तो काही ठिकाणी मध्येच तुटल्यासारखा वाटतो. एकूणच विचार करताना जर एका जमातीचं वरकरणी आढळणारं आयुष्य सखोलतेने पाहायचं असेल ‘घाट’ या सिनेमात तो अनुभव काही अंशी नक्कीच मिळतो. पण त्याची मांडणी तितकीशी प्रभावी उभी राहू न शकल्यामुळे वास्तववादाचा ‘घाट’ तितकासा भावत नाही.

दर्जा : दोन स्टार
चित्रपट : घाट
निर्माता/दिग्दर्शक : सचिन जारे
लेखक : राज गोर्डे
छायांकन : अमोल गोळे
संगीत : रोहित नागभिडे
कलाकार : यश कुलकर्णी, दत्तात्रय धर्मे, मिताली जगताप, उमेश जगताप, रिया गवळी.

आपली प्रतिक्रिया द्या