एक क्लासिकल कलाकृती

>> क्षितिज झारापकर, kshitijzarapkar@yahoo.com

मी, माझे- मला… या नाटकामुळे मधुसूदन कालेलकर, बाळ कोल्हटकर यांच्या नाटय़शैलीची आठवण करून दिली जाते.

कळपात राहणारा माणूस सुसंस्कृत झाला आणि कळपात राहू लागला अशा आशयाचं पु. लं.चं एक वाक्य लहानपणी वाचलं होतं. त्यावेळी ते फक्त त्यातील शाब्दिक खेळामुळे भावलं होतं. पुढे पु. लं.च्या त्या वाक्यातील गर्भितार्थ समजू लागला. आपण माणसं स्वतः प्राणी म्हणवून घ्यायला तयार नाही आहोत. प्राणी समूहात राहतात, त्यांचं एकंदर जगणं सांघिक स्वरूपाचं असतं. आपण माणसं वेगळं काही करत नाही. धर्म, पंथ, संप्रदाय, वंश, भाषा, प्रांत, देश अशा समुदायांमध्ये आपण जगतो. पूर्वी निदान या विभाजनांमध्ये देखील एक सांघिकता होती अणि माणसं एकमेकांची कास धरून राहात होती. पण कालांतराने कुटुंबपद्धती बदलली आणि तंत्रज्ञानाने माणसाला अधिक एकटं पाडायला सुरुवात केली. एकटा पडत चाललेल्या माणसाने स्वतःचं विश्व संकुचित करून टाकायला सुरू केलं आणि स्वतःच्या संक्षिप्त विश्वाभोवती असंख्य कुलूपं लावून टाकली. मानव मुळात अप्पलपोटा प्राणी आहे. विचार करू शकणारा प्राणी असल्याने तो प्रामुख्याने स्वतःचाच विचार नेहमी करतो. या शेवटच्या विचारावर किवी प्रॉडक्शन्सचं नवीन मराठी नाटक आहे ‘मी, माझे-मला’.

किशोर सावंत व विवेक नाईक निर्मित ‘मी, माझे-मला’ ही दोन भावांची गोष्ट आहे. वडिलोपर्जित संपत्तीवरून वाद घालत, भांडत कोर्टाची पायरीसुद्धा चढणाऱया भावांची ही गोष्ट. ‘मी, माझे-मला’चे लेखक आहेत कौटुंबिक जिव्हाळय़ाची लोकभिमुख कथान मराठी नाटकांमधून प्रभावीपणे मांडणारे आनंद म्हसवेकर. अलीकडच्या प्रेक्षक पसंतीच्या विनादी शैलीचा वापर आनंद म्हसवेकरांनी ‘मी, माझे-मला’मध्ये टाळलेला आहे. या विषयाची जातकुळी वेगळी आहे हे जाणून त्यांनी नाटक तसं रचलं आहे. कोणतंही पात्र उगीचंच पंच टाकून भाव खाण्याचा प्रयत्नही करत नाही. क्लासिकल नाटकांची शैली वापरत दोन भावांमधील संघर्ष अधोरेखित केलाय. ‘मी, माझे-मला’मध्ये म्हसवेकरांनी कौटुंबिक जिव्हाळय़ाच्या कालेलरी नाटय़लेखन शैलीचा वापर केला आहे. त्यात किंचित बाळ कोल्हटकरी झाकदेखील दिलीये. या सगळय़ाचा मिश्रित परिणाम म्हणजे उत्तम लिखाणातून मांडलेला विषय आणि त्या विषयाचं ‘मी, माझे-मला’ हे नाटक.

नाटकाची शैली अशी असल्यावर दिग्दर्शकाची निवडही तितकीच योग्य हवी. ‘मी, माझे-मला’चे दिग्दर्शक आहेत विजय गोखले. क्लासिकल नाटय़शैलीशी विजय हे त्यांच्या लहानपणापासूनच जोडलेले आहेत. त्यामुळे या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पेलायला ते निश्चितच समर्थ आहेत. ‘मी, माझे-मला’ हे नाटक विजय गोखले यांनी खूप सोपं करून उभं केलं आहे. नाटकाचा विषय, त्यातील संघर्ष हे केंद्रस्थानी ठेवत विजय गोखले ‘मी, माझे-मला’ पुढे सरकवत नेतात आणि प्रेक्षकांना पात्रात किंवा नट-नटय़ांच्या मोठेपणात अडकू न देता प्रेsक्षकांना खरोखरच आजच्या सामाजिक परिस्थितीचा एक आरसा दाखवतात.

‘मी, माझे-मला’ या नाटकात कलाकारांची एक देखणी मोट बांधण्यात आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतली मादकतेचा ऍटमबॉम्ब म्हणून प्रसिद्ध असणारी एक सुपरस्टार अभिनेत्री सुरेखा कुडची प्रथमच मराठी नाटकातून आपल्यासमोर येत आहे. मोठय़ा भावाच्या पत्नीची भूमिका तिने साकारली आहे इथे गंमत आहे. आपल्या पहिल्याच नाटकात आपल्या लोकप्रिय इमेजला पूर्णपणे विरुद्ध असणारी भूमिका स्वीकारून ती समर्थपणे पेलून दाखवण्याचं आव्हान यशस्वी करायचं हे कौतुकास्पद आहे. भावनिक प्रसंगात डोळय़ांत खरंखुरं पाणी लीलया आणू शकणाऱया बोटांवर मोजता येतील इतक्याच अभिनेत्री आता उरल्या आहेत. सुरेखाने या नाटकात हे साध्य केलंय. दुसरी अभिनेत्री आहे सिनेतारका हेमांगी राव. यांनी आधी नाटकांमधून कामं केली आहेत. त्यांच्या आधीच्या सगळय़ा भूमिकांपेक्षा ‘मी, माझे-मला’मधली धाकटय़ा भावाची बायको खूप वेगळी आहे. ती पेज थ्री संस्कृतीची ब्युटीशियन आहे आणि त्या संस्कृतीशी सुसंगत अशीच स्टुपिड आहे. हेमांगीजींनी हा मूर्खपणा इतका कमालीचा सहज करून पेश केलाय की एरवी भावनिक असणाऱया नाटकात त्या नेमक्या हंशा वसूल करतात. दस्तुरखुद्द विजय गोखले मित्र संजयच्या भूमिकात समन्वय साधण्याचं हुकमी काम करतात. ते किती संपन्न अभिनेते आहेत हे सर्वश्रुत आहे. विघ्नेश जोशीने महेशची भूमिका आणि त्या पात्राचा त्रागा उत्तम सादर केला आहे. मुळात रुबाबदार असणाऱया विघ्नेशने व्यक्तिमत्त्वाचा सुंदर वापर केला आहे. मोठय़ा मुलाचा मुलगा अभिषेक म्हणून रोहित मोहिते आणि डॉक्टर म्हणून विलास गुर्जर शोभतात आणि योग्य परिणाम साधतात. मोठा भाऊ म्हणून किशोर सावंत समतोल राखून काम करतात. मोठय़ा भावाचा पोक्तपणा, समंजसपणा त्यांनी व्यवस्थितपणे साकारला आहे.

निर्मितीमूल्यांमध्ये ‘मी, माझे-मला’ हे व्यावसायिक पातळीवर हवं तितकं रुबाबदार आहे. पूरक आणि पोषक नेपथ्य व संगीत देवाशीष भरवडे व अनिकेत-शुभमकडून नाटकाला लाभलेलं आहे. अमोघ वाघ यांची प्रकाशयोजनाही परिणामकारक आहे. एकंदरीत ‘मी, माझे-मला’ं ही कोणत्याही मध्यमवर्गीय मराठी घरातली गोष्ट आहे.

नाटक – मी-माझे, मला
निर्मिती – किवि प्रॉडक्शन्स
सादरकर्ते – किशोर सावंत, विवेक नाईक
लेखक – आनंद म्हसवेकर
संगीत – अनिकेत, शुभम
नेपथ्य – देवाशीष भरवडे
प्रकाश – अमोघ फडके
रंगभूषा – राजन वर्दम
दिग्दर्शक – विजय गोखले
कलाकार – सुरेखा कुडची, हेमांगी राव, रोहित मोहिते, विलास गुर्जर, विघ्नेश जोशी, विजय गोखले
दर्जा – अडीच स्टार