मंत्रमुग्ध अनुभव

530

>>वैष्णवी कानविंदे-पिंगे

लेखकाला जे सांगायचंय त्या कथाबीजाशी त्याचं अथपासून इतिपर्यंत प्रामाणिक असणं, त्या कथेवरील सिनेमाची चौफेर विचार करून केलेली बांधणी आणि एकूणच कलाकृतीचा शेवटी पडणारा प्रभाव हे सगळं जुळून येणं हा सशक्त सिनेकलाकृतीचा मंत्र असतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मंत्र’च्या निमित्ताने हा सकस सिनेअनुभव वाटय़ाला येतो. मुळात सिनेमा पाहताना जाणवतं की, सिनेमाकर्त्याला या सिनेमाद्वारे काहीएक ठाम विचार मांडायचा आहे आणि कुठेही भरकटत न जाता सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तो त्या विचाराशी प्रामाणिक राहिला आहे, पण हे करीत असतानाच सिनेमा तंत्राचा, सिनेमा म्हणून सादर करताना आवश्यक असणाऱया बाबींचाही तितकाच विचार केला गेलाय. त्यामुळेच करमणुकीसोबत एक ठाम विचार आपल्याला हा सिनेमा पाहताना जाणवत राहतो आणि सिनेमा संपल्यावरही कदाचित आपल्याच मनात असणाऱया एका द्वंद्वावर काहीएक ठोस उत्तर सापडल्यासारखं वाटतं.

आपल्या आजूबाजूला धर्माच्या नावाखाली मांडलं जात असलेलं स्तोम, ठिकठिकाणी दिसणारे धर्मपुजारी आणि त्यांच्या मागे धावणारे श्रद्धांध अनुयायी हे चित्र आपल्याला अगदी बघावं तिकडे दिसतं. शिवाय या सगळय़ांचं चाललेलं मार्केटिंग, त्यांच्याकडचा आर्थिक ओघ आणि कालांतराने समोर येणारे गुन्हे अशा गोष्टीही आपण अगदी दररोज उघडय़ा डोळय़ांनी पाहत असतो, पण या सगळय़ांमुळे धर्मावर विश्चास ठेवावा की ठेवू नये या कात्रीत आपल्यासारखी देवभोळी, भित्री माणसं सापडलेली असतात. आपल्याला श्रद्धेचा बाजार पटतही नसतो, पण त्याच्या विरुद्ध जायला आपलं मनही घाबरत असतं. मग अशा वेळी जर निर्णय घ्यायची वेळ आली तर काय होईल? अशा प्रश्नांना ‘मंत्र’ या सिनेमातून खूप नीट हाताळलं गेलंय आणि त्यामुळेच एक चांगला, सकस सिनेमा पाहिल्याचा आनंद हा सिनेमा पाहताना मिळतो.

ही कथा आहे एका पुजाऱयाच्या घरातली. त्या पुजाऱयाला समाजात त्याच्या वेदशास्त्रातल्या ज्ञानामुळे आणि आचरणामुळे मान असतो. देवधर्माचं करताना त्यात पैशाला दुय्यम स्थान देणाऱया या पुजाऱयाचा मोठा मुलगाही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तयार होत असतो, तर धाकटय़ा मुलाला कुटुंबाच्या या व्यवसायाविषयी वावगं काही वाटत नसलं तरीही त्याचा दृष्टिकोन खूप आजचा आणि व्यावहारिक असतो. त्याचे सर्वधर्मीय मित्र असतात, तो सीएचा अभ्यास करीत असतो वगैरे वगैरे. अचानक त्या कुटुंबाला एक संधी येते. जर्मनीला जाऊन पुजाऱयाचं काम करण्याची. मोठय़ा मुलाला पैशांमागे धावणं नको वाटत असतं आणि मग चॅलेंज म्हणून धाकटा मुलगा दोन वर्षांसाठी ही संधी स्वीकारायचं ठरवतो, पण ती संधी स्वीकारल्यावर त्या गोष्टीच्या अंतरंगात शिरताना त्याला त्याच्या दोन्ही बाजू दिसायला लागतात. या प्रश्नाची दोन्ही टोकं त्याच्या अगदी जवळची असतात आणि मग या टोकाला जावं की त्या टोकाला या ओढाताणीत तो अडकतो. मग त्याचा सुवर्णमध्य निघतो की, ताणलेला रबर शेवटी तुटून जातो. या प्रश्नाचं उत्तर त्याला समजतं का? ते शोधताना तो कुठल्या मार्गाने जातो? आजूबाजूच्या परिस्थितीवर या सगळय़ा द्वंद्वाचा काय परिणाम होतो? या सगळय़ा प्रश्नांची उत्तरं पाहायची असतील तर हा ‘मंत्र’ पाहायला हवा.

या सिनेमाचं शक्तिस्थळ म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनातले प्रश्न मनातले द्वंद्व या सिनेमाने नेमकेपणाने समोर आणले आहेत. यात सगळय़ांचे अभिनय चांगले जमलेयत. मुख्य म्हणजे यातल्या पात्रांच्या वावरण्यात कुठेही बेगडीपणा नाही. कथा-पटकथा आणि संवादांचं लिखाण करतानाचा स्वच्छ, निर्भेळ विचार त्यातून प्रतीत होतो. म्हणजे व्यक्तिरेखा खऱ्या वाटतात. मुख्य भूमिका करणारा निरंजन अर्थात सौरभ गोगटे, त्याचे विचार, त्याच्या आवडी, घरातले संस्कार, नंतर त्याच्या मनात उभं राहणारं आंदोलन हे कुठेही उगाच नाटय़मय नाही. अगदी आपल्याच आजूबाजूचा एखादा मुलगा असावा असं वाटतं, तर नास्तिक विचारांची अभिनेत्री, तिची स्टाईल, तिचे विचार याचं कारण उलगडतं तेव्हा ती व्यक्तिरेखाही चपखल वाटते. अर्थात जितका सहज इतरांचा वावर आहे तितका दीप्ती देवीचा नाही, पण तरीही ती या सिनेमाच्या कथेला मात्र पूरक ठरते.

मनोज जोशींनी निरपेक्ष पंडित चांगला उभा केलाय. निरंजनच्या भावाच्या भूमिकेत असणारा पुष्कराज चिरपूटकर तर अप्रतिम. याशिवाय अशा घरांमधली आई, आजी ही पात्रंही अगदी खरी उभी राहिली आहेत. आजीची नातवावरची माया, साडी भेट मिळाल्यावर ती कोणाला तरी देता येईल म्हणून पेटीत ठेवणं वगैरे छोटय़ा छोटय़ा गोष्टींमुळेच या सिनेमाच्या प्रवाहात सहजता आली आहे. तसंच कर्मकांडांचं घर असलं तरी त्यातही असलेला प्रत्येकामधला मोकळेपणा, विचारांची सहजता आणि या सगळय़ांनी मिळून ती उभी करताना राखलेली सलगता खरोखरच छान जमून आलीय. या सिनेमाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे उच्चार मराठी असो, इंग्रजाळलेले असो, भाषा अशुद्ध असो किंवा खणखणीत संस्कृत उच्चार आणि एकूणच भाषिक बाजूचा बाज त्या त्या व्यक्तिरेखेने संपूर्ण सिनेमात खास जपलाय आणि त्यामुळेच सिनेमाला वजन आलं आहे.

सुरुवातीचा मंत्रोच्चार किंवा पार्श्वसंगीतही अप्रतिम. कदाचित सिनेमातील काही गोष्टी विचार करायला सोडता आल्या असत्या तर सिनेमाने आणखी जास्त उंची गाठली असती. उत्तरार्धात काही दृश्यं नाटय़ निर्माण करताना ताणली गेली आहेत. तो ताणही सहज कमी करता आला असता. असो. पण या गोष्टी सहज दुर्लक्ष करण्याजोग्या आहेत. तेवढं सोडलं तर विचारांचं तंत्र उत्तमरीत्या जपणारा आणि आपल्या मनातल्या विचारांना दिशा दाखवणारा हा ‘मंत्र’ नक्कीच चांगला सिनेमा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या