हाऊसफुल्ल – सपाट, कंटाळवाणं मम्मीपुराण

2955

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

हलका फुलका सिनेमा म्हणजे वायफळ विनोद, अतिशयोक्तीचा अतिरेक, उगाच काहीतरी अंगविक्षेप वगैरे वगैरे… आणि यापैकी सगळ्या किंवा काहीएका गोष्टीचा जरी भरणा असला की, झाला विनोदी सिनेमा तय्यार!

पण विनोदी सिनेमांना दर्जा नसेल तर ते प्रचंड डोकेदुखी ठरू शकतात हे अबाधित सत्य आहे आणि दुर्दैवाने नुकताच प्रदर्शित झालेला ‘जय मम्मी दीं’ हा सिनेमादेखील फसलेल्या विनोदपटांमधे फक्त आणखी एकाची भर घालतो.

ही कथा म्हणजे विनोदी मांडणी असलेली लव्ह-हेट नात्याविषयी आहे. म्हणजे एक प्रेमीयुगुल असतं. ते दोघे एकमेकांमध्ये आकंठ बुडालेले असतात. त्याच वेळी त्या दोघांच्या आया एकमेकांच्या शत्रू असतात. भेटेल तिथे, भेटेल तेव्हा त्या दोघी एकमेकांशी कचाकचा भांडत असतात. अशा वेळी त्यांना कळतं की, आपली मुलंच एकमेकांच्या प्रेमात आहेत. मग त्या आयांचं काय होतं, मुलांचं काय होतं आणि प्रेमाचं काय होतं ते बघायचं असल्यास हा सिनेमा पाहावा लागेल आणि मग या सिनेमासोबत कंटाळा फुकटमध्ये वाटय़ाला येईल इतकंच.

या सिनेमातले प्रमुख कलाकार म्हणजे सनी सिंग आणि सोनाली सेहगल जोडी. दिसायला फ्रेश आणि वावर चांगला असला तरीही अभिनयाच्या बाबतीत दोघेही जण यथातथाच आहेत. स्टाईल असली तरीही प्रेक्षकाला जोडून घेणारा धागा असतो, तो मात्र दोघांच्याही अभिनयात जाणवत नाही. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखा हव्या तशा भिडत नाहीत.

दुसरे दोन मुख्य कलाकार म्हणजे दोन आया. त्यांच्याच भोवती हा सिनेमा आहे आणि म्हणूनच सिनेमाचं नावदेखील ‘जय मम्मी दीं’ असंच आहे. या दोघींचा वावर गमतीदार असला तरीही थोडय़ा वेळाने कंटाळवाणा वाटायला लागतो. अर्थात सुप्रिया पाठकने नेहमीप्रमाणे ती सहजच विनोदाचा बाज सांभाळला आहे, पण पूनम धिल्लन मात्र तिच्यापुढे जरा तोकडी पडते.

सिनेमा नको तितका खेचला गेल्याने झालंय असं की, विषयात म्हणावं तसं नावीन्य नाही. सध्याचं टॉपला असणारं ग्लॅमर नाही, विनोदाचा दर्जा नाही की अभिनयाची उंची नाही. त्यामुळे सिनेमा एका वेळेनंतर सपाट होऊन जातो. सिनेमा सुरुवातीला किंचित बरा वाटतो, पण प्रत्येक मिनिट जसं पुढे सरकतं तसं आपण आपोआप मोबाईलशी चाळा करायला लागतो, इथे तिथे बघतो, जांभया काढतो. एकूणच, कधी हा गोंधळ संपेल एवढीच वाट बघत बसतो.
सिनेमात नाचगाणी आहेत, पण त्यातही काही जीव नाही. ज्याप्रमाणे सिनेमा अति खेचला गेलाय, तितकीच अति गाणी या सिनेमामध्ये भरली आहेत.

एकूणच ‘काहीच बघायला नाही म्हणून आपण काही बघू शकत नाही’ या वाक्याचा नीट विचार करून मगच थिएटरमध्ये जावं नाही तर डोकेदुखीच वाटय़ाला येईल.

सिनेमा – जय मम्मी दीं
दर्जा – दीड स्टार
निर्माता – भूषण कुमार, किशन कुमार, लव राजन, अंकुर गर्ग
दिग्दर्शक – नवज्योत गुलाटी
संगीत – अमर्त्य बाबू रहुत, तनिष्क बाघची, मीट ब्रदरस, पराग छाब्रा, ऋषी सिद्धार्थ, गौरव चॅटर्जी
कलाकार – सनी सिंग, सोनाली सेहगल, सुप्रिया पाठक, पूनम धिल्लन

आपली प्रतिक्रिया द्या