हाऊसफुल्ल : सपक मेजवानीचा थाट

1937

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

प्रेम, विनोद आणि क्रिकेट हे आपल्या बॉलीवूडमध्ये हमखास चालणारं नाणं… या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की, नाणं खणखणीतच वाजेल असा विश्वास ठेवला तर कधी कधी या विश्वासाला तडा जाऊ शकतो. हे नाणं पोकळ असायची शक्यता लक्षात ठेवावीच लागते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झोया फॅक्टर’ या सिनेमाचं असंच काहीसं झालं आहे. करमणुकीला लागणारे सगळे फॅक्टर असूनदेखील सिनेमाचा बॉल वेशीपलीकडे धाडण्यात दिग्दर्शकाला अपयश आलंय. चौकार आणि षटकाराच्या नुसत्या आशा लावून फक्त धावून एखाद दुसरी धाव हा सिनेमा वसूल करतं, पण एकूणच प्रेक्षकांच्या अपेक्षेचा स्कोरबोर्ड मात्र फार निराशाच करतो.

एकोणिसशे त्र्याऐंशी साली झोया या बाळाचा जन्म होतो आणि त्याक्षणी हिंदुस्थान पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकतो. त्यामुळे झोयाच्या वडिलांना आपली मुलगी ही लकी आहे आणि तिच्यामुळेच हिंदुस्थान वर्ल्ड कप जिंकलाय यावर ठाम विश्वास बसतो. नंतर तिचे भाऊ आणि वडिलांना क्रिकेटमध्ये हा झोया फॅक्टर लकी आहे हे वेळोवेळी पक्क वाटायला लागतं. झोया मोठी होते. जाहिरात क्षेत्रात नोकरी करू लागते. पण तिच्या लकी असण्याचा तिला स्वतःला कधीच फायदा होत नाही. अशातच तिची भेट हिंदुस्थानी क्रिकेट टीमच्या कॅप्टनशी होते. हरत असणाऱया टीमला आपल्या लकी असण्याबद्दल सांगते आणि त्याचवेळी नेमकी टीम मॅच जिंकतेदेखील. पण कॅप्टनला मात्र या अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नसतो आणि त्यातूनच घडते या सिनेमाची गोष्ट.

खरं तर सिनेमाचा विषय अगदी साधा नि सरळ आणि निखळ करमणूक करणारा आहे. पण तो मांडताना त्यातला अलगद भाव कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. मुळात वरकरणी पाहताना हा सिनेमा हलका फुलका आणि तो पाहताना दोन घटक छान जातील असं वाटतं, पण प्रत्यक्षात मात्र सिनेमा खूपच सपक आणि खेचल्यासारखा वाटतो. हा सिनेमा पुस्तकावर आधारलेला आहे. पण पुस्तकावरील सिनेमाचं जसं होतं तसंच काहीसं या सिनेमाचं झालं आहे. म्हणजे पुस्तक वाचताना जेवढी गंमत येते तेवढीच पुस्तक वाचताना निराशा वाटय़ाला येते आणि ज्यांनी हा सिनेमा पुस्तक वाचल्यानंतर पाहायचा ठरवला असेल तर त्यांचा सपेशल अपेक्षाभंग होईल यात शंका नाही. पुस्तकावरून पटकथा लिहिली गेलीय आणि म्हणूनच ती जिवंत होण्यापेक्षा छापीलच अधिक झालीय. वडील आणि झोयातले प्रसंग किंवा झोयाचा भाऊ आणि झोयामधले संवाद अशी काही दृश्ये वगळता सिनेमामध्ये उत्स्फूर्ततेची कमतरता प्रत्येक टप्प्यावर जाणवते. यात खूप हसवणारे संवाद आहेत, पण नंतर नंतर तेच संवाद उगाच खेचल्यासारखे वाटायला लागतात. अंधश्रद्धा आणि झोयाचा लकी चार्म फॅक्टर हा सुरुवातीला गमतीदार वाटत असला तरीही सिनेमात तो वर वरचा वाटायला लागतो. सोनम कपूरचं व्यक्त होणं किंवा तत्सम गोष्टी जरा अति नाटय़मय न करता साधेपणाने हाताळल्या असत्या तर सिनेमाचा पाया जरा तरी घट्ट झाला असता.

दुलकर सलमान हा अभिनेता मात्र मस्त आहे. त्याची स्टाईल किंवा एकूणच वावर प्रेक्षकांना आवडून जातो. सोनम कपूरने साकारलेली बबली मुलगी नवीन नाही. खूबसुरत, आय हेट लव्ह स्टोरीज किंवा आयेशा अशा तत्सम सिनेमातून दिसणारी सोनम पुन्हा एकदा या सिनेमात दिसते. तिचं सतत कॅमेऱयात बघून बोलणं आणि गॉड गॉड वागण्याचा काही वेळाने तोच तोचपणा वाटत असला तरीही कंटाळा मात्र येत नाही हेही खरं. बाकी सिकंदर खेर, अंगद बेदी आणि संजय कपूरदेखील बऱयापैकी वावरले आहेत. या सिनेमात तीन गाणी आहेत. पण ती सिनेमाला विशेष लाभदायक ठरत नाहीत.

सिनेमाचं महत्त्वाचं अंग आहे ते संवादाचं. या सिनेमाचे संवाद खुसखुशीत करायचा प्रयत्न केला असला तरीही तो तितका जमला नाही हेच खरं. काही दृश्यांमध्ये आपल्याला खूप हसायला येतं, पण त्यानंतरचं दृश्य आलं की आधीचं दृश्य लक्षातही राहत नाही. विनोदी किश्यांची मालिका पाहावी असंच काहीसं वाटत राहतं. झोया जाहिरात क्षेत्रात काम करते याचा फायदा घेऊन दिग्दर्शकाने शिताफीने जाहिराती घालायचा जो प्रयत्न केलाय तो काही वेळाने हास्यास्पद वाटू लागतो. त्या जाहिराती पैसे घेऊन भरल्याचं सुजाण प्रेक्षकाला कळल्याशिवाय राहत नाही.

एकूणच हा सिनेमा रंगीबेरंगी असला तरीही रंगतदार नाही. छान रेखीव, डोळय़ाला सुखावेल असा आणि त्यातल्या पदार्थांच्या नावाने भूक चाळावेल असा बेत केला आणि त्यात मीठच घातलं नाही तर पहिल्या घासानंतर आपलं काय होईल तसंच हा सिनेमा पाहताना होतं. दुर्दैवाने ते मिठाशिवायच अख्ख जेवण शेवटपर्यंत संपवावं लागतं आणि शेवटी निराशाच पदरी पडते. झोया फॅक्टर पाहताना याच मीठ रहित जेवणावळीची आठवण येत राहते.

सिनेमा – झोया फॅक्टर

दर्जा – दोन स्टार

निर्माता – फॉक्स स्टार स्टुडिओ, पूजा शेट्टी, आरती शेट्टी.

दिग्दर्शक – अभिषेक शर्मा.

लेखक – अनुजा चौहान, प्रद्युमन सिंग, नेहा, राकेश शर्मा.

संगीत – शंकर एहसान लॉय.

कलाकार – सोनम कपूर, दुलकर सलमान, संजय कपूर, अंगद बेदी, सिकंदर खेर, अभिषेक चौधरी.

आपली प्रतिक्रिया द्या