हाऊसफुल्ल : रंगीबेरंगी रॅपरमधील आकर्षक मसाला

>> वैष्णवी कानविंदे

सुट्टय़ा सुरू झाल्या की, काहीतरी टाईमपास हवा असतो. त्यात बाहेर अंगाची लाही होणारा उन्हाळा असेल तर थंडगार प्रेक्षागृहामध्ये बसून एखादा रंगीबेरंगी युथ फुल सिनेमा पाहण्याचं सुख काही औरच असतं. म्हणूनच बहुदा ‘स्टुंडन्ट ऑफ द इयर टू’सारखा सिनेमा जुळवून घेण्यात यशस्वी ठरतो.

तारुण्याची टवटवी असणारा, रंगीबेरंगी छान संवाद, छान गाणी, छान कलाकार, छान वातावरण अशा छान छान वातावरणात असलेला हा सिनेमा, तप्त वातावरणात एखादी सुखद फुंकर नक्कीच घालू शकेल. याचा अर्थ असा नाही की, हा सिनेमा पाहताना काहीतरी वेगळं गवसलं आहे किंवा एक वेगळी अनुभूती मिळते आहे वैगरे… पण ज्यांना आर्चीसारखी कॉमिक्स वाचायला आवडत असतात त्यांच्यासाठी हा अडीच तासांच्या रंगीबेरंगी पर्याय नक्कीच चांगला आहे.

तर ही गोष्ट आहे एका तरुण डोले शोले असणाऱया हँडसम मुलाची. त्याच एका मुलीवर प्रेम असतं आणि तिच्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. स्वतः कॉलेजचा हीरो असतो. उत्तम क्रीडापटू आणि सर्व गोष्टीत अव्वल असणाऱया या हीरोपुढे आव्हान असतं ते ‘स्टुंडन्ट ऑफ द इयर टू’ अतिशय मानाची समजली जाणारी पदवी जिंकायचं, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा घडतात की सगळी गणितं उलट सुलट होतात. मग तो किताब कोणाला मिळतो.? अशा कोणत्या गोष्टी घडतात? कोणाचं प्रेम यशस्वी होतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी ‘स्टुंडन्ट ऑफ द इयर टू’ हा सिनेमा पहावा लागेल.
या सिनेमाचं शक्तिस्थळ म्हणजे अर्थातच टायगर श्रॉफ. टायगर हा हीरोच्या भूमिकेत अगदी साजेसा आहे. या सिनेमामधला बॉडी बिल्डर हँडसम क्रीडापटू असणारा टायगर नक्कीच सिनेमाचं आकर्षण बिंदू ठरतो. त्याने अभिनयदेखील चांगला केला आहे. एकूणच या सिनेमासाठी तो पहिल्या सिनेमाच्या आलिया भटची गाडी चालवतो असं म्हणायला काहीच हरकत नाही.

दोन्ही हिरोइन्स एकदम झकास. त्यांचे कपडे, त्यांचा मेकअप, स्टाईल सगळ्या गोष्टी मॉडर्न परीची कथेची अनुभूती देतात. तारा सुतारिया, अनन्या पांडे नव्या असल्या तरी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास खूप आहे. पण अभिनयाच्या बाबतीत भविष्यामध्ये टिकून राहायचं असेल तर खूप काम करावं लागेल हे या सिनेमातला वावर पाहताना जाणवतं. आदित्य सिल हा अभिनेता मात्र नक्कीच आपलं अस्तित्व ठसवण्यात यशस्वी झालाय.

एकूणच या सिनेमाविषयी बोलायचं झालं तर तुम्ही आर्ची नावाची प्रसिद्ध कॉमिक सेरीज वाचली असेल किंवा त्याच्याबद्दल ऐकून तरी असाल. आर्चीमधला आर्ची त्याच्या दोन गर्लफ्रेंडस् वे बेटी आणि वेरोनिकाशिवाय रेगी जगगेडसारखी इतर पात्र परिचयाचे असतीलच (स्टुंडन्ट ऑफ द इयर सेरीजचे चाहते नक्कीच आर्चीशी परिचित असतील) तर त्याचाच मोठा प्रभाव असणारा हा सिनेमा हिंदुस्थानी आवडीनुसार वळवून घेतलेला आहे.

पण कथानक मात्र फार नावीन्य जपणारं नाही. आणि थोडीफार आधुनिक बाह्यआवरण आणि पारंपरिक गाभा या कात्रीत सापडल्यासारखं वाटतं. अभ्यासापेक्षा कॉलेज लाइफ म्हणजे काहीतरी सुपर जग असत असं स्वप्न मुलांच्या मनात हा सिनेमा नक्की विकू शकेल. पण ते स्वप्न बेगडी आहे आणि वास्तवातल्या जग खूप वेगळं असतं याचा फारसा परिचय हा सिनेमा देऊ इच्छित नाही. कथेतल्या पात्रांवर थोडं अधिक काम केलं असतं तर हा सिनेमा खूप चांगली पकड ही घेऊ शकला असता.

पण ‘स्टुंडन्ट ऑफ द इयर टू’च्या पहिल्या सिनेमात जो प्रभाव आलिया भट्ट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा पाडू शकले होते ते या सिनेमातल्या व्यक्तिरेखा पाडू शकत नाहीत. सिनेमाची गाणी छान आहेत. लोकेशन देखण आहे, स्टायलिंगविषयी तर बोलायलाच नको इतकं चकचकीत आहे. पण सिनेमा म्हणून दिग्दर्शकीय आणि लेखनीय पातळीवरती थोडं अधिक बारकाईने काम करता आलं असतं, तर हा सिनेमादेखील तरुणाईच्या मनातला आठवणीतला सिनेमा ठरू शकला असता. एकदा बघण्यासाठी हा पर्याय निवडायला हरकत मात्र काहीच नाही.

दर्जा – अडीच स्टार
सिनेमा – स्टुंडन्ट ऑफ द इयर टू
निर्माता – करण जोहर, हिरू करण जोहर,
दिग्दर्शक – पूनित मल्होत्रा
लेखक – अर्शद सय्यद
छायांकन – रवी चंद्रन
कलाकार – तारा सुतरिया, अनन्या पांडये, टायगर श्रॉफ, हिमांशू कोहली, आदित्य सिल, कारण टकर, उल्का गुप्ता, अपूर्वा मेहता.