मिस झालेली नाटय़मयता

43


>> वैष्णवी कानविंदे

काही सिनेमे दिसायला देखणे असतात. म्हणजे त्या सिनेमातले कलाकार, त्यातील वातावरण, घडणाऱया घटना हे सगळं प्रेक्षकाला पडद्यावर पाहताना सुसह्य वाटतं, आपलंसंही वाटतं, पण प्रत्यक्षात त्या सिनेमात खूप काही वेगळं असं घडतच नाही. तोच तोचपणा, कुठेतरी छोटासा संघर्ष. सिनेमा पाहताना तो कितीही घरगुती वाटला तरी त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नाटय़मयता हवीच, नाहीतर कितीही देखणेपण असलं तरीही उभारलेला सगळा डोलारा डळमळीत वाटायला लागतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिस यू मिस्टर’ या सिनेमाचं असंच काहीतरी झालेलं आहे. नाटय़ाचा अर्क फारच कमी असल्यामुळे सिनेमाच्या प्रवाहात तो दिसतच नाही आणि त्यामुळे सिनेमा सूर पकडत नाही .

या सिनेमाची कथा तशी घराघरांमध्ये घडणारी. जेव्हा कोणतीही दोन माणसं एकमेकांवर प्रेम करायला लागतात तेव्हा हळूहळू आपण एकमेकांना ग्राह्य धरायला लागतो. मग हे ग्राह्य धरलं जाणं संवेदनशील मनाला टोचायला लागतं आणि त्यातूनच गैरसमज जन्म घेतात. नात्यातला हाच भाव उलगडणारी या सिनेमाची कथा. पुण्यातल्या मध्यमवर्गीय घरात राहणाऱया, लग्नाला दोन वर्षे झालेल्या एका जोडप्याची गोष्ट. पैसे कमावून भविष्याची तरतूद करायला परदेशात गेलेला नवरा आणि त्याच्या मागे त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली त्याची बायको, आई आणि वडील यांची ही कथा. दूरस्थ नात्यांमध्ये मनं कशी जोडली जाऊ शकतात आणि कशी तुटूही शकतात हे हा सिनेमा पाहताना जाणवतं.

सिनेमाचा विषय चांगला आहे. तो खूप आजचा आहे, पण ती गोष्ट मांडताना त्यातलं नाटय़ अधिक संवेदनशीलतेने टिपता आले असते, पण पटकथा थोडी ढिसाळ झाल्यामुळे दोन तासांच्या सिनेमामध्ये प्रेक्षक हवा तसा गुंतू शकत नाही. दूरवर राहणारे दोघेजण असले की, अर्थात फोन स्काईप या माध्यमाचा वापर खूप जास्त होणार हे साहजिक आहे, पण या सिनेमामध्ये फोनचा वापर इतका जास्त आहे की, शेवटी खटकायला लागतं. हा तिला फोन लावतो, तो त्याला लावतो, ती त्याला लावते, तिची ती तिला लावते, मग तो त्याला लावतो आणि यातच अर्धा वेळ निघून जातो. या फोनाफोनीला मर्यादित ठेवून जर नात्यातले बारकावे प्रत्यक्ष अक्षरी त्या उभे केले असते तरीही साधीसोपी आणि सगळ्यांना जोडणारी प्रेमकथा नक्कीच अधिक प्रभावशाली ठरली असती. तो लंडनला राहतो, ती पुण्याला राहते, पण परिस्थिती इतकी बिकट नसते की, तो अधूनमधून येऊ शकणार नाही किंवा ती त्याच्याकडे जाऊ शकणार नाही. म्हणजे जर खरोखरच संघर्ष असतात तर प्रेक्षकाला तो भिडला असता, पण तो संघर्ष असा दिसतच नाही. आता संघर्ष म्हणजे खूप काही विदारक असायलाच पाहिजे असं नाही, पण तो भाव जाणवला पाहिजे आणि त्याचाच अभाव आहे.

मृण्मयी देशपांडे छान दिसते. कामही चांगलं आहे, पण तिच्या वाटय़ाला फार काही वेगळं आलेलं नाही. कदाचित लंडनचा संदर्भ असल्यामुळे सिद्धार्थ चांदेकर हा ‘गुलाबजाम’मधलाच आठवत राहतो, पण अर्थात त्यामुळेच ‘गुलाबजाम’मध्ये तो अधिक उजवा असल्याचंही जाणवतं. हिरो म्हणून या सिनेमात त्याच्या व्यक्तिरेखेला थोडय़ा मर्यादा आहेत हेच खरं. राधिका विद्यासागर तिच्या वाटय़ाला छोटं काम आहे, पण मुलीची आगाऊ आई छान साकारली आहे. सविता प्रभुणेचं कामदेखील चांगलं झालं आहे. एकंदरीत आजच्या काळात जगू पाहणाऱया, पण जुन्या वळणाच्या आया आपल्या अवतीभवती दिसतात. तोच भाव तिने छान साकारला आहे. हृषीकेश देशपांडेच्या वाटय़ाला आलेली भूमिकाही ओढून ताणून आणल्यासारखी जाणवते आणि मध्यांतरानंतर सिनेमा पारच भरकटला जातो. इतकं काही भरकटायला नको होतं असं पाहणाऱया कोणालाही जाणवतं.

काही संवाद बरे आहेत, पण ते वेचावे लागतात. सिनेमा पाहताना कंटाळा यायला लागतो. मध्यांतर जिथे होतं तो क्षण तर अगदीच सपक वाटतो. गाण्यामध्ये फारसा दम नाही. उलट एखाद्या सिच्युएशनमध्ये मलमपट्टी करायला लावल्यासारखी ती वाटतात आणि मजा येत नाही. या सिनेमांमध्ये बारकाव्यांवरती खूप काम करणं गरजेचं असतं. अगदी आपापसातले क्षण प्रत्येक संवाद प्रत्येक दृश्य पाहताना किंवा त्यातली गाणीही ऐकताना प्रेक्षक कणाकणांनी जोडला जायला पाहिजे आणि तरच तो सिनेमा त्याच्यात झिरपू शकतो, पण दुर्दैवाने ‘मिस यू मिस्टर’मधला हास्य जोडू पाहणारा दुवाच मिस झालाय असं सिनेमा पाहताना जाणवतं.

सिनेमा – मिस यू मिस्टर
दर्जा – दोन स्टार
संगीत – आलाप देसाई
निर्माता – दीपा त्रासी, सुरेश म्हात्रे
दिग्दर्शक- समीर जोशी
कलाकार – सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे,राधिका विद्यासागर, अविनाश खर्शीकर, राजन भिसे, सविता प्रभुणे, हृषीकेश देशपांडे

आपली प्रतिक्रिया द्या