स्वातंत्र्यवीरांचा वैचारिक वारसा सांगणारे नाटक

>> क्षितिज झारापकर

संगीत सन्यस्त खड्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आजच्या काळाशी सुसंगत नाटक

काही गोष्टी चिरंतन असतात. काही नाटकेही चिरंतन ठरतात. एखादं नाटक कोणत्याही काळात तितकंच रेलेव्हंट वाटावं यासाठी त्या नाटकातील विचार खूपच प्रगल्भ आणि व्यापक असावा लागतो. जेव्हा विचारवंत माणसं नाटक लिहितात तेव्हा हे शक्य होतं. असंच एक नाटक परवा पाहण्यात आलं. या मराठी नाटकातला विचार हा राष्ट्रीय स्तरावरचा तर आहेच पण तो जागतिक पातळीवरचाही आहे. धार्मिक विचारसरणीच्या परिणामांचा आलेख या नाटकात मांडला गेलेला आहे. त्यात हे नाटक आज समाजाला सहिष्णुतेचा पाझर फुटल्यानंतर लिहिलेलं नाही. हे नाटक साधारण १९३०च्या सुमारास पुराणमतवादी समाजव्यवस्थेच्या काळात लिहिलं गेलं. बुद्धांच्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेलं हे नाटक आत्यंतिक अहिंसेच्या सिद्धांतावर एक प्रखर भाष्य आहे. आणि म्हणूनच हे नाटक आजच्या सहिष्णुता कुरवाळू पाहणाऱ्या आपल्या समाजात ते तितकंच रेलेव्हंट आहे. हे नाटक आहे मुंबई मराठी साहित्य संघ निर्मित ‘संन्यस्त खड्ग’. या नाटकाचे लेखक आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘संन्यस्त खड्ग’ लिहिलंय म्हणजे ते चांगलंच असणार असा आंधळा समज करून घेणारे बरेच सापडतील. पण इथेच आपण सावरकरांचा अवमान करीत आहोत हे त्यांच्या ध्यानीमनीही नसेल. केवळ आपल्याला हे चांगलं हे वाईट, हे बरोबर ते चूक असं पिढय़ान्पिढय़ा सांगितलं गेलं म्हणून ते स्वीकारून जगू नका तर विज्ञानाच्या नकाशावर तोलून सुलाखून ठरवा असं शिकवणारे विचारवंत म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. मग केवळ त्यांच्या नावामुळे ‘संन्यस्त खड्ग’ हे एक लाक्षणिक आणि चांगलं नाटक आहे हे मानणं चूक नाही का…? हे नाटक पाहून, अनुभवून किंवा वाचून आपण आपलं मत ठरवायला हवं. मी असं म्हणतोय याला कारण आहे. सावरकर आणि गांधी यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. आता या पार्श्वभूमीवर ‘संन्यस्त खड्ग’ हे आत्यंतिक अहिंसेच्या विपरीत परिणामांवर भाष्य करणारं नाटक आहे असं म्हटल्यावर उगीचच जाज्वल्य अभिमान बाळगणारे असंख्य पाईक नाटक माहीत नसतानाही त्याच्या समर्थनार्थ छाती ठोकून उभे राहतील. पण तस होणं हे सावरकरांच्याच विचारांच्या विरोधात असेल. ‘संन्यस्त खड्ग’ हे नाटक मराठीतलं एक विलक्षण नाटक आहे, कारण त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वेगवेगळ्या स्तरावरचे अनेक मौलिक विचार आहेत, जे आजच्या परिस्थितीत खूप जास्त महत्त्वाचे आहेत. हे नाटक केवळ दोन विचारसरणींच्या मतभेदांना अधोरेखित करणारं नाटक नाही. मुळात ‘संन्यस्त खड्ग’ हे सोपं नाटकच नाही.

पहिल्या अंकातील एका प्रवेशात भगवान बुद्ध आणि त्यांच्याच राज्याच्या सेनापती विक्रमसेन यांच्यात एक अख्खा प्रवेश आहे. या प्रवेशात विक्रमसेन जे काही मुद्दे उपस्थित करतो ते आज प्रख्यात मॅनेजमेन्ट विद्यापीठांत एमबीएच्या अभ्यासक्रमात शिकवले जातात. सावरकरांनी हे सगळं १९३०च्या आसपास आपल्या करता एका नाटकातून सांगितलं होतं. सिद्धार्थ आपल्या राज्याच्या सेनापतीला शस्त्र त्यागून बुद्धाचा भिक्षुकीचा मार्ग स्वीकारायला प्रवृत्त करायला येतो तेव्हा विक्रमसेन त्याला जे सांगतो ते आजही लागू होतं. तो म्हणतो, तुमच्या ध्वजाखाली हे जे शेकडो निरुद्योगी संन्यासी, भिक्षू बैरागी इत्यादी लोकांचे बाजारबुणगे जमलेले असतात त्यांच्या श्रमास आंचवल्याने राष्ट्राची अर्थिक शक्ती किती हीन होऊन जाते ते पहा.

हा विचार म्हणजे सध्याच्या भाषेत प्रॉडक्टिव्हीटी, वर्कफोर्स मॅनेजमेन्ट, मॅनअवर्स आणि यामुळे वाढणारा जीडीपी याच्यावर भाष्य करणारा प्रवेश आहे. हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं महात्म्य आहे. ‘संन्यस्त खड्ग’ हे केवळ अशा विचारांची मांदियाळी आहे असं नाही. यात नाटय़, नाटय़संगीत हे सर्वही ठासून भरलेलं आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकरांचं संगीत आहे आणि एकूणच नाटकाचा आवाका देदीप्यमान आहे.

बुद्ध साकारणारे भरत चव्हाण आणि विक्रमसेन करणारे संदीप सोमण या दोघांनी ‘संन्यस्त खड्ग’ची अभिनयाची बाजू बळकट ठेवून प्रयोगाला मजा आणली आहे. ही मजा द्विगुणीत करतात ते वल्लभ झालेला अमोल बावडेकर आणि सुलोचनेच्या भूमिकेत संपदा माने. हे दोघे गायक नट. ‘मर्मबंधातली ठेव ही’, ‘शतजन्म शोधिताना’ आणि ‘सुकतातही जगी या’ अशी असंख्य सुरेल नाटय़गीतं ही दोघं लागोपाठ सादर करतात.

प्रमोद पवारांनी ‘संन्यस्त खड्ग’ दिग्दर्शित केलेलं आहे. इतक्या विस्तीर्ण नाटय़कृतीचं दिग्दर्शन ही सोपी बाब नाही. पवारांनी नाटक सोपं करून उभं करण्यात यश प्राप्त केलेलं आहे. त्यांनी हे नाटक आजच्या प्रेक्षकाला रुचेल आणि समजेल असंच सांधलंय.

ही आणि अशी नाटकं यावीत ही मराठी रंगभूमीची आजची निकडीची गरज आहे. ती पुरवणं ही मुंबई मराठी साहित्य संघांसारख्या संस्थांना शक्य आहे. अशा संस्थांकडे इतकी वर्षे कार्यरत असल्याने तो अनुभवी आहे. मुंबई मराठी साहित्य संघाने ‘संन्यस्त खड्ग’ हे नाटक पुनरुज्जीवित करून आणलं इथेच त्यांचे आभार मानले पाहिजेत. हे नाटक सर्व मराठी प्रेक्षकांनी आवर्जून पाहायला हवं, कारण हे नाटक जगण्याचा मूलमंत्र सांगणारं एका अत्यंत हुशार आणि विद्वान स्वातंत्र्यवीराने लिहिलेलं नाटक आहे.

नाटक      – संगीत सन्यस्त खड्ग

लेखक     – स्वातंत्र्यवीर सावरकर

संगीत     – मा. दीनानाथ मंगेशकर

दिग्दर्शक  प्रमोद पवार

कलाकार – संपदा माने, नीता, प्राची, भरत चव्हाण, संदीप सोमण, शिवाजी, आनंद, विलास, विशाख, युवराज, सुनील,                  सचिन, विजय आणि अमोल बावडेकर

दर्जा      – तीन स्टार

– kshitijzarapkar@yahoo.com