संवेदनशीलतेचा गावरान उद्रेक

61

>> क्षितीज झारापकर

‘उलट सुलट’ आजच्या शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर भाष्य करणारे वास्तववादी नाटक.

मराठी रंगभूमीवर नेहमीच वेगवेगळ्या पठडीची नाटकं येत राहिली आहेत. या वेगवेगळ्या नाटकांमुळेच मराठी रंगभूमी सक्षम आणि वृद्धिंगत होत राहिली आहे. यात नाटकांच्या विषयाच्या वैविध्याचा खूप मोठा वाटा आहे. मराठी रंगभूमीने नेहमीच सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून विविध विषय नाटकांमधून लोकांसमोर आणलेत. स्वातंत्र्यपूर्व काळात कृष्णाजी खाडिलकरांनी ‘किचकवध’ वगैरे नाटकं लिहून पौराणिक संदर्भांच्या मदतीने इंग्रजांच्या विरुद्ध मतं जनमानसात रुजण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ही जणू मराठी रंगभूमीची एक ओळखच झाली. स्वातंत्र्योत्तर काळात सेवादलाच्या पथकातून लिलाधर हेगडे, वसंत बापट वगैरे मंडळींनी ही चळवळ जिवंत ठेवली. याच सेवादलातून आलेल्या दादा कोंडके, निळू फुले यांच्यासारख्या प्रस्थापित नटांनी ती नेटाने पुढे चालवली. समाजाला स्वतःच्या परिस्थितीचं आरस्पानी दर्शन देणं हे व्रतच जणू आपल्या रंगभूमीने स्वीकारलेलं आहे. या व्रताचा भाग म्हणून बहुतेक ‘सुयोग’ या नाटय़संस्थेने सध्या एक नवीन नाटक ‘उलट सुलट’ रंगभूमीवर आणलेलं आहे.

महाराष्ट्र हे मुळात कृषिप्रधान राज्य. महाराष्ट्रातील शेतकरी हा खरं तर सर्वात महत्त्वाचा. स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांना औद्योगिकीकरणाचं महत्त्व पटू लागलं आणि औद्योगिक महाराष्ट्राचं आपल्या शेतकऱयाकडे दुर्लक्ष होऊ लागलं ही वस्तुस्थिती आपल्याला विसरता येणार नाही. हे दुर्लक्ष जाणूनबुजून केलं होतं की अनावधानाने होत गेलं हा चिकित्सेचा विषय होऊ शकतो पण औद्योगिकीकरणामुळे प्रगत झालेल्या महाराष्ट्र प्रदेशातल्या प्रगत प्रजेला आज आपल्या दुर्लक्षित कृषीबांधवांबाबत वेगळेच प्रश्न पडतात असं चित्र दिसतं. हा वेगळ्या प्रश्नांचा मुद्दा घेऊन ‘उलट सुलट’ हे नाटक आपल्यासमोर उभं राहतं. लेखक किरण माने यांनी एका विशिष्ट अजेंडय़ाअंतर्गत बेतलेलं ‘उलट सुलट’ हे अनेक पातळ्यांवर भिडू शकेल असं प्रोजेक्ट वाटतं. मुळात सध्या परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱयांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अशा वातावरणात अशा आशयाचं नाटक बेतणं आणि त्यात या विषयाशी खूप जवळून निगडीत असलेला आघाडीचा नट मकरंद अनासपुरेला कास्ट करणं यातून हे नाटक करण्याचा मोटिव्ह स्पष्ट होतो. मोटिव्ह स्युत्य आहे, कारण शेतकऱयांचा प्रश्न हा खूपच गहन मुद्दा आहे. नाटक पाहाणारा प्रमुख प्रेक्षक हा शहरी उरलेला असल्यामुळे त्याला या प्रश्नाची गहनता समजवण्याच्या दृष्टीतून हा प्रयत्न फारच चांगला आहे. किरण माने यांनी ‘उलट सुलट’ लिहिताना नाण्याच्या दोन्ही बाजू मांडायचा प्रामाणिक प्रयत्न योजलेला दिसतो. आर्ग्युमेन्टस्ना पॉइंट आणि काऊंटर पॉईन्ट त्यांनी उत्तम उभे करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी स्वतः साकारलेलं क्रिमिनल लॉयरचं पात्र या कामी पुष्कळ मदत करणारं आहे.

‘उलट सुलट’ हे दोन विचारांचं नाटक दोन व्यक्तिमत्त्वांमधलं नाटक झालंय. याचं मुख्य कारण म्हणजे त्या दोन पात्रांमधला विलक्षण संबंध. हा संबंध एका अत्यंत भावनिक घटनेशी जुडल्याने नाटक बघताना सतत आपल्याला त्याची जाणीव राहते. या संबंधामुळे नाटकातला वकिल हा सुरुवातीपासूनच हॅण्डीकॅप झालाय आणि म्हणून मग त्याने मांडलेल्या युक्तिवादाला मर्यादा येतात. एका प्रसंगात मातीने माखलेल्या भुईमुगाच्या शेंगांचा उल्लेख आहे. शहरी लोकांना हे अनहायजिनिक वाटतं असं मत मांडलं जातं. आज सुपरमार्केटसदृष वाण्यांच्या दुकानात सोललेले दाणे पिशव्यांमधून मिळतात ते कसे वाईट आणि वकिलाची पत्नी कशी रस्त्यावर बसणाऱया शेतकऱयाकडूनच शेंगा घ्यायची असंही सांगितलं जातं. मुळात इथे तफावत अशी की सोललेले दाणे घेण्यात शहरातील चाकरमानी स्त्रियांचा विचार स्वयंपाकात होणारा कन्व्हिनियन्स आणि वाचणारा वेळ इतका प्राथमिक असतो. शिवाय शहरातल्या रास्त्यावर भुईमुग विकणारे हे महाराष्ट्रातले शेतकरी नसून परप्रांतातील उपरे दलाल असल्याचा सर्वपक्षीय उहापोह सुरू आहे तो वेगळा. तात्पर्य असे की ‘उलट सुलट’ या नाटकात तर्काला भावनिकतेची जोड देण्यात आलेली आहे आणि त्यात तर्क किंचित फसल्यागत झाल्यासारखा वाटतो.

ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी ‘उलट सुलट’ हे नाटक डिझाईन करताना लेखनातील मुद्दे अधोरेखित करण्याचं काम खूपच उत्तमरित्या केलेलं आहे. विषेशतः काही ठिकाणी स्टेजवर पात्रांना प्रकाशयोजनेच्या मदतीने सेपरेट करून वेगळ्या स्थळात आणि भावविश्वात नेण्याची योजना फारच परिणामकारक आहे. घराच्या प्रांगणात असणारा स्विमिंग पूल आणि तेथिल घटनांचा रंगमंचावरील दृष्याशी जोडलेला संबंध उत्तम आहे. प्रदीप मुळ्ये यांनी आपल्या लौकिकाला साजेसं नेपथ्य करून एक निष्णात क्रिमिनल वकिलाचं घर मूर्तिमंत उभारलं आहे. राहुल रानडे यांचं संगीतही नेहमीप्रमाणे अत्यंत प्रभावी आहे. भूषण देसाई यांची प्रकाशयोजनाही नीटनेटकी आणि प्रभावी आहे.

किरण माने यांचा क्रिमिनल लॉयर खूपच उत्तम झालाय. दिमाखदार, विद्वान आणि सुरुवातीला उद्धट पण उत्तरोत्तर अत्यंत समंजस होत जाणारं हे पात्र किरण माने यांनी यथायोग्य साकारलंय. समीर देशपांडे आणि कृतिका तुळसकर या दोघांनी शहरी लोकांचं अर्कचित्र खूपच प्रभावीपणे सादर केलंय. तन्वी पंडित वकिलाच्या पत्नीच्या भूमिकेत शोभते. भूषण गमरे आणि समीर सोनावणे याचंही काम साजेस आहे. ‘उलट सुलट’ भावतं ते मात्र मुख्य कलाकार मकरंद अनासपुरे यांच्यामुळे. विनोदवीर म्हणून प्रस्थापित असलेले अनासपुरे हे संवेदनाशील व्यक्ती आहेत हे त्यांच्या सामाजिक कार्यातून आपल्याला माहीत आहे. पण त्यांच्यातील नट हा केवळ विनोदाचा बादशहा नसून एक अत्यंत संवेदनशील कलावंत आहे याची प्रचिती आपल्याला ‘उलट सुलट’ मधून येते.

सुयोग आणि ऐश्वर्या थियेटर्स निर्मित ‘उलट सुलट’ हे एका वेगळ्या संवेदनशील विषयावरचं नाटक म्हणून उल्लेखनीय आहे. संदेश भट आणि राजेश पाटील यांचं त्याबद्दल कौतुक करायलाच हवं. अशाच नवनवीन नाटकांची निर्मिती त्यांच्यामार्फत होत राहो ही सदिच्छा.

नाटक – उलट सुलट
निर्मिती – ऐश्वर्या + सुयोग प्रॉडक्शन्स
निर्माते – संदेश भट, राजेश पाटील
सूत्रधार – गोटय़ा सावंत
लेखक – किरण माने
नेपथ्य – प्रदीप मुळ्ये
संगीत – राहुल रानडे
दिग्दर्शक – कुमार सोहोनी
कलाकार – तन्वी पंडित, कृतिका तुळसकर, समीर देशपांडे, भूषण गमरे, समीर सोनावणे, किरण माने आणि मकरंद अनासपुरे
दर्जा – अडीज स्टार

आपली प्रतिक्रिया द्या