हाऊसफुल्ल नाटक : पुन्हा सही रे सही

>> क्षितिज झारापकर  

पुन्हा सही रे सही सुपरस्टार भरत जाधवचे सदाबहार नाटक. या नाटकाची जादू आणि हसू आजतागायत कमी झालेले नाही.

काही नाटकं ही येतानाच विलक्षण भाग्य घेऊन येतात. गेल्या सव्वीस वर्षांत मराठी रंगभूमीवर दोन अशी नाटकं आली की, ज्यांनी सर्व विक्रम मोडले. या दोन्ही नाटकांत प्रमुख भूमिकेत एक कलाकार होता. म्हणजेच गेली सव्वीस वर्षे या कलाकाराने मराठी नाट्यक्षेत्र व्यापून टाकलं. ज्या दोन विक्रमी नाटकांचा हा नायक झाला त्यातलं पहिलं म्हणजे ‘ऑल दी बेस्ट’ आणि दुसरं नाटक म्हणजे आजही हाऊसफुल्लच्या बोर्डखाली सुरू असलेलं ‘पुन्हा सही रे सही’. महाराष्ट्राचा हा लाडका सुपरस्टार आहे नटशिरोमणी भरत जाधव.

2002 साली केदार शिंदे लिखित, दिग्दर्शित, भरत जाधव अभिनित ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक रंगभूमीवर अवतरलं. आज सतरा वर्षांनीदेखील या नाटकाचे अविरत प्रयोग सुरू आहेत. अविरत कारण त्यातील प्रमुख भूमिका करणारे दोन नट भरत जाधव आणि जयराज नायर हे गेल्या सोळा वर्षांत बदललेले नाहीत. निर्मिती संस्थांपासून नेपथ्यापर्यंत सतरा वर्षांत काही गोष्टी निसर्गनियमाने बदलत गेल्या, पण त्यामुळे ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक अधिक रंगतदार होत गेलं. आज हे नाटक भरत जाधव एन्टरटेन्मेन्ट ही नाट्य संस्था सादर करते. मराठीत स्वतःची निर्मिती संस्था असणारा एकमेव कलाकार म्हणजे भरत जाधव आणि ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक त्याच्याच भरत जाधव एन्टरटेन्मेन्टतर्फे सादर होतं.

एका मयत मदन सुखात्मे या माणसाची गडगंज इस्टेट बळकावण्यासाठी त्यासारखे दिसणारे तोतया सुखात्मे उभे करण्याचा डाव सगळे स्नेही कसा रचतात याची कहाणी म्हणजे ‘पुन्हा सही रे सही’. केदार शिंदे यांनी सोळा वर्षांपूर्वी एक जबरदस्त वेग असलेली कॉमेडी रचली. लिखाणात केदारची पेटंटेड स्लॅपस्टिक पद्धत होती आणि ती साकारायला बरोबर होता बालमित्र भरत जाधव. प्रेक्षकांना कुठेही उसंत न मिळू देता या दोघांनी ‘पुन्हा सही रे सही’चा इमला उभारला. हा इमला इतका टोलेजंग होईल हे तेव्हा कुणालाच वाटलं नसेल. केदारची अशा पद्धतीच्या नाटकांच्या क्राफ्टिंगची शाई ‘पुन्हा सही रे सही’च्या प्रत्येक प्रवेशात दिसते. खरंतर नाटकात प्रवेश कमीच आहेत, कारण सव्वादोन तास चालणारं हे नाटक तसं सलग जातं आणि त्यातच त्याचा इम्पॅक्ट आहे. लेखक-दिग्दर्शक म्हणून केदार शिंदेचं ‘पुन्हा सही रे सही’ हे एक उत्तम जमलेलं नाटक आहे.

दत्तूच्या दारूबाज भूमिकेत जयराज नायर तर अभिनयाने आपल्याला गुंगवतात. खलनायकी वळणाचा अनिकेत राजे झालेला मनोज टाकणे अत्यंत सफाईने आपल्यासमोर येतो. अण्णा बेरके या बेरकी पात्रात उमेश बने खूपचं पटणारं काम करतो. वकील लेले झालेला प्रशांत विचारे केवळ आपल्या देहबोलीतून हंशा वसूल करतो. मनोरमाबाई म्हणून पल्लवी ओक यथायोग्य खाष्टपणा बाळगून प्रयोग सादर करतात. रूपा म्हणून उर्मिला झगडे आणि मीरा म्हणून प्रणिता वाळुंजकर दोन नायिका सहजपणे सादर करतात. ‘पुन्हा सही रे सही’मध्ये योगेश गढी आणि विक्रांत घायताडके हे सर्वात महत्त्वाचं काम करतात. हे दोघे भरत जाधवचे डमी आहेत. अशाचवेळी बहुसंख्य भरत जाधव रंगमंचावर अवतरणं हे केवळ या दोघांमुळे शक्य होतं. लोकाभिमुख कला असलेल्या नाटकात आपला चेहरा कधीच प्रेक्षकांना न दाखवता रंगमंचावर वावरायचं याला जबरदस्त तालीम आणि भान ठेवावं लागतं. योगेश आणि विक्रांतने हे अतिशय अनुशासन पाळून साध्य केलेलं आहे.

सतरा वर्षे एक नाटक सतत हाऊसफुल्लचा बोर्ड घेऊन चालतं ही बाब अद्भुत, अलौकिक आणि अकल्पित आहे.  हिंदुस्थानची क्रिकेट मॅच असलेल्या दिवशीही तीनही प्रयोग हाऊसफुल्ल घेण्याची किमया ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाने केलेली आहे. महाराष्ट्रात पाऊस तसा जोरकस असतो. मुसळधार पावसातही ‘पुन्हा सही रे सही’ची हाऊसफुल्ल गर्दी ओसरली नाही. जगाच्या पाठीवर कुठेही असलं दुसरं उदाहरण असणं शक्य नाही. मराठी नाटक हे एकाच ठिकाणी न घडता ते एकाचं दिवशी विविध थिएटरमध्ये घडतं हे विशेष आहे. या परिस्थितीतला ‘पुन्हा सही रे सही’चा हा विक्रम दखलपात्र आहे. भरत जाधव एन्टरटेन्मेन्टने मराठी नाटकांमधलं हे अद्भुत आश्चर्य आज सतरा वर्षांनंतरही हाऊसफुल्ल गर्दीत सुरू ठेवलंय हे कौतुकास्पद आहे.

 

नाटक                         पुन्हा सही रे सही

निर्मिती                      भरत जाधव एन्टरटेनमेण्ट

निर्माती                        सरिता भरत जाधव

कार्यकारी निर्माता           रत्नकांत जगताप

नेपथ्य                          प्रदीप मुळ्ये

संगीत                         अशोक पत्की

प्रकाशयोजना               राघू बंगेरा, विजय गोळे

गीतकार                      ओंकार मंगेश दत्त

वेशभूषा                      प्रकाश निमकर

लेखक-दिग्दर्शक           केदार शिंदे

कलाकार                 पल्लवी ओक, मृणाल भुस्कुटे,  उर्मिला झगडे, प्रणीता वाळुंजकर, प्रशांत विचारे,

केदार शिर्सेकर,  मनोज टाकणे, जयराज नायर,योगेश गढी, विक्रांत घायताडके

आणि भरत जाधव.

दर्जा ***