समांतर वाटांवरील दोन वेगळे प्रयोग!

>> क्षितीज झारापकर

‘तोडी मिल फॅण्टसी’ आणि ‘जुगाड’ ही दोन्ही प्रयोगशील नाटकं मराठी रंगभूमीचा ‘नावीन्यपूर्णता‘ हा विशेष अधारेखित करतात

मराठी नाटकांमध्ये सध्या जे काही नवीन प्रवाह येत आहेत, त्यात खूप वैविध्य दिसत आहे. थिएटरमध्ये सध्या दोन अशा कलाकृती आहेत, ज्या सर्वसामान्य मराठी नाटकापेक्षा खूप वेगळ्या आहेत. दोन्ही जोमाने सादर होतात. दोन्ही सांघिक उपक्रम आहेत. म्हणजेच त्यांचा परफॉर्मन्सचा संच खूप मोठा आहे. दोन्हींच्या सादरीकरणात कमालीची भिन्नता आहे आणि दोन्ही कलाकृती अस्सल आहेत. दोन्ही कलाकृती आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करू पाहतात. दोघांचा भौगोलिक व्यास वेगवेगळा आहे. आपला प्रपंच मांडण्याची दोघांची पद्धत वेगळी आहे. तरीही मराठी नाटय़ क्षेत्रात येणाऱया बदलाची नांदी दोन्ही प्रयोग ठाशीवपणे आपल्या समोर सादर करतात. येणाऱया या दोन कलाकृती आहेत ‘तोडी मिल फॅन्टसी’ आणि ‘जुगाड’.

‘तोडी मिल पॅण्टसी’

हे आजच्या महविद्यालयीन दशेतून नुकत्याच बाहेर पडलेल्या तरुण रंगकर्मींनी सादर केलेलं नाटक आहे. खरं तर याला नाटक न म्हणता शो म्हणायला हवं. मुंबईतल्या चाळी पाडून तिथे मॉल उभे राहिले, स्थानिक लोकांना त्याच मॉल्समध्ये रोजगाराची हमी देण्यात आली, पण कुठेतरी काहीतरी बिनसलं. या बिनसलेल्या वस्तुस्थितीची कहाणी म्हणजे ‘तोडी मिल फॅण्टसी’ उपरोल्लेखित कथानकावरून अशी बरीच नाटकं आणि सिनेमे मराठीत झालेत असा समज होणं स्वाभाविक आहे, पण इथेच ‘तोडी मिल फॅण्टसी’ आपल्याला सरप्राईज करतं. कारण बीज जरी ओळखीचं असलं तरी ‘तोडी मिल फॅण्टसी’चा बाज मात्र अत्यंत वेगळा आणि नवीन आहे.

सुजय जाधव या लेखकाने नाटक मुळात गेयतेने लिहिलं आहे. संवाद आहेत, पण ते गद्यापेक्षा अधिक पद्यात आहेत. दिग्दर्शक विनायक कोलवणकर यांनी हे उत्तम प्रकारे वापरून घेतलंय. त्यांच्या सादरीकरणात एक वेगळाच तजेला आहे. हा ताजेपणा आणलाय कपिल रेडेकर आणि देसी रीफ्फ या बॅण्डने. या नाटकात देसी रीफ्फ हा बॅण्ड समूह संपूर्ण वेळ रंगमंचावर राहून लाईव्ह म्युझिक देतो. हे मराठीला काही नवीन नाही. संगीत रंगभूमीचा घवघवीत इतिहास मराठी रंगभूमीला आहे, पण ‘तोडी मिल फॅण्टसी’मध्ये प्रथमच एक पाश्चात्त्य बॅण्ड किंवा रॉक ग्रुप स्टेजवर दिसतो. असा प्रयोग याआधी एकदाच पुलंनी नंदू भेंडेंबरोबर ‘तीन पैशांचा तमाशा’मध्ये केला होता, पण ते नाटकच ‘थ्री पेनी ऑपेरा’ होतं. ‘तोडी मिल फॅण्टसी’ आपल्या मातीतलं नाटक आहे. सांघिक असल्याने इथे सर्वांचा उल्लेख करणं शक्य नाही, पण कपिल रेडेकर, शुभंकर एकबोटे आणि प्रमिती प्रीत यांचा आवर्जून उल्लेख हवा. या तिघांनी ‘तोडी मिल फॅण्टसी’ अक्षरशः आपल्या खांद्यावर तोलून धरलंय. बेमालूमपणे यात गाणी येतात, नकळत सीन सुरू होतात आणि अलगद नाटक पुढे सरकतं. शुभंकरचा घंटय़ा पावशे हीरो आणि प्रमितीने साकारलेली हिरोईन कुठेही आपलं बेअरिंग सोडत नाहीत. देसी रीफ्फचं संगीत नेहमीच्या मराठी पेक्षकांना नवीन वाटणारं आहे हे आजच्या पिढीचं संगीत आहे. हिंदुस्थानी कला केंद्र आणि थिएटर फ्लेमिंगो यांनी एक खरोखर दखलपात्र कलाकृती दिली आहे.

नाटक – तोडी मिल फॅण्टसी
निमिर्ती – भारतीय कलाकेंद्र, थिएटर फ्लेमिंगो प्रोडक्शन
लेखक – सुजय जाधव
प्रकाश- राहुल जोगळेकर, सचिन दुनाखे
संगीत- देसी रिफ्फ बॅण्ड
नेपथ्य – अभिलाश म्हात्रे, निश्चय इंगोले
नृत्य – अक्षयकुमार मांडे
दिग्दर्शक – विनायक कोळवणकर
कलाकार- प्रमिती प्रीत, कपील रेडेकर, शुभंकर एकबोटे
दर्जा – अडीच स्टार

जुगाड

महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे अणि सोनिया क्रिएशन्स निर्मित ‘जुगाड’ ही दुसरी वेगळ्या धाटणीची कलाकृती इथे आदिवासी जीवनाचा आलेख मांडण्याचा प्रयत्न आहे. कारण हा आलेख आदिवासींच्या शोषणाचा नसून त्यांनी केलेल्या शोषणाच्या प्रयत्नांचा आहे. यात विलक्षण गंमत आहे. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या कथाबीजावरून लेखक- दिग्दर्शक नितीन अग्निहोत्री यांनी हा घाट घातलाय. ‘महापुरुष म्हणजे पुढारी होण्याइतकं सोपं वाटलं का?’ ही टॅगलाइन ‘जुगाड’ं आपल्या समोर मांडतं. लेखनात अग्निहोत्रींनी या सत्याची अनेक विदारक अंगे आणली आहेत. उत्तम दिग्दर्शनातून त्यांनीच ही विदारकता परिणामकारकरीत्या पोहोचवली आहे आणि हे करण्यासाठी त्यांनी आदिवासी लोकसंगीत आणि लोकनृत्याचाही वापर केलेला आहे. ‘जुगाड’ आपल्याला सतत एका गेसिंग गेममध्ये अडकवतं आणि आपल्यालाच आपल्या समाजाविषयी प्रश्न विचारायला भाग पाडतं.

पुन्हा ‘जुगाड’ हे एक सांघिक नाटक आहे. मोठय़ा संचाच्या मदतीने आपण ‘जुगाड’ची गोष्ट अनुभवतो. ही गोष्ट आपल्याला सांगायला दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़शाळेचे दोन मराठी सेलिब्रिटी या नाटकात जुगाडले गेलेत. चिन्मय मांडलेकर आणि ऋषिकेश जोशी या दोन अत्यंत गुणी कलावंतांची जुगलबंदी यात आहे. एका प्रतिष्ठत इतिहास लेखकाच्या भूमिकेत जोशींना एका आदिवासी पाडय़ातला नेता झालेले मांडलेकर आपल्या जमातीचा इतिहास लिहायला भाग पाडतात आणि त्यात अट्टहास असतो की, तो इतिहास उज्ज्वलच हवा. मांडलेकर आणि जोशी हे दोघे ‘जुगाड’मध्ये आपल्या अभिनय सामर्थ्याने आपल्याला अडकवून टाकतात. शुभांगी भुजबळही त्यांना तोडीस तोड साथ देते आणि प्रयोग अधिक रंगतदार करते. कौशल इनामदार इमानदारीने आदिवासी लोकसंगीत पेश करतात. ‘जुगाड’हे नाटक महाराष्ट्रातल्या असंख्य आदिवासी पाडय़ांतील जमातींच्या आयडेन्टिटीचा प्रश्न मांडतं. त्यांची बदलत चाललेली मानसिकतादेखील आपल्याला दाखवतं आणि इथेच ‘जुगाड’चं वेगळेपण आहे. शहरी प्रेक्षकांसमोर आदिवासी प्रश्नांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन घेऊन ‘जुगाड’ आपल्याला भेटतं.

नाटक – जुगाड
निर्मिती – महाराष्ट्र कल्चरल सेंटर, सोनिया क्रिएशन्स
कथाबीज – डॉ. नागनाथ कोतापल्ले
संगीत – कौशल इनामदार
लेखक, दिग्दर्शक – नितीन अग्निहोत्री
कलाकार- शुभांगी भुजबळ, ऋषिकेश जोशी,चिन्मय मांडलेकर
दर्जा – अडीच स्टार