मिशन मंगल : मंगलमय यशाची कथा

3229

मंगळ ग्रहावर आपला उपग्रह पाठवून तिथले फोटो मिळवण्याचं पहिलं पाऊल हिंदुस्थानने टाकलं, पण ते करताना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. हिंदुस्थानचं अंतराळातील हे खूप मोठं यश होतं आणि म्हणूनच सिनेमासाठी खूप रोचक विषयही होता. प्रर्दिशत करायचा दिवस आणि आकर्षक अशी स्टारकास्ट यामुळे सिनेमाने आधीच उत्सुकता पेरली होती आणि याच उत्सुकतेला साकार करत करमणुकीचं संपूर्ण पॅकेज घेऊन हा सिनेमा प्रर्दिशत झालाय. या सिनेमात भरपूर करमणूक आहे, नेत्रदीपक दृश्य आहेत, गाणी आहेत, विनोद आहेत आणि ऊर भरून येणारं देशप्रेमदेखील आहे. एकूणच करमणूक करायला हा सिनेमा प्रेक्षकाला आवडेल हे निश्चित

इस्रो येथील अंतराळ वैज्ञानिक आणि स्पेस डायरेक्टर यांचा चांद्रयान प्रकल्प अयशस्वी होतो. त्यांच्याबद्दल नकारात्मक प्रक्षोभ उसळतो. पण न हरता ते दोघे मंगळ मोहीम करायचा चंग बांधतात. त्यांना जी टीम मिळते तीदेखील नवशिखी. तुटपुंजे बजेट, कमी वेळ अशा सगळ्या गोष्टी विरुद्ध असतानादेखील केवळ जिद्दीने ते हा प्रकल्प पूर्ण करायचा निर्णय घेतात. त्यात निसर्गदेखील आडवा येतो. या परिास्थितीमध्ये ते यशस्वी होतात का, अडचणी नेमक्या कशा येतात, हिंदुस्थान आपलं पहिलं पाऊल कसं रोवतो, याची रोचक गोष्ट म्हणजे ‘मिशन मंगल’ हा सिनेमा.

विद्या बालन तर जबरदस्त अभिनय करतेच. अगदी सहज वावर आणि मोकळेपण यामुळे सिनेमा किती तरी चमकदार होतो. पण तिच्या सोबत असलेली भक्कम महिलांची फळी त्यात तापसी पन्नु, कीर्ती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा आणि निथया मेनन या सगळ्याच जणी एक सुंदर वर्तुळ पूर्ण करतात. या सगळ्यांना एकत्र पडद्यावर पाहायला खूप मस्त वाटतं. प्रत्येकीची वेगळी स्टाईल, प्रत्येकीच्या वेगळ्या तऱ्हा, हे सगळं खूप छान जुळून आलंय.

अक्षय कुमार आणि अशा स्टाईलचा सिनेमा हे एक खास समीकरण आहे आणि या वेळीही ते मस्त जुळून आलंय. शिवाय शर्मन जोशी, विक्रम गोखले वगैरे मंडळी पण या सगळ्याला खूप छान हातभार लावतात. या सगळ्यांच्या स्टाईल खूप छान रंगवल्या आहेत. विशेष करून एकेकीच्या साड्या आणि सोनाक्षीची वेगळी तऱ्हा… प्रत्येकीचा वेगळा आणि उत्तम प्रभाव पडतो.

सिनेमात जी गोष्ट सांगितली गेली आहे ती प्रत्यक्षात घडताना खूप कठीण असली तरी सिनेमात तिच गोष्ट सोपी दाखलवली आहे. फक्त हलकापुâलका बाज जपताना केलेलं हे सोप्प रूप कदाचित जरा अजून थोडं गुंतागुंतीचं दाखवलं असतं तर रंगत आणखी वाढली असती. तसंच सिनेमा काहीसा इतर गोष्टींमध्ये पण खूप जास्त रेंगाळतो. वैज्ञानिकांच्या घरगुती गोष्टी दाखवणं योग्य आहे. पण त्या दाखवताना ‘अखिया मिला कभी अखीया चुराय’वरचा डान्स वगैरे जरा उगाच टाळ्या पिटण्यासाठी घातलेली दृश्य वाटतात. अशी अनेक दृश्य केवळ टाळ्या आणि हास्यासाठी आहेत. ती टाळून िंकचित गंभीर रूप दिलं असतं तर सिनेमाला आणखी वजन आलं असतं. पण हरकत नाही. या सिनेमाची गाणी फार प्रभावी नाहीत. सिनेमा शेवटाकडे मात्र खासच रंगतो. विशेष करून काय होणार हे माहीत असूनही सिनेमा प्रेक्षकांची उत्वंâठा धरून ठेवतो हे विशेष. ग्राफिक्स मस्त झाली आहेत. सिनेमा त्याच्या सगळ्या लिबर्टी धरूनही प्रेक्षकाला प्रत्येक क्षणी खूश करतो. असे सिनेमा नक्कीच यायला हवे आणि प्रेक्षकांनीदेखील प्रचंड प्रतिसाद देऊन पाहायला हवे. कारण करमणूक सोबत आपल्या देशाच्या इतिहासातली काही पानं मनातलं देशप्रेम नक्कीच पुन्हा एकदा उजळवायला हातभार लावतात.

सिनेमा : मिशन मंगल
दर्जा : तीन स्टार
निर्माता : केप ऑफ गुड फिल्म, होप प्रॉडक्शन्स, फॉक्स स्टार स्टुडिओ, अरुणा भाटिया, अनिल नायडू
दिग्दर्शक : जगन शक्ती
लेखक : आर. बल्की, जगन शक्ती, निधी सिंग धर्मा, संकेत कोडीपर्थी
संगीत : अमित त्रिवेदी, तनिष्क बागची
कलाकार : अक्षय कुमार, विद्या बालन, शर्मन जोशी, कीर्ती कुल्हारी, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, निथ्या मेनन, विक्रम गोखले.

आपली प्रतिक्रिया द्या