नात्यामधल्या अंतराची आंबटगोड गोष्ट- ‘मिस यू मिस्टर’

51


>>रश्मी पाटकर

नवरा-बायको या नात्याची गंमत काही औरच असते. एकाच नात्याचे वेगवेगळे पैलू सांभाळताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळेच कोणत्याही नात्यापेक्षा या नात्यात संवादाची गरज सर्वात जास्त असते. संवाद कमी झाला की हे नाजूक धागे विरायला लागतात. त्यात जर नवरा बायको लाँग डिस्टन्स नात्यात राहत असतील तर प्रश्न आणखी गुंतत जातो. आजच्या जगात एकत्र राहूनही संवाद साधणं कठीण होत असताना एका जोडप्याच्या आयुष्यात आलेला भौगोलिक दुरावा नेमका किती परिणाम करू शकतो किंबहूना करतो, याची गोष्ट मिस यू मिस्टर हा चित्रपट सांगतो.

ही गोष्ट आहे, वरुण आणि कावेरी या जोडप्याची. लग्न होऊन अवघे काही महिने झालेले असताना काही आर्थिक अडचणींमुळे लंडनला जावं लागतं. जवळपास दीडहून अधिक वर्षं तिथे राहून पैसे कमावणं ही गरज असल्याने वरुणच्या या निर्णयात कावेरी त्याला संपूर्ण साथ देते. अर्थात हे सोपं नसतं. वरुण लंडनला निघून गेल्यानंतर बंद खोलीतलं एकटेपण, सासू-सासरे, नोकरी, नातेवाईक यांच्यात उडणारी तारांबळ हे सगळं सगळं सांभाळत कावेरी निभावून नेत असते. होणारा प्रत्येक त्रास व्यक्त न करता निमूटपणे सगळं सहन करते. या दरम्यान वरुण आणि कावेरी दोघेही स्काईपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत असतात. तिथे वरुणही एकाकी आयुष्य जगत असतो. परक्या देशात राहताना अनेक अडचणींचा सामना करत असतो. अठरा महिन्यांच्या या दीर्घ काळादरम्यान मध्येच वरुण परत येतो, तेच मुळात दोन वर्षं लंडनमध्ये मुक्काम करण्याच्या हेतूने. पण, याची कावेरीला कोणतीही कल्पना नसते. आल्यानंतरही त्यांच्यातला हरवलेला संवाद तिला वेळोवेळी त्रास देत राहतो आणि एका क्षणी अबोल असणाऱ्या कावेरीच्या भावनांचा स्फोट होतो. त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. हा दुरावा ते दोघं कसा दूर करतात, त्यांच्यातलं नातं पुन्हा सुरळीत होतं का, हे सगळे प्रश्न आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतरच उलगडतील.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर-

चित्रपटाची कथा ही सरधोपट पद्धतीची नाही, ही एक जमेची बाजू आहे. आजवर मराठी चित्रपटांमध्ये वैवाहिक नातं अशा प्रकारे हाताळलं गेलेलं नाही. त्यामुळे या चित्रपटात नेमकं काय दाखवलं जाणार याची उत्सुकता निर्माण होते. पटकथा या उत्सुकतेला साजेशी असल्याने रंगतदार पद्धतीने पुढे जाते. मध्यंतरापर्यंत काहीशा संथ वाटणाऱ्या पटकथेने उत्तरार्धात मात्र चांगलाच वेग पकडला आहे. विशेषतः सगळं काही नीट सुरू असल्यासारखं वाटत असताना नात्यांमधला दुरावा एकदम उफाळून समोर येतो तेव्हा कथेत रंगत वाढते. कथेला चुरचुरीत संवादांची फोडणी लागली असल्याने प्रेक्षक वरुण आणि कावेरीच्या जगात रमतात. कथेत अतिशय छोट्या छोट्या गोष्टींचाही विचार करण्यात आला आहे. उदा. दोन्ही देशांच्या वेळा, त्यानुसार कावेरी आणि वरुणमधले संवाद किंवा घडणारे प्रसंग. त्यामुळे घडणाऱ्या घटना प्रेक्षकाला अवास्तव वाटत नाहीत. तीच बाब दिग्दर्शनाची. असा वेगळा विषय हाताळण्यासाठी समीर जोशी यांना पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील. पण, या प्रश्नाचे आणखी काही पैलू समोर आले असते, तर विषय आणखी चांगल्या प्रकारे पोहोचला असता, असं वाटून जातं. इतर तांत्रिक बाजूही चोख आहेत. संगीताबाबत म्हणायचं झालं तर तुझी आठवण या गाण्याचा विशेष उल्लेख करावा लागेल. वैभव जोशी लिखित हे गीत आलाप देसाई यांनी संगीतबद्ध केलं आहे. आनंदी जोशी आणि आलाप देसाई यांनी गायलेलं हे गाणं अत्यंत श्रवणीय आहे.

अभिनयाबाबत बोलायचं झालं, तर सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे या जोडीने सिक्सर हाणला आहे. छोट्या पडद्यावरची ही प्रेक्षकांची लाडकी जोडी नऊ वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकली आहे. सिद्धार्थ आणि मृण्मयीमधली अफलातून केमिस्ट्री प्रेक्षकांना कावेरी आणि वरुणच्या प्रेमात पाडायला पुरेशी आहे. एकमेकांवर समरसून प्रेम करणारं जोडपं साकारताना या दोघांनीही कुठलीही कसर ठेवलेली नाही. सिद्धार्थला मिळणाऱ्या समान पठडीतल्या भूमिकांमध्येही त्याने वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. संसार की व्यवसाय याच्या कातरीत सापडलेला तरुण सिद्धार्थने सुंदर साकारला आहे. विशेष कौतुक करावं लागेल ते मृण्मयीचं. अबोल, घुमी असणारी, नवऱ्यावर प्रचंड प्रेम करणारी, त्याच्यापासून आपले त्रास लपवणारी आणि त्याच्यापासून दूर झाल्याच्या जाणीवेने कळवळून संतापणारी कावेरी तिने ज्या प्रकारे डोळ्यांमधून व्यक्त केली आहे, ते कमाल आहे. इतर कलाकारांनीही त्यांना उत्तम साथ दिली आहे. सविता प्रभुणे यांची व्हॉट्सअॅपवर वेळोवेळी अपडेट टाकणारी टेकसॅव्ही आई धमाल आणते. इथे ऋषिकेश जोशी यांनी साकारलेल्या समुपदेशकाच्या भूमिकेचा विशेष उल्लेख करावा लागेल. अगदी काही प्रसंगांच्या भूमिकेतूनही त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे.

थोडक्यात काय, नवरा बायकोच्या नात्यात संवादांची आवश्यकता हा चित्रपट अधोरेखित करतो. संवाद नसेल तर नात्यांचे नाजूक बंध ताणले जातात आणि तुटू शकतात. त्यामुळे रोज भेटणाऱ्या व्यक्तिशीही संवाद महत्त्वाचा असतो. भौगोलिक अंतर असो वा नसो, कोणतंही नातं जिवंत ठेवण्यासाठी संवाद साधत राहणं गरजेचं असल्याचं हा चित्रपट जाणवून देतो.

आपली प्रतिक्रिया द्या