न्यूड- निःशब्द करणारा चित्रानुभव

>>वैष्णवी कानविंदे-पिंगे

एखाद्या उत्कृष्ट दर्जेदार कलाकृतीचे निकष नेमके काय असावेत? पुस्तकी निकष काहीही असो, पण ती पाहत असताना खिळून बसता आलं पाहिजे. अगदी मधला क्षुल्लक मध्यांतरही निःशब्द सरला पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर रवी जाधवांचा ‘न्यूड’ पाहताना जो परिपूर्ण अनुभव मिळतो तसा संपृक्त अनुभव मिळाला पाहिजे.

सिनेमा पाहायच्या आधी ‘न्यूड’ हे शीर्षक, त्याचा विषय, त्यातली दृष्यं, त्याभोवतीचे वाद या सगळय़ा गोष्टींचा पगडा मनावर असण्याची शक्यता आहे, पण सिनेमा सुरू झाल्यानंतर अगदी काही क्षणांत या सगळय़ा गोष्टी बाजूला पडतात आणि उरतो तो केवळ एक अतिशय परिपूर्ण, रसग्रहणाचा सर्वांकष अनुभव देणारी कलाकृती पाहिल्याची तृप्तता. हा सिनेमा कलात्मक आहे, पण म्हणून कलात्मक कलाकृतीचा प्रेक्षक वर्ग वेगळा असतो असा ठोकताळा या सिनेमाला लागूच शकत नाही.

ही कथा एका निरागस, साधी आणि स्वतःच्या विचारांशी, कर्तव्याशी प्रामाणिक असणाऱया मुलीची आहे. नवऱयाचा बाहेरख्यालीपणा, मुलाच्या शिक्षणाची आबाळ या गोष्टीमुळे पिचून ती रातोरात गाव सोडून, मुलाला घेऊन मुंबईला येते. मुंबईच्या बकाल वस्तीत स्वतःची दीड वीत का होईना पण जागा असणाऱ्या मावशीच्या घरी राहते. काम शोधत असताना तिला कळतं की, मावशी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये कलेच्या विद्यार्थ्यांसाठी न्यूड मॉडेल म्हणून काम करते. सुरुवातीला प्रचंड धक्का बसलेली ती नंतर मात्र उदरनिर्वाहासाठी स्वतः न्यूड मॉडेल म्हणून काम करायचं ठरवते. मुलाचं भविष्य, रोजचं जगणं आणि कामावरची श्रद्धा या गोष्टींची पूर्ण कल्पना ठेवून ती मुंबईत जगायला शिकते, पण हे एवढय़ापुरतंच मर्यादित असतं का? तिचा हा प्रवास तिला वाटतो तेवढा सहज घडतो का? तिचं भविष्य काय असतं? तिच्या मुलाचं शिक्षण-जे तिचं स्वप्न असतं-ते पूर्ण होतं का? एकूणच न्यूड मॉडेल, कला क्षेत्राची गरज आणि बाकीचा सगळा समाज यांचा मेळ कसा असतो अशा अनेक गोष्टी हा सिनेमा पाहताना उलगडत जातात..

मुळात हा सिनेमा म्हणजे विविध कलाविष्कारांची जुगलबंदीच आहे जणू. एक सिनेमा म्हणून ही कलाकृती विलक्षण आहेच, म्हणजे यातली चित्रकला, पेन्सिलीला टोक काढण्यापासून ते कॅनव्हासवर उतरणाऱया रेषांपर्यंत, रंगाने लडबडलेला ब्रश पाण्यात मिसळताना त्यातून वेगळे होणारे आणि पाण्याच्या पारदर्शी भावात अलगद मिसळणारे रंग, मॉडेलची मांडणी, एकच कलाकृती टिपणारे वेगवेगळे दृष्टिकोन आणि सहज हात हे सगळं इतकं खरं मांडलंय की, चित्रकारिता खरोखरच साकारतानाचा अनुभव आपल्याला मिळतो. या सिनेमावर असलेली छायांकनाची जादू तर कमाल! अगदी पहिल्या नदीवरच्या दृष्यापासून ते तिच्या उद्रेकापर्यंत आणि मुंबईतल्या वस्तीच्या अंगोपांगापासून ते जे.जे.चं विविधांगांनी चित्रण करण्यापर्यंत कॅमेऱयाने या सिनेमावर मोरपीस फिरवलंय. गावातली, नदीकाठची शांतता असो वा मुंबईची लगबग, ट्रेन, वस्ती, गर्दी यातील किचाडपण हे सगळं त्या त्या जातकुळीप्रमाणे अगदी नेमकेपणाने उतरलंय. महत्त्वाचं म्हणजे नग्नतेचं चित्रण करताना कुठेही अश्लीलतेचा स्पर्शही जाणवत नाही.

या सिनेमाचा आणखी एक पैलू म्हणजे या सिनेमाचं संगीत. त्यातल्या चित्रांच्या सहजतेसारखंच. पाण्याच्या प्रवाहासारखं प्रवाही संगीत अक्षरशः भारावून सोडतं. एकूणच ‘न्यूड’ हा केवळ एक चांगला सिनेमा नाही, तर त्याही पलीकडे बरंच काही आहे. विविध कलांच्या इतक्या सुरेख मेळाव्याचं ते उत्तम प्रतीक आहे जणू.

कल्याणी मुळय़े या प्रमुख अभिनेत्रीच्या वावरातली सहजता प्रेक्षकाची नजरबंदीच करते. पाण्यात डुबकी मारण्याचा आनंद तिच्या डोळय़ांत उमटतो आणि दुसऱयाच क्षणी नवऱयाच्या बाहेरख्याली वर्तनाने त्या डोळय़ांचं तळं वेदनेने भरून जातं. चारचौघात नग्नतेचं प्रदर्शन करायचं या कल्पनेने शहारणारी ती आपल्या पोटापाण्याला आधार देणाऱया या कामाच्या बाजूने ठामपणे उभी राहणारी ती. कमी शब्द आणि खूप जास्त बोलकेपण अगदी सहज व्यक्त करणारी ही अभिनेत्री प्रेक्षकावर आपला घट्ट ठसा उमटवते. छाया कदमच्या अभिनयातली सहजता अशीच सुंदर. तिच्या स्वभावाचे पैलू हिच्यापेक्षा कितीतरी वेगळे, पण तिचा आवेश, तिच्या बोलण्याची ढब बघताना गांभीर्यातही हसू उमटतं.

तिच्या उमद्या दिवसांत आणि नंतर वयाप्रमाणे आलेल्या परिस्थितीतही होणाऱ्या बदलांसह मूळ स्वभावाचा ठेका मात्र तिने शेवटपर्यंत कायम राखलाय. तिची भूमिकाही या सिनेमाला परिपूर्ण करायला महत्त्वाची आहे आणि तीदेखील लक्षात राहते. मुलाची भूमिका साकारणारा मदन देवधर यानेदेखील छान काम केलं आहे, तर विद्यार्थ्याच्या भूमिकेतला ओम भुतकर विशेष लक्षात राहतो. तो विद्यार्थी म्हणून आणि ती न्यूड मॉडेल म्हणून कायम संपर्कात येतात. तिचं नग्न शरीर कायम त्याच्या समोर असतं आणि हळूहळू दोघांमध्ये एक वेगळा मैत्रीचा बंध तयार होतो. प्रथम गप्पांमधून सुरू होणाऱया मैत्रीचा नंतर शरीर आकर्षणाकडे कल झुकतो. म्हणजे असं बऱयाचदा घडतं, पण इथे सुरुवातच शारीरिक असते आणि नंतर मैत्र घडतं आणि एका वेगळय़ाच नात्याचा आविष्कार समोर येतो आणि नात्याचा जो अलवारपणा दाखवली आहे ती प्रेक्षकापर्यंतही तितक्याच सहजतेने पोहोचते हे त्या दिग्दर्शकाच्या सशक्त विचारशक्तीचं यशच म्हणायला हवं.

अगदी तीन ते चार दृश्यांमध्ये दिसणारे नसीरुद्दीन शहादेखील बहर आणतात. त्यांचे उर्दू आणि तिच्या मराठी संवादांची जुगलबंदी खासच. दृष्यांची प्रभावी गुंफण, दिग्दर्शनाने पकडलेली अचूक नाळ आणि संवाद हे सगळं खूप सहज जमून आलंय. चित्रकारांसमोर न्यूड मॉडेल म्हणून बसताना चित्रकार ज्या नजरेने बघतो त्याच नजरेने नकळतच प्रेक्षकही बघतो. त्यात वासनेचा लवलेश जसा चित्रकाराला जाणवत नाही तसा आपल्यालाही जाणवत नाही हेदेखील दिग्दर्शकाचं यशच आहे. ‘टायटॅनिक’ सिनेमात या क्षणाचं चित्रण जेवढं सहज होतं तितकंच सहज ते ‘न्यूड’मध्येही चित्रित झालंय.

खूप काही घडणारं, वेगळं असूनही ते कुठेही अंगावर येत नाही, पण प्रभावीपणे आपला ठसा उमटवत मात्र राहतं. आपण या सिनेमाच्या प्रवाहात इतके प्रवाही झालेले असतो की, एका क्षणी नकळत खाटकन हा सिनेमा संपतो तेव्हाच आपण भानावर येतो, पण सिनेमा संपला तरीही तो मनाच्या खूप आतपर्यंत झिरपलेला असतो. ‘न्यूड’मुळे एक देखणी कलाकृती वाटय़ाला आल्याचा आनंद लाभतो आणि याविषयी नुसते तर्क लावण्यापेक्षा थिएटरमध्ये जाऊन हा अनुभव प्रत्येकाने मनात साठवून घ्यायलाच हवा.