भूतपट परी…अनाकलनीय जरी!

वैष्णवी कानविंदे-पिंगे । मुंबई

परिकथा म्हटलं की, डोळे विस्फारतात. आपण एका वेगळय़ाच जगात जातो. लहान असताना आपल्याला भावणारं हे परिकथेतलं, हवंहवंसं वाटणारं जग… पण या सगळय़ा कल्पनेला फाटा देणारा ‘परी’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. या सिनेमाचं नाव आणि अनुष्का शर्माचा भुताळी चेहरा या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी आहेत, पण भूतपटप्रेमींना आकर्षित करून घेईल असा लूक आणि शिदोरी या सिनेमांनी प्रथमदर्शी जरी बांधली असली तरी प्रत्यक्ष सिनेमा पाहताना विस्कळीत पटकथा, उगाच भयानक केलेली दृष्यं पाहताना चांगलं काही गवसेल अशी अपेक्षा करणाऱ्यांच्या मात्र पदरी निराशाच पडते.

नुकतंच लग्न ठरलेला एक तरुण आपल्या आईवडिलांसोबत घरी जात असतो. वाटेत अचानक त्याच्या गाडीला आपटून एका बुरखाधारी बाईचा मृत्यू होतो आणि त्या बाईची मुलगी जंगलात साखळीने बांधलेल्या अवस्थेत सापडते. आपल्यामुळे त्या बाईचा मृत्यू झाला या अपराधी भावनेतून तो त्या मुलीला मदत करायची ठरवतो, पण ते तेवढय़ापुरतंच मर्यादित नसतं. कोण असते ती मुलगी, तिला असं जंगलात साखळीने बांधून का ठेवलं असतं. त्या मुलाला तिच्याबद्दल ओढ का वाटत असते…अशा अनेक प्रश्नांची रक्तरंजित उत्तरं सिनेमा जसा पुढे जातो तशी मिळत जातात. या सिनेमाचं कथासूत्र जरी वेगळं असलं आणि इतर नेहमीच्या बॉलीवूड भयपटांपेक्षा वेगळं असलं तरीही त्याची कमालीची कच्ची, विस्कळीत आणि दम नसलेली पटकथा या सिनेमाचा अख्खा डोलारा धाडकन खाली पाडते. म्हणजे पडद्यावर सिनेमा पाहताना त्यातलं रक्त, मांस, घाणेरडे चेहरे, हाडं वगैरे गोष्टी पाहून तो भूतपट असल्याची जाणीव प्रत्येक फ्रेममध्ये होत राहते, पण या सगळय़ांमध्ये बरेचसे संदर्भ कळतच नाहीत. मग प्रेक्षकाच्या भुताच्या सिनेमाची हौस पूर्ण झालीच पाहिजे. आपण विकत घेतलेल्या तिकिटाला जागलं पाहिजे, भले कथा कळली नाही तरी चालेल या भावनेने दिग्दर्शकाने भयंकर दचकवणारा परी प्रेक्षकांच्या डोक्यावर मारला आहे.

बाकीच्या गोष्टी बोलण्याआधी अभिनयाबाबत टिपणी करणं महत्त्वाचं. अनुष्का शर्माचं खरंच कौतुक केलं पाहिजे. म्हणजे बाकी सिनेमा कसाही असला तरीही सध्या ग्लॅमरच्या अत्युच्च टोकावर असणाऱ्या आणि नंबर वनच्या स्पर्धेत अग्रणी असणाऱ्या अनुष्काने असा सिनेमा करणं आणि त्यातली मध्यवर्ती भुताळी भूमिका साकारणं खरंच कठीण काम होतं आणि तिने ते काम अतिशय मन लावून अप्रतिम साकारलंय. तिच्या मेहनतीला दाद दिलीच पाहिजे. त्याशिवाय परम्ब्रत चॅटर्जी, रजत कपूर, रिताभरी चक्रोबर्ती या सगळय़ांची कामं खरोखरच चांगली झाली आहेत. या सगळय़ांच्या अदाकारीमुळेच या सिनेमाला जे काही वजन आहे ते मिळालंय, पण दुर्दैवाने सिनेमालाच पकड नसल्यामुळे सगळी मेहनत वायाचं जाते.

या सिनेमाचं छायांकन, ध्वनी, संगीत इत्यादी सगळय़ा गोष्टी भुतपटाला अगदी साजेशाच. म्हणजे भुताटकी सिनेमाला काय आवश्यकता असते त्या गोष्टी तर खच्चून भरल्या आहेत. काळोखी कीर्र रात्र, कोसळणारा पाऊस, घनदाट घाबरवणारं जंगल, लांबलचक सावल्या, भयाण वातावरण, दचकवणारे आवाज… हे सगळं अर्थात बाहेरचं आवरण कुरकरीत करायला, पण नुसतं बाहेरचं आवरणच नाही, तर आतलं सारणही तितकंच भरगच्च आहे. रक्ताच्या चिळकांडय़ा, हडळ चेहरे, सांगाडे, मांस, रक्तपेशी आणि जे काही मनात येईल ती सगळी रेसिपी या सिनेमात खच्चून भरली आहे. अगदी विक्रम भटपासून ते रामसे बंधूंपर्यंत सर्वांना स्मरून हा सिनेमा बनवलाय याची खात्रीच पटत जाते. एका क्षणानंतर हे सगळं पाहून ढवळायला लागलं तरीही आश्चर्य वाटायला नको. कितीही भूतपट आवडत असले तरीही हे सगळं इतकं असायला हवं का? हा प्रश्न राहून राहून मनात येत राहतो.

शिवाय या करकरीत भूतपटाला दिलेली प्रेमपटाची फोडणी जरा अवघडच वाटते. असो. मध्यांतरानंतर या सिनेमात पहिल्या अर्ध्या भागात घालून ठेवलेला गुंता सुटायला लागतो. सगळय़ा प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतात, पण एकूणच सगळा पोरखेळ असल्याचं लक्षात येतं. म्हणजे उदाहरणार्थ, इमारत बांधायला घेतली आणि मधल्या मधल्या विटांमध्ये सिमेंट घातलंच नाही. मध्ये मध्ये घातलं तर काय त्या इमारतीची अवस्था होईल तशीच काही अवस्था या परीची झाली आहे. होळीच्या रंगात रंगताना तो रंग सोडून परिकथेत रंगणं म्हणजे धाडसच लागेल. म्हणजे भूतपट आहे, भीती वाटेल म्हणून नव्हे तर असंबद्ध आणि अचकट विचकट बघावं लागेल म्हणून. त्यामुळे अगदीच अनुष्का शर्माचे भक्त असाल आणि कोणताही भूतपट चालत असेल तरच या वाटेल जा अन्यथा उगाच त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही.

  •  दर्जा     : २ स्टार
  • चित्रपट   : परी
  • निर्माता   : अनुष्का शर्मा, कमेश शर्मा
  • दिग्दर्शक : प्रोसित रॉय
  • लेखक    : प्रोसित रॉय, अभिषेक बॅनर्जी
  • संगीत    : अनुपम रॉय
  • कलाकार : अनुष्का शर्मा, परम्ब्रता चॅटर्जी, रजत कपूर, रिताभरी चक्रोबर्ती, मानसी मुलतानी