रसिकहो – मतकरींच्या गूढ लेखणीचा थरार!

2739

>> क्षितिज झारापकर

 ‘ब्लाईंड गेम’ रत्नाकर मतकरींच्या सिद्धहस्त गूढ लेखणीचे रहस्य रंगभूमीही अनुभवणार आहे.

 गूढनाट्य या प्रकाराला सस्पेन्स नाट्य म्हणता येईल का? हा प्रश्न मला अलीकडे पडला. याला कारण म्हणजे रत्नाकर मतकरी. मराठी वाङ्मयात गूढकथा ही अत्यंत गुड कथा असू शकते हे मतकरींनी सिद्ध केलं. ‘गहिरे पाणी’ या त्यांच्या कथासंग्रहावरच्या मालिकेत त्यांचं या प्रकारावरचं प्रभुत्वही दिसलं. गूढ या शब्दातच काहीतरी अतर्क्य असा भास आहे. रत्नाकर मतकरींचं एक नाटक पुण्याच्या एका संस्थेने आता रंगभूमीवर आणलेलं आहे. ‘ब्लाईंड गेम’ हे ते नाटक. ‘ब्लाईंड गेम’ हे गूढनाट्य नसून ते एक रहस्यनाट्य आहे. पुण्याच्या ‘रसिक मोहिनी’ नाट्यसंस्थेने ते सादर केलेलं आहे. पुण्यात एक वेगळी सकस व्यावसायिक मराठी रंगभूमी आहे. तिथून मराठी रंगभूमीला अनेक गुणवंत कलाकार लाभले. स्वरूप कुमार, सतीश तारे, आनंद अभ्यंकर आणि दीर्घकाळ अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष राहिलेले मोहन जोशी ही काही उदाहरणं आहेत. सर्वसाधारणपणे पुण्यातली मराठी नाटकं. ही महाराष्ट्रात इतरत्र जातात, पण मुंबईत फारशी येत नाहीत. रसिक मोहिनी मात्र आपलं प्रत्येक नाटक आजवर सातत्याने मुंबईत सादर करीत आलेली आहे. म्हणूनच ‘ब्लाईंड गेम’बद्दल उत्सुकता होती.

एका घरात एक फोटोग्राफर आणि त्याची बायको राहतात. त्याच बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर एक शाळकरी मुलगीही रहात असते. एक विलक्षण घटना घडते आणि मग ती मुलगी आणि फोटोग्राफरची बायको आलेल्या रहस्यमय संकटाला कशी मात देतात हे ‘ब्लाईंड गेम’ या  नाटकाचं त्रोटक कथानक आहे. यात महत्त्वाचं म्हणजे फोटोग्राफरची बायको आंधळी आहे आणि तिच्या समोर तीन शातीर म्हणतात त्या टाईपचे गुन्हेगार उभे ठाकलेत. लिखाणात ‘ब्लाईंड गेम’ हे एक खूप स्मूथली रचलेलं नाटक आहे. अर्थात ते मतकरींचं आहे यात हे आलंच. रत्नाकर मतकरी हे माझ्या मते सुरेश खरे यांच्या बरोबरीने मराठी नाटककारांमधले द लास्ट ऑफ द मोहिकन्स आहेत जे एक सकस संपूर्ण नाटक क्राफ्ट करू शकतात. त्यामुळे ‘ब्लाईंड गेम’च्या लिखाणाबद्दल अधिक ऊहापोह आपण टाळूयात. फक्त एक नमूद करायला हवं की, हे नाटक ऐंशीच्या दशकात लिहिलं गेलंय आणि दिग्दर्शक अनिल खोपकरांनी ते त्याच कालखंडात ठेवून आज उभं केलं आहे.

अनिल खोपकर यांचं दिग्दर्शन खूपच काटेकोर आणि डिटेल्ड आहे. संपूर्ण रंगमंचाचा आणि नेपथ्याचा त्यांनी दिग्दर्शनातून केलेला वापर कौतुकास्पद आहे. एका प्रसंगात दृष्टीहीन अनुराधाच्या घरात तिला माहीत असलेला श्रीकांत आणि माहीत नसलेला टोनी हे दोघे असतात आणि जाताना ते दोघे एकसारखी पावलं टाकत जातात हे नाटकाच्या एकूण बाजाशी अत्यंत सुसंगत वाटतं. कदाचित हे लिखाणात नमूद असेल, पण प्रत्यक्ष प्रयोग उभा करताना त्याचं भान राखणं आणि चढताना जिन्याच्या पायर्‍याही त्याचं सांभाळणं हे कौतुकास्पद आहे. शाम भूतकरांचं नेपथ्यही नाटकाला कॉम्प्लिमेंट करणारं आहे. रहस्य नाट्यात हे खूप महत्त्वाचं असतं. ‘ब्लाईंड गेम’च्या नेपथ्यातून रहस्यमयता वाढवणं साध्य होतं. तेजस चव्हाणचं संगीतदेखील हाच परिणाम साधून जातं. नाटकाचं संगीत हे ठासून दिसताच कामा नये. पार्श्वसंगीत हे दर्शनीय नाटकाच्या पाठीमागेच उभं रहायला हवं. ‘ब्लाईंड गेम’मध्ये हे घडतं. राहुल जोगळेकरची प्रकाशयोजना मात्र अधिक उल्लेखनीय आहे. रंगमंचावर घडणारं नाटक प्रेक्षकांना व्यवस्थितपणे दिसलं पाहीजे आणि तरीही त्यातील प्रमुख पात्राची दृष्टीहीनता सतत जाणवत राहीली पाहीजे हे ‘ब्लाईंड गेम’च्या प्रकाशयोजनेतून साकारल्याचा अनुभव येतो.

नाटक ही लोकाभिमुख कला आहे. तेव्हा कोणतंही नाटक प्रेक्षक हे कलाकारांच्या कामगिरीवरूनच जोखतात. ‘ब्लाईंड गेम’मधील सर्व कलाकार खूप मनापासून काम करतात. सईद ही तशी आक्रमक भूमिका शिवराज वाळवेकर आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा पुरेपूर वापर करत सहजतेने वठवतात. नट जेव्हा आपली शरीरयष्टी, आवाज, लहेजा आणि अभिनयक्षमता या सगळ्याचा प्रयत्नपूर्वक वापर करून भूमिका करतो तेव्हा ती लेखक आणि दिग्दर्शकाला अभिप्रेsत असणारी वठते तसं काहीसं सईदच्या बाबतीत घडतं. श्रीकांत झालेले डॉ. संजीवकुमार पाटील हे ‘ब्लाईंड गेम’मधलं याचं दुसरं उदाहरण. अनुराधाला विश्वासात घेऊन खेळवणारा श्रीकांत खरा कोण आहे हे प्रेक्षकांना माहीत आहे याचं विलक्षण भान ठेवून डॉ. संजीवकुमार पाटील यांनी श्रीकांत कमालीच्या साधेपणाने उभा केलाय. टोनीच्या भूमिकेत दीपक रेगे वेगळे बाज घेऊन मजा करतात. टोनी म्हणून सडकछाप गुन्हेगार जेव्हा इन्स्पेक्टर म्हणून येतो तेव्हा दीपक रेगे यांनी दाखवलेला बदल लक्षणीय आहे. आशुतोष नेर्लेकर आपल्या अनिकेत या छोट्या भूमिकेत डेव्हलपिंग करता लागणारं जहाल द्रव कुठं आहे ते अनुराधाला सांगून ठेवण्याचं महत्त्वाचं काम चोख करतात. पिंकीच्या भूमिकेत नेहा नाईक गरजेप्रमाणे वात्रट, हट्टी, समंजस आणि हुशार होते. नेहाने आणि आशुतोषने आपापल्या वाट्याचे काम अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे. भाग्यश्री देसाई या अनुराधाची मध्यवर्ती भूमिका साकारतात. अनुराधा हे पात्र कठीण आहे. सरधोपटपणे दृष्टीहीन भूमिका असतात तसं हे पात्र नाही. अनुराधा जन्मापासून आंधळी नाही. त्यामुळे नुकतीच नेत्रहीनता आलेल्या व्यक्तीची व्यथा या भूमिकेच्या ठायी आहे. भाग्यश्री देसाई हा अधिकचा अवघडलेपणा हेरण्याचा स्तुत्य प्रयत्न करतात. त्यांची आपल्या परिस्थितीशी अजूनही जुळवून घेण्याची धडपड दिसते. भाग्यश्री देसाईंची अनुराधा खरी वाटते. अनिल खोपकरांनी दिग्दर्शनातून नाटकाचा काळ आणि त्या अनुषंगाने येणारी नाटकाची गती अचूक ठेवली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. रसिक मोहीनीचं ‘ब्लाईंड गेम’ हे एक चांगलं मनोरंजक नाटक आहे यात शंका नाही.

नाटक : ब्लाईंड गेम

निर्मिती  :       रसिक मोहिनी

निर्माती  :       भाग्यश्री देसाई

लेखक   : रत्नाकर मतकरी

नेपथ्य  : श्याम भूतकर

प्रकाश  : राहुल जोगळेकर

संगीत  : तेजस चव्हाण

रंगभूषा : नरेंद्र वीर

सूत्रधार : प्रवीण बर्वे, शेखर दाते

दिग्दर्शक :  अनिल खोपकर

कलाकार :  भाग्यश्री देसाई, नेहा नाईक, आशुतोष नेर्लेकर, डॉ. संजीवकुमार पाटील, दीपक रेगे, शिवराज वाळवेकर

दर्जा    : ** 1/2

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या