धम्माल दंगल

56

>> क्षितिज झारापकर

‘शुभ दंगल सावधान’ नवीन विनोदी नाटक. जुन्या-नव्या कलाकारांनी विनोदाचा मेळ छान साधलाय.

काही नाटकांचे प्रयोग नियोजित वेळेपेक्षा जास्त चालतात. प्रश्न असा की नाटक ठरल्याप्रमाणे होणारा प्रयोग असेल तर अशी तफावत कशी संभवते? याचं एक सोपं उत्तर म्हणजे कधी कधी प्रयोगाची लय (स्पीड) कमी लागते आणि मग वेळ वाढतो. दुसरं एक कारण म्हणजे प्रेक्षकांचा रिस्पॉन्स पाहून नट प्रसंग वाढवतात आणि नाटक लांबतं. एक तीन नंबरचं उत्तर आहे की, ठरलेल्या विनोदांवरच प्रेक्षक इतके हसतात की त्यांना उसंत देण्याकरता थांबावं लागतं आणि प्रयोगाचा अवधी वाढतो. हे तीन नंबरचं कारण सर्व विनोदी नाटक करणाऱ्यांना हवंहवंसं असतं. आपलं नाटक प्रेक्षकांना आवडतंय याची ग्वाही देणारं कारण आहे ते. या कारणाबरोबर जर दुसरं कारणही एखाद्या नाटकाला लागू होत असेल तर तो दुग्धशर्करा योग मानला जातो. तृप्ती प्रॉडक्शन्स निर्मित ‘शुभ दंगल सावधान’ हे असंच एक दुग्धशर्करा योगाचं नाटक आहे.

पण असं घडायला नाटकातले नट त्या ताकदीचे लागतात. ‘शुभ दंगल सावधान’मधील सगळे नट हे ताकदीचे कलाकार आहेत. प्रमुख भूमिकेत किशोर चौघुले हा हरहुन्नरी रंगकर्मी आहे. किशोर या नाटकात अँकरमॅनचं काम करतो. प्रयोगाची लय, पट्टी आणि स्पीड किशोर ठरवतो आणि सगळे कलाकार ते काटकोरपणे पाळतात. किशोर चौघुले हा आज जरी विनोदी नट म्हणून प्रथितयश असला तरी तो फक्त विनोदवीर नाही. किशोरने अनेक सृजनशील लेखक-दिग्दर्शकांकडे अत्यंत संवेदनक्षम अभिनयदेखील ताकदीने सादर केलेला आहे. किशोर चौघुले हा एक विचारवंत आणि हुशार कलाकार आहे. म्हणूनच तो ‘शुभ दंगल सावधान’चा प्रयोग स्टेजवरून स्वतः कंट्रोल करतो आणि अचूक एम्फसिसने सादर करतो. ‘शुभ दंगल सावधान’चा दुसरा खंदा खांदा आहे गणेश रेवडीकर. गणेश हा ‘श्रीमंत दामोदरपंत’ आणि ‘सही रे सही’पासून प्रस्थापित झाला. या दोन विक्रमी नाटकांतून त्याने विनोदाचं जे विलक्षण टायमिंग साधलं त्याला तोड नाही. ‘शुभ दंगल सावधान’मध्ये गणेश रेवडीकर पाटलाची भूमिका करतो. गणेशची लवचीकता आणि विनोदाचं विलक्षण टायमिंग नाटकाचा प्रयोग कुठच्या कुठे नेतो. या नाटकात एक अभिनेत्री आहे चेतना भट. चेतनाचा कॉमेडी सेन्स जबरदस्त आहे. याआधीदेखील तिने काही नाटकांमधून हे दाखवून दिलेलं आहे. ‘शुभ दंगल सावधान’मध्ये चेतना भट चंचलची भूमिका करते. सुभाष नकाशे यांच्या डान्स ग्रुपमधून मिळवलेलं प्रशिक्षण ती ‘शुभ दंगल सावधान’मध्ये पुरेपूर वापरून आपली भूमिका सादर करते. ‘शुभ दंगल सावधान’मधले इतर कलाकारही खूप छान आहेत. हेमाली कारेकर आणि तेजल आडीवरेकर यांच्यातली सतत चालणारी नोकझोक खूपच चमचमीत वाटते. विनोद दाभिळकर, विनीत भोंडे, सुबोध जाधव, सचिन वळूंज आणि रूपाली मेहेर या सगळ्या कलाकारांनी आपापली पात्रं अत्यंत प्रामाणिकपणे वठवली आहेत. ठिकठिकाणी ही मंडळी स्वतःचे हशे बिनचूकपणे वसूल करतात. या सर्वांमध्ये अलका परब या नवोदित अभिनेत्रीने कमाल केलेली आहे. तिच्या वाट्याला मस्तानी ही भूमिका आहे, पण त्यात एक अल्ताफदेखील दडलेला आहे. हा प्रकार अलकाने भन्नाट सुंदरतेने सादर केलेला आहे.

‘शुभ दंगल सावधान’च्या पठडीतल्या नाटकासाठी एक गोष्ट असणं फार गरजेचं असतं. त्यात पुन्हा ज्या पठडीचे कलाकार या नाटकात आहेत, तिथे ही नाटकाची गोष्ट साधी आणि सोपी असावी लागते. लेखक वैभव अर्जुन परब यांनी इथे बाजी मारली आहे. एका गावातल्या पाटलाच्या वऱ्हाडावर दरोडा घालण्याचा घाट घालणाऱ्या चोरांची आणि ते साध्य करण्याकरिता काय काय घडतं याची ही कहाणी. पण त्या घडणाऱ्या घटना वैभवने इतक्या छान उभ्या केल्या आहेत की त्यात सगळ्या कलाकारांना योग्य वाव मिळालाय. ‘शुभ दंगल सावधान’चा दिग्दर्शक आहे ‘कॉमेडी एक्स्प्रेस’फेम आशीष पवार हा अभिनेता. स्वतः एक परिपक्व विनोदी कलाकार असल्याने त्याला आपल्या नाटकातल्या कलाकारांच्या पठडीचा आणि क्षमतेचा एक वेगळाच सेन्स आहे. याचा परिणाम म्हणजे आशीषने प्रत्येक कलाकाराच्या कुवतीप्रमाणे आणि पठडीप्रमाणे नाटकभर जागा पेरल्या आहेत. अत्यंत हुशारीने आशीषने ‘शुभ दंगल सावधान’ हे नाटक बसवलं आहे. पठडी सांभाळली गेल्याने ‘शुभ दंगल सावधान’ कुठेही अडकत नाही किंवा त्याची लय ढासळत नाही. ज्या लयीत आणि पट्टीत ते सुरू होतं ती लय आणि पट्टी शेवटपर्यंत राखण्यात आशीष पवारने यश मिळवलंय. प्रयोग वाढतो याचं मुख्य कारण प्रेक्षक जागोजागी भरभरून दाद देतात आणि कलाकारांना थाबावं लागतं. विनोदी नाटक सादर करणारे सगळे दिग्दर्शक त्यांच्या नाटकात असं व्हावं हे नटेश्वराचरणी वरदान मागत असतात.

अशोक दगडू शिगवण यांनी त्यांच्या तृप्ती प्रॉडक्शन्स या संस्थेमार्फत एक छान करमणूकप्रधान नाटक ‘शुभ दंगल सावधान’ या वर्षीच्या सुरुवातीला मराठी नाट्य प्रेक्षकांना दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

दर्जा – तीन स्टार
नाटक – शुभ दंगल सावधान!
एक लग्न असंही
निर्मिती – तृप्ती प्रॉडक्शन
निर्माते – अशोक दगडू शिगवण
लेखक – वैभव परब
नेपथ्य – अंकुश कांबळी
संगीत – अमीर हडकर
प्रकाश – शीतल तळपदे
दिग्दर्शक – आशिष पवार
कलाकार – चेतना भट, हिमाली कारेकर, अलका परब, तेजल आडिवरेकर, रूपाली मेहेर, गणेश खेडेकर, विनोद  दाभिळकर, विनित भोंडे, सुबोध जाधव, सचिन वळुंज, किशोर चौघुले.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या