अखंड दरवळलेली अश्रूंची फुले

112

‘अश्रुंची झाली फुले’ प्रा. वसंत कानेटकरांचे अजरामर नाटक. आज पुन्हा त्याच जोशात रंगभूमी गाजवते आहे.

प्राध्यापक वसंत कानेटकर हे नाव मराठी नाटय़सृष्टीत ऋषीतुल्य आहे. मराठी नाटकाचं क्राफ्टिंग महत्त्वाचं झालं ते वसंत कानेटकरांमुळे. नाटक सुरू कुठे व्हावं, स्थळ, काळ, प्रसंगांची ओळख आणि मांडणी कशी करावी, पात्रांचा परिचय कसा स्वाभाविक साधायचा आणि एकूणच नाटक प्रेक्षकाभिमुख ठेवण्याच्या त्यांच्या हातखंडय़ाला आजही सलाम. बरं कानेटकरांची नेमकी पठडी कोणती? त्यांच्या नाटकांची जातकुळी काय? कोणत्या जॉनरचे नाटककार म्हणायचे त्यांना? या प्रश्नांना आजही उत्तरं सापडत नाहीत. त्यांच्या नाटकांची यादी पाहा. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’ ही ऐतिहासिक नाटकं, ‘मत्स्यगंधा’ आणि ‘लेकुरे उदंड जाहली’ ही परिमाणं बदलणारी संगीतनाटकं, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ आणि ‘प्रेमाच्या गावा जावे’ ही विनोदी नाटकं, ‘बेईमान’ आणि ‘अश्रूंची झाली फुले’ ही सामाजिक नाटकं. अशी वैविध्य असणारी अनेक नाटक़ं वसंत कानेटकरांच्या समर्थ लेखणीतून मराठी रंगभूमीवर आली. साठीच्या दशकातील उत्तरार्धापासून ते ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत कानेटकरांनी व्यावसायिक म्हणवणाऱया मराठी रंगभूमीचं व्यावसायिक गणित बदलून टाकलं. सामाजिक नाटकांना त्यांच्या नाटकांमुळे हाऊसफुल्लचे बोर्ड लागू लागले. त्यांच्या नाटकांनी रंगभूमीला नवीन सुपरस्टार दिले. त्यातील एक नाव म्हणजेच डॉ. काशीनाथ घाणेकर.

‘आणि… डॉ. काशीनाथ घाणेकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्यात घाणेकरांचा रंगभूमीचा प्रवास प्रामुख्याने ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आणि ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकांमधून दाखवला गेला.

चित्रपट सुपरहिट झाला आणि पुन्हा एकदा कानेटकरांच्या मदतीने व्यावसायिक नाटकांचं गणित बदलण्याचा घाट घातला गेला. डॉ. काशीनाथ घाणेकरांच्या भूमिकेत भन्नाट अभिनय करून रसिकांची मनं जिंकणाऱया सुबोध भावेंना लाल्याच्या भूमिकेत आणून ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा विचार दिनेश पेडणेकर, मंजिरी भावे, राहुल कर्णिक आणि अभिजित देशपांडे यांनी केला.

अर्थातच एका मोठय़ा प्रोजेक्टच्या पाठीवर येत असल्याने आणि मराठी नाटक सध्या भव्य होत असल्याने हे ‘अश्रूंची झाली फुले’ नाटक भव्यदिव्य होणे अपरिहार्य होते. नेपथ्यकार प्रदीप मुळय़े यांच्यावर ती जबाबदारी सोपवली गेली. नेपथ्यामुळे नाटकाचा काळ जसा चटकन उभा राहतो, तसाच तो गीता गोडबोले यांच्या वेशभूषेमुळेदेखील होतो. वेशभूषेतली रंगसंगती नाटकाच्या काळाशी अत्यंत संयुक्तिक आहे. विशेष करून तिसऱया अंकातील शंभू महादेवचा वेश तर चक्क हिंदी खलनायक अजितच्या रॉबर्टची आठवण करून देतो. तांत्रिकबाबतीत उजवं असलेलं हे ‘अश्रूंची झाली फुले’ मग बहरतं ते कलाकरांच्या अभिनय कामगिरीतून.

सर्वप्रथम शैलेश दातार आणि सुबोध भावे यांचं कौतुक करायला हवं की या दोघांनी कुठेही मूळ कलाकारांचा ठसा उमटवण्याचा प्रयासही नाही केला. शैलेशने विद्यानंद स्वतःच्या प्रतिभेतून उभा केलाय आणि हे त्याला नीट जमलंय. क्लायमॅक्समध्ये शैलेशचा अंडरप्ले खूपच वेगळा वाटतो. सुबोधने ऑथरबॅक्ड पात्र लाल्या साकारलं आहे. अनावश्यक प्लेइंग टू द गॅल्लरी सुबोधने कटाक्षाने टाळलेलं आहे. घाणेकरांवर सिनेमा करूनही सुबोधने हे केलं हे खरोखर वाखाण्याजोगं आहे. उमेश जगतापने शंभू महादेव जबरदस्त आत्मविश्वासाने वठवला आहे. सीमा देशमुख हिने डॉ. सुमित्रा पुरेशा आवेगाने उभी केली आहे. या पात्राचा सामंजसपणा, पोक्तपणा आणि व्याकुळता सीमा देशमुखने समर्थपणे सादर केली आहे. श्रद्धा पोखरणकर हिने दोन वेगळय़ा बाजातली नीलम उत्तमपणे सादर केलेली आहे. सॅम झालेला प्रथमेश देशपांडे श्यामची ओढाताण योग्य पद्धतीने साकारतो. धर्माप्पाच्या भूमिकेत प्रणव जोशी पुरेशी अरेरावी आणतो. रवींद्र कुलकर्णी- आरोळे आणि जितेंद्र आगरकर-क्षीरसागर हे दोघेही हवे तितके मुद्सद्दी जाणवतात. भूषण गमरे आणि रोहित मोरे यथायोग्य कामगिरी बजावतात.

या वेळेचं ‘अश्रूंची झाली फुले’ प्रख्यात दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेलं आहे. सर्वप्रथम त्यांनी प्रा. वसंत कानेटकरांची मूळ तीन अंकी संहिता आजच्या मराठी नाटकांच्या दोन अंकी साच्यात बसवण्यासाठी एडिट वगैरे करण्याचा खटाटोप अजिबात केलेला नाही म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन. बऱयाच जुन्या नाटकांचं स्ट्रक्चरच या प्रयत्नात मोडलेलं आढलेलं आहे.

लेखक नाटक लिहिताना त्यातले इम्पॅक्ट बिंदू गाठण्यासाठी काही घटना योजतो. एडिटच्या प्रयत्नात त्यातल्या चढत्या घटनाक्रमाला धक्का लागला की, नाटकाची परिणामकारकता मार खाते. प्रतिमाताईच्या या ‘अश्रूंची झाली फुले’मध्ये हे कुठेच घडत नाही. सत्तरीच्या गुन्हेगारी चित्रपटांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यातील थीम म्युझिक. मिलिंद जोशी यांनी ‘अश्रूंची झाली फुले’ला एक थीम रचली. ही धुन सामान्य प्रेक्षकांच्या सहज डोक्यात बसणारी आहे.

‘अश्रूंची झाली फुले’ हिंदी चित्रपटसृष्टीत बी. आर. फिल्मस या मोठय़ा संस्थेने मशाल या सिनेमातून आणलं होतं. अनामिका, कान्हाज मॅजिक, साई साक्षी अशा मातब्बर संस्था, दिग्गज निर्माते इतकं सबळ पाठबळ घेऊन नाटक पुन्हा भेटीला आलं आहे.

नाटक – अश्रुंची झाली फुले
निर्मिती- अनामिका, कान्हाज मॉडीक, साईसाक्षी
सौजन्य – कलर्स मराठी
निर्माते- दिनेश पेडणेकर, मंजिरी भावे, राहुल कर्णिक, अभिजित देशपांडे
लेखक – प्रा. वसंत कानेटकर
नेपथ्य, प्रकाश योजना- प्रदीप मुळ्ये
पार्श्वसंगीत – मिलिंद जोशी
वेशभूषा – गीता गोडबोले
दिग्दर्शक – प्रतिमा कुलकर्णी
कलाकार – सीमा देशमुख, श्रद्धा पोखरणकर, प्रथमेश देशपांडे, प्रणव जोशी, रवींद्र कुलकर्णी, जीतेंद्र आगरकर, भूषण गमरे, रोहित मोरे, उमेश जगताप, शैलेश दातार, सुबोध भावे
दर्जा – तीन स्टार

आपली प्रतिक्रिया द्या