हाऊसफुल्ल : करमणूकीचे गणित

162

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

प्रत्येक सिनेमाचं एक गणित असतं. जेव्हा ते सुटतं तेव्हा प्रेक्षक त्या सिनेमाला गुण देतो आणि तेव्हाच तो सिनेमा यशस्वी होतो. गणिताचा संदर्भ एवढय़ासाठीच, कारण नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘सुपर थर्टी’. गणितज्ञ आनंद कुमार यांच्या खडतर जीवनावर आधारलेला हा सिनेमा एका समाजाला बदलण्याचा वसा घेतलेल्या दिग्गजाची गाथा तर कथन करतोच पण त्या सोबत सिनेमाला आवश्यक असणारी करमणूक बऱयापैकी द्यायचा प्रयत्न करतो. अर्थात हे गणित फार क्लिष्ट नसल्याने ते प्रश्नाच्या मनात सुटत असलं तरी त्याचा प्रभाव जितका अपेक्षित होता तितका पडत नाही हे देखील तितकच खरं!

सुपर थर्टी हा सिनेमा बरा आहे. गणितज्ञ आनंद कुमार यांनी आपल्या बुद्धीच्या आधारे दारिद्रय़रेषेखाली असणाऱया मुलांना घडवायला उचललेलं शिवधनुष्य आणि त्याची ही गोष्ट. त्यात त्यांची स्वतःची स्वप्न, अपेक्षाभंग, प्रेम, पैशासाठीची कुतरओढ, मग पैसा आल्यावर दिपणारे डोळे आणि नंतर समाजाची जाणीव आणि त्यातून त्यांच्या हातून घडलेल कार्य या सगळ्याची ही गोष्ट. हे करत असताना उभे राहिलेले शत्रू आणि आलेल्या असंख्य अडचणी या सिनेमातून उभ्या केल्या आहेत. तो जीवनपट बघताना नक्कीच भारावून जायला होतं. पण तरीही मधल्या काळात आलेले पडमन, उरी, स्पेशल छाब्बिस इत्यादीसारख्या सिनेमांमधून हीरोंच्या कथा सांगणाऱया सिनेमाच्या तुलनेत हा सिनेमा थोडा डावा ठरतो, पण तरीही नक्कीच आपल्या आणखी एका हीरोची कथा आपल्या समोर येते हे देखील कौतुकास्पद आहे.

हृतिक रोशनला या सिनेमासाठी पूर्ण मार्क द्यायला हवेत. त्याने आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा अगदी उत्कृष्टरीत्या उभी केली आहे. आपलं ग्लॅमर, देखणं रूप सगळं बाजूला ठेवून त्याने खूप मस्त काम केलंय. यात त्याचं खास नृत्य नाही की काही स्टाईल नाही. पण तरीही त्याने उभी केलेले आनंद कुमार नक्की प्रभावशाली आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूरला फारसं काम नाही. तसं पाहता हृतिक वगळता फारसं कोणाला काम नाही पण उगाच फाफटपसारा नाही तेच बर आहे.

काही गोष्टी ओढूनताणून केल्यासारख्या वाटतात. हॉस्पिटलमधलं दृश्य किंवा तत्सम काही दृश्य सिनेमा मसालेदार करण्यासाठी घडवली आहेत असं वाटतं. गाणी छान आहेत. अजय-अतुलची धाटणी मनाला भुरळ घालते यात शंकाच नाही.

एकूणच हा सिनेमा एकदा पाहायला काहीच हरकत नाही. गणिती हीरोची ही कथा नेहमीपेक्षा जरा वेगळं काहीतरी देऊन जाते हेच खरं.

सिनेमा – सुपर 30
दर्जा – तीन स्टार
निर्माता- नाडियादवाला ग्रॅण्डसन फिल्म्स, फँटम फिल्म्स, रिलायन्स एन्टरटेन्मेंट
दिग्दर्शक – विकास बहल
लेखक – संजीव दत्ता
संगीत – अजय अतुल
छायांकन – अनय गोस्वामी
कलाकार – हृतिक रोशन, मृणाल ठाकूर, वीरेंद्र सक्सेना, पंकज त्रिपाठी, नंदिश सिंग

आपली प्रतिक्रिया द्या